‘जेवायला भाजी काय करायची?’ असा प्रत्येकाला दररोज पडणारा प्रश्न असतो. तसेच आपल्या जेवणामधून शरीराला पोषण देणारे पोषक घटकदेखील मुबलक प्रमाणात जावे असा विचार सगळे करतात. मग आज आपण अशीच प्रचंड पौष्टिक आणि झटपट तयार होणारी ‘पालक-सोया’ची पीठ पेरून भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत.

ही भन्नाट रेसिपी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील iambhagyashrii नावाच्या अकाउंटने शेअर केलेली आहे. तसेच या भाजीतून आपल्या शरीराला कोणकोणते पोषक घटक मिळणार आहेत, हेदेखील सांगितले आहे. चला तर पालकाच्या या भाजीचे साहित्य आणि कृती पाहू.

हेही वाचा : Recipe : ‘आंब्याची कढी’ कधी ऐकली आहे? कसा बनवायचा हा गुजराती पदार्थ, रेसिपी पाहा….

पालक – सोया पीठ पेरलेली भाजी :

साहित्य

पालक – १ जुडी
कांदे – २
सोया चंक
हरभरा डाळीचे पीठ – ३/४ चमचे
थालीपीठ भाजणी – १/४ चमचे
मोहरी
हिंग
हळद
तिखट
मीठ
तेल

हेही वाचा : Recipe : पोटाला अन् मनाला अराम देणारे ‘चौरंगी ताक’! पाहा कसे बनवायचे हे ‘चार’ फ्लेव्हर…

कृती

  • सर्वप्रथम पालक व्यवस्थित धुवून बारीक चिरून घ्यावा.
  • आता गॅसवर एक कढई ठेऊन त्यामध्ये फोडणीसाठी तेल घालून घ्यावे.
  • तेल तापल्यानंतर मोहरी घालून तिला तडतडू द्यावे.
  • मोहरी तडतडल्यानंतर, त्यामध्ये हिंग आणि हळद घालून घ्या.
  • हळद घातल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यावा. कांदा छान गुलाबी-सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
  • साधारण दोन मिनिटांनंतर शिजलेल्या कांद्यामध्ये, सोया चंक्स घालून घ्या. कांदा आणि सोया काही मिनिटांसाठी परतून घ्यावा.
  • आता कढईत, बारीक चिरून घेतलेला पालक टाकावा. पालक कढईत गेल्यांनतर लगेचच त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या. यामुळे पालकाचा हिरवा रंग तसाच राहण्यास मदत होईल.
  • पालक, कांदा आणि सोया चंकबरोबर ढवळून घ्या. आता वरून एक चमचा तिखट घालून तयार होणारी भाजी पुन्हा एकदा परतून घ्या.
  • आता या भाजीला शिजण्यासाठी, कढईवर झाकण ठेवून, भाजीला एक वाफ येऊ द्यावी.
  • भाजीला एक वाफ काढल्यानंतर, त्यामध्ये हरभरा डाळीचे पीठ घालून घ्या. यामुळे भाजी छान एकजीव होते. तसेच भाजीला खमंगपणा देण्यासाठी भाजणीचे पीठसुद्धा घालून घ्या.
  • पीठ घातल्यानंतर, कढईतील भाजी व्यवस्थित ढवळून घ्यावी. भाजी ढवळल्यानंतर पुन्हा दोन-तीन मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवा.
  • तयार आहे आपली पालक-सोयाची पीठ पेरलेली भाजी.

हेही वाचा : Recipe : कोबी पाहून लहान मुलंही खुश होतील! घरच्याघरी कोफ्ता करी कशी बनवावी, पाहा ही रेसिपी…

सूचना –

पालकाची पीठ पेरून भाजी बनवताना त्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करू नये.
सोया चंकचा वापर भाजीमध्ये करण्याआधी, सोया अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवावे. त्यानंतर भिजवलेल्या सोयाचा वापर भाजीमध्ये करावा.
पालक, सोया चंक आणि वापरलेल्या पिठांमध्ये लोह, फायबर आणि प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे ही भाजी खूप पौष्टिक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @iambhagyashrii नावाच्या अकाउंटवरून ही भन्नाट रेसिपी आणि विशेष सूचना व्हिडीओमार्फत शेअर झालेल्या आहेत. या रेसिपीला आत्तापर्यंत ६३.६K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.