पुणे : तळजाई टेकडीवर दररोज सकाळी आणि सायंकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी येतात. मात्र या परिसरात गेल्या काही दिवसांपासून रानडुक्करांचा वावर असल्याने या परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागात रानडुक्करांचा वावर असतानाही वन विभाग आणि महापालिकेचे कर्मचारी दखल घेत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नितीन कदम यांनी केला आहे. वन विभागाबरोबरच महापालिकेने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी कदम यांनी केली आहे.

काही महिन्यांपूर्वी बोपदेव घाटात सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणानंतर पोलीस, वन विभाग एकत्र आले. बोपदेव दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शहरातील २२ प्रमुख टेकड्यांवर हायटेक सुरक्षा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. बोपदेव घाटात प्रायोगिक तत्वावर प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. मात्र, तळजाई टेकडीवर फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्याचे कदम यांनी सांगितले.

तळजाई टेकडीचा परिसर सुमारे १०८ एकरावर पसरलेला असून, दररोज सकाळी आणि सायंकाळच्या वेळेस अनेक नागरिक या टेकडीवर फिरण्यासाठी, व्यायामासाठी येतात. मात्र, या परिसरात रानडुक्करांचा वावर असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.