प्रपंचात राहून जेव्हा परमार्थाचा विचार सुरू झाला तेव्हा कुठे परमात्म्याच्या साक्षात्काराची जाणीव झाली. भगवंताच्या स्मरणात सर्व दु:ख, काळजी संपते आणि मन परमानंदानं भरून जातं, हे ऐकीव ज्ञानही समजलं. त्या स्थितीचं वर्णन संतांनी केलं आहे. तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात, ‘आनंदाचे डोहीं आनंद तरंग’ तेव्हा जाणवतं आपल्या मनाचा डोह दु:खानं भरला आहे म्हणून त्यात निराशेचेच तरंग उमटतात. परमानंदानं मनाचा डोह भरेल तेव्हा तरंग आनंदाचेच असतील. वाचताना मनाला उभारी येते पण तो आनंदाचा अनुभव काही येत नाही! इंद्रियांच्या ओढीनं मन फरपटत असतं आणि त्यामुळे साधकाला वाटू लागतं की, इंद्रियनिग्रह काही आपल्याला साधणारा नाही आणि त्यामुळे परमार्थसुद्धा आपल्या आवाक्यात येऊच शकत नाही. मग एकनाथी भागवताच्या निमित्ताने नाथ सांगतात, ‘इंद्रिये कोंडितां न कोंडती। विषय सांडितां न सांडती। पुढतपुढती बाधूं येती। यालागीं हरिभक्ती द्योतिली वेदें।। इंद्रियें कोंडावीं न लागती। सहजें राहे विषयासक्ती। एवढें सामथ्र्य हरिभक्तीं। जाण निश्चितीं नृपवर्या।।’ इंद्रिये कोंडून काही इंद्रियांची ओढ नष्ट होत नाही. विषय सोडले, असं नुसतं म्हणून विषयासक्ती सुटत नाही. उलट जितके ते सोडावेत तितके ते पुढे उसळून वर येतात. म्हणूनच वेदांनीही भगवंताची भक्ती सांगितली आहे. भगवंताच्या भक्तीत एवढे सामथ्र्य आहे की त्यामुळे इंद्रियवृत्तींचं दमन करावं लागत नाही आणि विषयासक्ती आपोआप ओसरत जाते. हे वाचूनही मनाला उभारी येते पण प्रत्यक्षात हरिभक्तीच साधत नाही. त्यामुळे त्या भक्तीच्या जोरावर इंद्रियवृत्ती आपोआप आवरतील, हे मनाला खात्रीने पटत नाही. भगवंताचा संग हाच जीवनातील दु:खांच्या प्रभावापासून सुटण्याचा उपाय आहे, हे पोथ्या-पुराणं, अभंगादिंतून समजतं. समर्थ रामदास सांगतात, ‘मना संग हा सर्व संगास तोडी। मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी। मना संग हा साधका शीघ्र सोडी। मना संग हा द्वैत नि:शेष मोडी।।’ (मनाचे श्लोक, क्र. २०४). भगवंताचा जो संग आहे तो सर्व कुसंग तोडतो, मोक्ष तात्काळ जोडून देतो, भ्रम आणि मोहाच्या पाशातून साधकाला वेगाने सोडवतो आणि सर्व प्रकारच्या द्वैताचा समूळ नाश करतो. आद्य शंकराचार्य यांनीही सांगून ठेवलं आहे- ‘सत्सङ्गत्वे नि:संगङ्गत्वं। नि:संगङ्गत्वे निर्मोहत्वं। निर्मोहत्वे निश्चलचित्तं। निश्चलचित्ते जीवन्मुक्ती:।।’ सत्यस्वरूप परमात्म्याच्या संगाने निसंगत्व प्राप्त होते. त्या निसंगत्वामुळे मनातला मोह नष्ट होतो. या निर्मोहीपणामुळे चित्त निश्चल अर्थात शुद्ध होतं आणि निश्चलचित्त हीच जीवन्मुक्ती आहे. तेव्हा भगवंताचा संग  हाच मोलाचा आहे, माणसाच्या जन्माला येऊन तोच साधला पाहिजे, हे शब्दांनी समजतं पण हा संग म्हणजे नेमका काय, तो कसा लाभावा, कसा साधावा हे कळत नसतं. आपण पोथ्या वाचतो, अध्यात्मविषयक वाचनही करतो, त्यातून शब्दांचाच संग होतो. भगवंतच खरा आहे आणि आपलं जगणं मिथ्या आहे, या अनुभवाचा संग मात्र नसतो.