News Flash

नेमके कुणाचे गांधी?

गेल्या चार वर्षांतील देशातील राजकीय परिस्थितीने काँग्रेसला या आश्रमाजवळ आणून सोडले आहे.

देवेंद्र गावंडे – devendra.gawande@expressindia.com

भाजपचे गांधीप्रेम मतलबी आहे, हे सांगणाऱ्या काँग्रेसचे गांधीप्रेम तरी कसे होते? 

स्वातंत्र्यपूर्व काळात सेवाग्रामचा आश्रम राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू होता. या आश्रमात काय घडते, याकडे साऱ्या देशाचे लक्ष असे. स्वातंत्र्यलढय़ात सामील झालेल्या लाखो देशवासीयांसाठी हा आश्रम एक स्फूर्तिस्थान होता. स्वातंत्र्य मिळाले, महात्मा गांधींची हत्या झाली आणि मग हळूहळू या आश्रमाचे राजकीय महत्त्व कमी होत गेले. नंतर दीर्घकाळ सत्तेत असलेल्या काँग्रेसने गांधी विचारानुसारच देशाची वाटचाल सुरू राहील, असा दावा सातत्याने केला, पण या पक्षातून हा विचार लोप पावत गेला. मग सोयीनुसार गांधी वापरण्याचे युग सुरू झाले. आता पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी आटापिटा करणाऱ्या काँग्रेसला अचानक या आश्रमाची आठवण झाली आहे. पक्षाच्या सर्वोच्च अशा केंद्रीय कार्यसमितीची बैठक येथे होत आहे. गांधींच्या १५०व्या जयंतीच्या निमित्ताने ही बैठक असल्याचे या पक्षाचे नेते सांगत असले तरी त्यात तथ्य नाही. गेल्या चार वर्षांतील देशातील राजकीय परिस्थितीने काँग्रेसला या आश्रमाजवळ आणून सोडले आहे.

ज्यांची आजवरची ओळख गांधीद्वेष्टे अशी निर्माण करण्यात आली होती, त्या भाजपने देशभर सत्ता मिळाल्यावर गांधींना जवळ करण्याची एकही संधी सोडली नाही. पंतप्रधान मोदींनी तर प्रत्येक दिवशी गांधींच्या आचरणाचा, विचाराचा दाखला देत आपण किती गांधीभक्त आहोत, याचा जोरदार प्रचार केला. यातून आलेली अस्वस्थता काँग्रेसला पुन्हा सेवाग्रामकडे घेऊन आली आहे. गांधी हे काँग्रेसचेच, असाच या पक्षाचा आजवरचा दावा होता. मोदी व त्यांच्या पक्षाने या दाव्यातील हवाच काढून घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी गांधींच्या स्वच्छतेचे अस्त्र वापरले. स्वच्छ भारताच्या मोहिमेला गांधींशी जोडून बळ देणारे मोदी त्याच राष्ट्रपित्याने दिलेल्या अहिंसेच्या तत्त्वावर का बोलत नाहीत, असा साधा प्रश्नही या काळात काँग्रेसला विचारता आला नाही. भाजपची गांधीभक्ती वरवरची व पोकळ आहे हेसुद्धा जनतेपर्यंत पोहोचवण्यात काँग्रेसला फार यश आले नाही. आता दीडशेव्या जयंतीनिमित्ताने भाजप गांधींना पूर्णपणे कवेत घेतो की काय, या शंकेने ग्रासलेल्या काँग्रेसने घाईघाईने हा कार्यसमितीचा घाट घातला हे आता पुरते स्पष्ट झाले आहे. या कार्यक्रमाच्या संदर्भात पक्षाचे नियोजन आधीपासून असते तर अशोक गेहलोतांना आश्रमाची जागा मिळवण्यासाठी वेळेवर धावपळ करावी लागली नसती. कार्यक्रमाच्या अचानक आखणीमुळे आश्रम व पक्षात निर्माण झालेला वाद जनतेला दिसला नसता. आश्रम व काँग्रेस यांच्यातील संबंध किती ताणले गेलेले आहेत, याचे दर्शन सर्वाना झाले नसते. गांधी ही कुणाची खासगी मालमत्ता नाही, हा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी मारलेला टोमणा ऐकावा लागला नसता. मुळात काँग्रेसने सेवाग्रामसाठी घेतलेला हा पुढाकार अंत:प्रेरणेतून आलेला नाही तर प्रतिक्रियावादी भूमिकेतून आला आहे, हेच यातून स्पष्ट झाले.

याउलट भाजपने या जयंतीचे निमित्त साधून केलेले नियोजन आधीपासूनचे होते. एरवीही हा पक्ष जाहिरातबाजीत नेहमी समोर असतो. त्यामुळे ‘जगातील सर्वात मोठा चरखा आश्रमात बसवला जाणार’ ही त्यांची जाहिरात काँग्रेसला अस्वस्थ करणारी ठरली. तसे पाहिल्यास सेवाग्रामचा विकास आराखडा राज्यात काँग्रेसचे सरकार असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात मंजूर झाला होता. चारशे कोटींच्या या आराखडय़ाला प्रत्यक्ष कार्यरूप काँग्रेसला देता आले नाही. चाणाक्ष भाजपवाल्यांनी सत्ता येताच संधी साधली. आता हा आराखडा आमच्याच कार्यकाळातील आहे, असे काँग्रेसचे नेते ओरडून सांगत आहेत. जाहिरातबाजीत हा पक्ष कसा कमी पडतो, याचे हे उत्तम उदाहरण.

काँग्रेसचे अनेक मोठे नेते नियमितपणे आश्रमात येतात. राहुल गांधींचे सहकारी सचिन राव यांनी येथे कार्यकर्त्यांची अनेक प्रशिक्षण शिबिरे घेतली आहेत. स्वत: राहुल गांधी गुप्तपणे अनेकदा सेवाग्रामला आले आहेत. त्यामुळे ‘आताच आश्रमाची आठवण आली या म्हणण्यात तथ्य नाही,’ असा दावा काँग्रेसचे नेते करतात. पण मग, एवढा संपर्क असतानासुद्धा गांधीवादी आणि काँग्रेस पक्ष यांत इतका अंतराय का निर्माण झाला, असा प्रश्न उरतोच व त्याचे उत्तर या दावेदारांकडे नसते. आजवर सत्तेत मश्गूल राहिलेल्या काँग्रेसने या गांधीवाद्यांना तसेच आश्रम संचालित करणाऱ्यांना कधी जवळ केले नाही. गरज पडली तेव्हा आश्रमात जाऊन नतमस्तक होण्याची औपचारिकता हा पक्ष पाळत राहिला. जाऊन जाऊन हे गांधीवादी कुठे जातील, अशा समजात या पक्षाचे नेते राहिले. आता भाजपने या साऱ्यांना अंकित करण्याचे प्रयत्न सुरू करताच काँग्रेस खडबडून जागी झाली. तरीही जो दुरावा दिसायचा तो दिसलाच. काँग्रेसला आश्रमात बैठक घेऊ द्यायला हवी, अशी मागणी एका विनोबा समर्थकाने करताच गांधींचे पणतू तुषार गांधींनी त्याला जाहीर विरोध दर्शवला. गांधी विचाराचा प्रसार करत जगभर फिरणाऱ्या तुषार गांधींनासुद्धा असे वाटावे, यातच काँग्रेसचे अपयश दडले आहे.

या वादविवादाच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसची मांदियाळी सेवाग्रामला एकत्र येत आहे. गांधींचा हा आठव या पक्षाला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देईल का, या प्रश्नाचे उत्तर येणाऱ्या काळात मिळेल; पण गेल्या चार वर्षांत गांधींनी सांगितलेला विचार पायदळी तुडवला जात असतानासुद्धा या पक्षाने फार काही केले नाही. एके काळी विदर्भ हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जायचा. आणीबाणीनंतरच्या, १९७८च्या निवडणुकीत साऱ्या देशात या पक्षाचे पानिपत झाले. केवळ विदर्भाने साथ दिली. नंतरही ही साथ कायम राहिली. राज्यात आघाडी सरकारचा प्रयोग सुरू झाल्यावरसुद्धा विदर्भ राष्ट्रवादीच्या नाही तर काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला. काँग्रेसने मात्र भरभरून यश देणाऱ्या विदर्भाची उपेक्षाच केली. सर्वाधिक आमदार विदर्भाचे असूनसुद्धा दुग्धविकास, पशुसंवर्धन, वने यांसारखी दुय्यम खाती विदर्भाच्या माथी मारण्याचा करंटेपणा हा पक्ष सतत दाखवत राहिला. त्याचा पुरेपूर फायदा नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी उचलला व काँग्रेसचा गड अशी दीर्घकाळ असलेली ओळख पार पुसून टाकली.

वास्तविक, विदर्भातील शेतकरी आत्महत्यांची दखल सर्वप्रथम पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी घेतली. पॅकेज, कर्जमाफी सारे काही दिले. त्यातून हा प्रश्न सुटला नाही हे मान्य; पण याचा राजकीय फायदासुद्धा या पक्षाला करून घेता आला नाही. आता पराभवामुळे व त्यानंतरही थांबायचे नाव न घेणाऱ्या गटबाजीमुळे तसेच घराणेशाही जोपासणाऱ्या नेत्यांमुळे हा पक्ष विदर्भात तरी दीनवाणा झाला आहे. अशा स्थितीत या पक्षाला संजीवनी देण्यासाठी गांधीस्मरण कामास येईल का, याचे उत्तर येणाऱ्या काळात मिळणार आहे.

आजही भारतीय जनमानसात महात्मा गांधींचे स्थान अढळ आहे. एखाद्या लढय़ात सत्याचा विजय झाला की बहुसंख्यांच्या तोंडून अभावितपणे ‘महात्मा गांधी की जय’ अशी घोषणा बाहेर पडते. त्यासाठी कुणाला शिकवावे लागत नाही. जनमानसात असलेली ही गांधीमोहिनी मोदी व त्यांच्या भाजपने बरोबर हेरली. नेहरूंना शिव्या दिल्या तरी निवडणुकीत काही फरक पडत नाही, पण गांधींचा उदोउदो केला की फरक पडतो, याची जाणीव या नव्या सत्ताधाऱ्यांना लवकर आली. त्यातून त्यांनी गांधी कवेत घेण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू केले. दीडशेवी जयंती धूमधडाक्यात कशी साजरी करता येईल, याचे नियोजन केले व देशभर तसे कार्यक्रम आखले. त्या तुलनेत काँग्रेसला सुचलेले शहाणपण उशिराचे आहे. सेवाग्राममधील गांधीवाद्यांनी ही जयंती देशभर साजरी करण्यासाठी अनेक बैठका घेतल्या. पदयात्रा काढण्याचे ठरले, पण अर्थ व मनुष्यबळाअभावी हा विचार त्यांना सोडून द्यावा लागला. आश्रमावर आता हक्क सांगणाऱ्या काँग्रेसपर्यंत ही वार्ताही पोहोचली नाही. आता निवडणुका जवळ आल्याचे बघून काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी गांधींचे गुणगान सुरू केले असले तरी सामान्य जनतेला नेमके कुणाचे गांधी भावतात, हे लवकरच दिसून येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2018 3:13 am

Web Title: congress attachment with gandhiji
Next Stories
1 दुष्काळछाया गडद!
2 काँग्रेसचा संघर्ष तरी सुरू झाला..
3 राज्याची उद्योग पिछाडी
Just Now!
X