टम्म फुगलेली, कडेपर्यंत पापुदरा वेगळा होणारी मऊसूत भाकरी ज्याला करता येते त्यालाच सुगरण म्हटलं जातं. तुम्हाला सर्व स्वयंपाक करता येतो पण भाकरी येत नाही का? कधी भाकरी नीट थापली जात नाही, कधी थापली तर ती उचलताना मोडते किंवा भाजताना भाकरी चिरते…. अशावेळी काय करावे हे समजत नाही. काळजी करू नका… या लेखात मऊसूत भाकरी बनवायच्या टिप्स दिल्या आहेत. भाकरीसाठी ज्वारी कोणती वापरायची ते भाकरी कशी भाजायची या सर्व टिप्स येथे सांगितल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊ या…

मऊसूत ज्वारीची भाकरी कशी बनवावी?

ज्वारीची पीठ खूप बारीक किंवा खूप जाड दळायचे नाही. गव्हाच्या पीठापेक्षा किंचित जाड ठेवायचे म्हणजे भाकरी व्यवस्थित पीठ मळता येते.

ज्वारीच्या भाकरीसाठी मालदांडी किंवा दगडी ज्वारी ही उत्तम मानली जाते. पांढरी शुभ्र मोत्यासारखी ज्वारी असेल तरी ती उत्तम ठरते. तुमच्याकडे जी उत्तम ज्वारी असेल ती वापरू शकता तिच्यात कस किंवा चिकटपणा नसेल तर दळून आणताना त्यात थोडेसे तांदूळ टाका.

एका भाकरीसाठी एक मूठ पीठ घ्या. एका वेळी एक किंवा दोन भाकरीचे पीठ घ्याल.

तुम्ही नवशिके असाल तर कोमट पाणी भाकरीचे पीठ मळण्यासाठी वापरू शकता. लागेल असे थोडे थोडे पाणी घेऊन पीठ चांगले मळून घ्याल. ज्वारीचं पीठ खूप दिवस ठेवलं तर कस कमी होतो आणि चिकटपणा कमी होतो अशा वेळी पाणी गरम करून पीठ मळलं तर त्यात चिकटपणा वाढतो आणि पीठ चांगले मळले जाते. सुरुवातीला घट्ट पीठ मळा.

आता एका भाकरीच्या पीठाचा गोळा घेऊन बाकी पाठी बाजूला ठेवा. एका भाकरीचे पीठ चांगले मळून घ्या. जेवढे पीठ मळून घेतो तेवढी भाकरी चांगली होती. अगदी किंचित पाणी घेऊन पीठ चांगले मळून घ्याल. खूप घट्ट किंवा खूप पातळ पीठ होणार नाही याची काळजी घ्या.

आता लाकडी पोळपाट किंवा काठवठ असेल तर त्यावर भाकरी थापू शकता. आधी खाली पीठ टाका आणि मग पिठाचा गोळा त्यावर ठेवा. हाताला थोडेसे पाठी लावून घ्याल. आता हलक्या हाताने सर्व बाजूने भाकरी थापा आणि गोल फिरवत राहा. दुसरा हात भाकरीच्या कडेला लावा म्हणजे भाकरी गोलसर होते. भाकरी थापताना आधी कडेला थापून घ्यायची आहे नंतर मधून थापा. दोन्ही हाताने भाकरी थापू शकता. सगळीकडे एकसराखी भाकरी झाली आहे का बघा.

आता तवा मध्यम गरम करून घ्या मगच तव्यावर टाकावी. भाकरी तव्यावर टाकताना कधीही एका हाताने धपकन टाकू नये ती दोन्ही हाताने अलगद टाकावी.

पोळपाटावरील भाकरी प्रथम एका हातावर घ्या आणि लगेच खालून दुसरा हात लावा. आता तव्यावर अलगदपणे ती भाकरी सोडा. भाकरी तव्यावर सोडताना हात तिरका ठेवा आणि हळुवारपणे हात बाहेर काढा. हात तव्यावर भाजणार याची काळजी घ्या.

भाकरी तव्यावर टाकताच लगेच वरच्या बाजूला पाणी लावून सर्वत्र पसरवून घ्या. खूप पाणी वापरू नका. हात ओला करून पसरवून घ्या. पाणी लावताना गॅस कमी करा आणि नंतर गॅस मोठा ठेवा.

पाणी लावल्यानंतर ते पूर्ण सुकण्याआधी भाकरी पलटा. आता भाकरी दुसऱ्या बाजुने चांगली भाजू द्या. एक ते दीड मिनिटे भाकरी भाजा आणि मग पलटा.

भाकरी भाजली की चांगली फुगते. आता कॉटनचा स्वच्छ कपडा घेऊन हलक्या हाताने दाबून सर्व बाजूने चांगली भाजून घ्या.

सुरुवातीला एका वेळी भाकरी थापा आणि भाजा. हळू हळू हात बसला की मग भाकरी थापत करत भाकरी भाजू शकता.

Sarita’s Kitchen या युट्युब चॅनेलवर या टिप्स दिल्या आहेत

बाजरीच्या भाकरी देखील अशाच करू शकता. बाजरीची भाकरी करणे आणखी सोपे आहे कारण ती बाजरी ज्वारीपेक्षा चिकट असते त्यामुळे चिरण्याची शक्यता फार कमी असते. तरीसुद्धा भाकरी सरावावे येते. सहा महिन्यांमध्ये तुम्ही चांगली भाकरी करू शकता.

Story img Loader