‘मराठी भाषा दिवस आणि भाषाभ्रम’ हा प्रकाश परब यांचा लेख (२७ फेब्रु.) वाचला. जागतिकीकरणामुळे मराठी कधीच ज्ञानभाषा होऊ शकणार नाही. मराठीच्या दुरवस्थेबाबत सरकारी हस्तक्षेपाची गरज इ. मुद्दे तपासून पाहायला हवेत. ज्ञानभाषा कशाला म्हणायचं हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. केवळ ज्ञान एखाद्या भाषेत ‘जास्त उपलब्ध’ असले म्हणून तिला (इंग्रजीला ) ज्ञानभाषा म्हणायचे का? ज्या भाषेत ज्ञानाची निर्मिती होते ती खरी ज्ञानभाषा.    
विज्ञानक्षेत्रातील जगप्रसिद्ध नियतकालिके आज चायनीज, जापनीज आवृत्त्या काढताना दिसतात. याचे कारण त्या भाषांमध्ये वेगाने होत असलेले संशोधन आणि ज्ञाननिर्मिती-जी इंग्रजीवाचून अडलेली नाही. इंग्रजी पाठ करून, परीक्षेत लिहून आयआयटी, आयआयएममध्ये प्रवेश व सुवर्णपदक मिळू शकतील, पण ‘अमेरिकेचे स्वस्त मनुष्यबळ’ या पलीकडे त्याचा उपयोग होणार नाही.
येणाऱ्या काळात जेव्हा प्रत्येक क्षेत्रातील स्पध्रेचं स्वरूप जागतिक व अधिकाधिक कठीण  असेल तेव्हा आपणास आपल्या भाषांची उणीव जास्त प्रकर्षांने जाणवेल. त्यावेळी इंग्रजी मातृभाषा असणाऱ्या देशांशी स्पर्धा करताना कदाचित आपणास समजेल की प्रतिभेचा अत्युच्च आविष्कार मातृभाषेत सहजसाध्य असतो, आणि अशी भाषाच आपली ज्ञानभाषा असू शकते.
-डॉ. तुकाराम जमाले,
सहायक प्राध्यापक, गो. सुं. वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई

वेगळे होण्याने मोठे होऊ की अधिक छोटे?
‘वेगळं व्हायचंय मला’ हा गिरीश कुबेर यांचा लेख ( २२ फेब्रु.) वाचला. ‘वेगळं होणं’ या विचारधारेला केंद्रीभूत मानून व्यक्त केलेले विचार काही अंशी बरोबर आहेत. असे असले तरी काही वेगळ्या मुद्दय़ांसाठी हा लेखनप्रपंच. ‘वेगळं व्हावंसं वाटणं ही प्रेरणा नसíगक असू शकते.’ हे जरी मान्य केलं तरी वेगळं होण्याच्या बाबतीत जेव्हा तेलंगणाचा मुद्दा पुढे येतो तेव्हा तेलंगणाची वेगळं होण्याच्या मागणीमागची प्रेरणा केवळ नसíगक प्रेरणा आहे, असे म्हणता येणार नाही.
तेलंगणाचा आजवरचा लढा पाहिला तर त्यांच्या वेगळं होण्यामागे राजकीय स्वार्थाची प्रेरणाच अधिक दिसते आहे. ‘लोकसत्ता’च्या अग्रलेखातच (१९ फेब्रु.) याचा खुलासा करताना लिहिलं आहे की, कँाग्रेसच्या सोनिया गांधी यांनी या प्रश्नाचं कसं भांडवल केलं. त्याच वेळी विरोधी पक्ष म्हणून भाजपनेसुद्धा बोटचेपी भूमिका घेत हा तेलंगणाचा तमाशा पाहण्यातच आनंद मानला आहे. भाषेच्या आधारावर एकच राज्य असावं हा तर्क हास्यास्पदच आहे. त्यासाठी आपल्याच देशातील िहदी भाषिक राज्याचं दिलेलं उदाहरण योग्यच आहे. पण आंध्र प्रदेशच्या विभाजनास समर्थन किंवा विरोध करण्यामागे काही आíथक गणितेसुद्धा आहेत. लोकसभेत स्प्रे फवारणारे खासदार एल. राजगोपाल यांची हैदराबाद, तेलंगणात मोठी गुंतवणूक असून दुसरे प्रतापी खासदार एम. वेणुगोपाल रेड्डी हेदेखील यात मागे नाहीत, हे अनेक प्रसारमाध्यमांतील बातम्यांमध्ये उघड झालं आहे. तेव्हा विरोध किंवा समर्थनाच्या आड केवळ नसíगक प्रेरणा आहेत की काही आíथक स्वार्थ दडलेले आहेत, हेदेखील पाहायला हवं.
 लेखात या वेगळं होण्याच्या मागण्यांवर नव्या राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना व्हावी हा तोडगा सुचवला आहे आणि ते योग्यच आहे.
 लेखात जगातील अनेक राष्ट्रांची उदाहरणं दिली आहेत. पण या पाश्चिमात्यांच्या वेगळं राष्ट्र करण्यामागच्या प्रेरणा नसíगक पण तितक्याच व्यावहारिक, देशहिताच्या वाटतात. आपल्याकडे भारतीय स्वातंत्र्यानंतरचा इतिहास पाहिला तर असं लक्षात येतं की ४५० हून अधिक संस्थानांत विभागला गेलेला आपला देश त्या वेळी  संस्थांनांच्या विलीनीकरणामुळे खऱ्या अर्थाने ‘भारत देश’ म्हणून अस्तित्वात आला. तेव्हा पाश्चिमात्यांच्या तुलनेत आपल्या वेगळं होण्यामागे बहुतांश भावनिक व राजकीय प्रेरणाच अधिक आहेत. हाच आपला इतिहास आणि वर्तमान आहे तेव्हा ‘वेगळं व्हायचंय मला’ याची भीती वाटते ती याचमुळे की आपण वेगळं होण्यानं खरंच मोठे होऊ की अधिक छोटे, संकुचित आणि कट्टर?
तुषार  देसले, झोडगे ता. मालेगाव (नाशिक)

ब्राझीलचा विषय मांडताना गफलत?
‘वेगळं व्हायचंय मला! ‘ हा लेख वाचला. महाराष्ट्राच्या विभाजनापुरतं बोलायचं झाल्यास हा मुद्दा मराठी माणसाकरिता तरी कायमच भावनिक राहणार आहे. आजचा महाराष्ट्र हा मराठी माणसानं जबरदस्त संघर्ष करून मिळविलेला आहे.  मराठी जनता हा इतिहास कधीच विसरू शकत नाही. महाराष्ट्रात आíथक सत्ता मराठी माणसाकडे कधीच नव्हती, राजकीय सत्ता मराठी माणसांच्या हाती अजून टिकून आहे ती मराठी माणसाच्या एकजुटीमुळे. एकदा का महाराष्ट्राची शकलं झाली की मराठी माणूस मराठी भूमीतच मराठी भाषेसारखा बापुडवाणा होऊन जाईल.
ब्राझीलचा विषय मांडताना काही तरी गफलत झालेली दिसते. ब्राझीलचं आकारमान संपूर्ण दक्षिण अमेरिका खंडाच्या जवळपास निम्म्याइतकं आहे आणि उत्तर प्रदेशच्या जवळपास ३५ पट.
-डॉ. मंगेश सावंत

डोळ्यांत खुपणारे संकेतस्थळ
‘राजवाडे संशोधन मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजीत!’ ही बातमी (२८ फेब्रुवारी) वाचली. ते संकेतस्थळ खरोखरच मराठीभाषेबद्दल अभिमान बाळगणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यांत खुपावे आणि त्याचे हृदय जळावे, असेच आहे. इतिहासाचार्य राजवाडेंनी केलेले मौल्यवान संशोधन आणि लिखाण त्यांनी जर इंग्रजीतून केले असते, तर त्यांना किती तरी पटीने अधिक प्रसिद्धी मिळाली असती. असे असूनही कीर्ती, आíथक फायदा इत्यादी गोष्टींची तमा न बाळगता केवळ एक तत्त्व म्हणून त्यांनी केवळ मराठीतच लेखन केले. मराठी भाषा मुमूर्षु तर नाहीच उलट ती अत्यंत सक्षम आहे आणि तिला आपण अधिकाधिक विकसित करीत राहायला हवी, अशीच त्यांची दृढ भावना होती.
या इंग्रजी संकेतस्थळासंदर्भात संजय मुंदडा यांनी दिलेले ‘मंडळाची आíथक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मराठीऐवजी इंग्रजीत संकेतस्थळ केले’ ही सबब वाचून हसू आले. ‘मराठी भाषेत लिहिण्याचे पेन महाग असल्यामुळे मी इंग्रजीत लेखन करतो’ या विधानाएवढेच दांभिकपणाचे हेही विधान आहे. राजवाडय़ांच्या जीवनध्येयाचा अपमान करणाऱ्या आणि स्वत: कुठलेही संशोधन न करणाऱ्या मंडळींनी ‘राजवाडे संशोधन मंडळ’ अशा नावाच्या संस्थेवर अधिकारपदे भूषवावीत  हे अगदीच विचित्र आहे. आता तरी ही मंडळी मनाची नाही तर जनाची लाज बाळगून संपूर्ण संकेतस्थळ मराठीत प्रस्थापित करतात का, ते पाहू.
सलील कुळकर्णी, कोथरूड, पुणे</strong>

हाय ती मायबोली..!
धुळे येथील राजवाडे संशोधन मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजीत असल्याचे वृत्त केवळ खेदजनक नसून तो दैवदुर्वलिासच म्हणावा लागेल! ज्यांनी आवर्जून मराठीत लेखन करून त्या काळी इंग्रजीत लेखन करणाऱ्या मराठी भाषक लेखकांवर सडकून टीका करून त्यांचा रोषही पत्करला त्या इतिहासाचार्य राजवाडे यांच्यावर काळाने सूड तर उगवला नाही ना? परंतु दुर्दैवाने काळच तसा येऊ पाहत आहे. अन्यथा अनेक वर्षांच्या कालावधीनंतर शासकीय स्तरावर साजरा होणाऱ्या मराठी भाषा दिन समारंभाआडून आगामी निवडणुकांच्या प्रचारकी थाटाचे दृश्य पाहायला न मिळते!
– पम्मी प्रदीप खांडेकर, माहीम