09 July 2020

News Flash

दृश्यतरलता

जेव्हा चित्रं ‘कशाचं’ आहे ते कळत नाही तेव्हा आपल्यातला भाषिक प्राणी जागा होऊन लगेच प्रश्न विचारतो. चित्र कोणाचं आहे?

| January 31, 2015 12:51 pm

जेव्हा चित्रं ‘कशाचं’ आहे ते कळत नाही तेव्हा आपल्यातला भाषिक प्राणी जागा होऊन लगेच प्रश्न विचारतो. चित्र कोणाचं आहे? कोणी काढलं? विषय काय? चित्र कशानं रंगवलंय? अर्थ काय? म्हणूनच सांगावं लागतंय! हाताची घडी, तोंडाला कुलूप (बोटाऐवजी) आणि डोळे उघडे ठेवून चित्र फक्त पाहा, डोळे भरून पाहा, अगदी सावकाश, चित्राचा कोपरान्कोपरा पाहा..

‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ अशी सूचना लहानपणी शाळेमध्ये आपल्याला मिळाली असेल. आपला सतत चालणारा संवाद बंद व्हावा व मन स्थिर व्हावं याकरता ही सूचना दिली जायची, जाते. मोठेपणी मांडी, पद्मासन घालून स्थिर बसा, डोळे हळूहळू मिटा, श्वासावर लक्ष केंद्रित करा, अशा सूचना योग शिक्षक देतात.. त्यांचाही हेतू हाच. मन स्थिर व्हावं, मनात सतत चालणारा संवाद बंद व्हावा.
कुत्रा, मांजर आदी प्राण्यांचं निरीक्षण करा! ते डोळे मिटून पडून राहिले असले तरीही शेपटी, नाक, कान हलवून सभोवतालचा सतत वेध घेत राहतात.
माणसाचंही असंच आहे. पंचेंद्रियांकडून येणारे अनुभव ग्रहण करणं, त्यांचा अर्थ लावणं, प्रतिक्रिया करणं ही प्रक्रिया सतत चालू असते. अगदी आपल्याला त्याची जाणीव नसली तरीही. ही प्रक्रिया चालू राहण्याकरिता पंचेंद्रिये व त्याच्याशी संबंधित मेंदूची कार्ये करणारी प्रणाली तल्लख, ताजीतवानी असणं गरजेचं आहे. पण तसं होतंच असं नाही. कारण आपण दर वेळेला आपल्याला येणारे अनुभव पूर्णपणे स्वीकारू वा ग्रहण करू शकत नाही, घेऊ शकत नाही. कारण आपल्याला अनुभवाचा विषय माहीत असतो. त्यात काहीही नवीन नसतं. परिणामी, त्याच त्याच गोष्टीचा अनुभव पुन:पुन्हा घेण्यासाठी आपल्याला वेळ नसतो, आपण तिथे थांबत नाही. आपल्याला तो अनुभव विषय संपून, त्याला ओळखून, त्याला नाव देऊन त्यासंबंधित कृती करणं महत्त्वाचं वाटत असतं.
जीवनाचा हा वेग आपल्याला लहानपणीच शिकवायला सुरुवात होते. भाषा शिकणं, खाणं, पिणं दैनंदिन जीवनातील अशा असंख्य कृती करण्यासाठी मागे लागलं जातं. घाई केली जाते. वास्तविक लहान मुलांना सरबत पिताना, चणे-दाणे खाताना पाहा. त्यांना मस्तपैकी सरबताचे लहान-लहान घोट घेत सरबत प्यायचं असतं, चणे-दाणे दाताने कुरतडत हळूहळू खायचे असतात. त्यांच्या चवीचा अनुभव घेत खायचं-प्यायचं असतं. पण हा अनुभव घेण्यापेक्षा मोठय़ांना ती कृती करण्यात, पूर्ण करण्यात, संपवण्यात जास्त महत्त्व वाटतं. वास्तविक ते लहान असताना त्यांनीही अशाच पद्धतीने रेंगाळत अनुभव घेतले, पण हळूहळू मोठे होताना त्यांच्यात बदल घडला; प्रत्येकात हा बदल थोडय़ाफार फरकाने घडत असतो. या बदलाची कारणं काय असतील?
याचं एक कारण आहे भाषा. भाषाज्ञान, भाषावापर. आपल्याला अगदी लहानपणापासून बोलायला व नंतर लिहायला, अक्षरं ओळखायला शिकवलं जातं. सभोवतालच्या वस्तूंना, कृतींना, घटनांना दिली गेलेली भाषिक नावं शिकवली जातात.
भाषेची मोठी गंमत आहे. अनुभवाच्या मोठय़ा पसाऱ्याला स्पष्ट व संक्षिप्त रूप देण्यास माणसाने केलेल्या प्रयत्नातून भाषेचा उगम झाला. पाहा ना मानवाच्या इतिहासात! सुरुवातीला संकेत देण्यासाठी गुहाचित्रं काढली गेली. पण गुहाचित्रं स्थिर असल्याने त्यापेक्षा कुठेही वापरता येईल अशी चलभाषा, साधनं, ध्वनी व हाताची चिन्हं तो वापरू लागला. व त्याही पुढे जाऊन कालमर्यादा ओलांडूनही टिकू शकेल अशी लिखित अक्षरलिपी, भाषा तो वापरू लागला.
मानवी जीवनाची गती जसजशी वाढू लागली तसतसे संक्षिप्त रूपात आपले अनुभव व्यक्त करण्यासाठी भाषेचा वापर, तिच्या बोली व लिखित रूपात वाढू लागला. भाषेचा मोठय़ा प्रमाणावरचा वापर आपल्या अनुभव घेण्याच्या प्रक्रियेवर, सवयींवर परिणाम करू लागतो. म्हणजे गंमत पाहा- आपल्याला ‘न कळणारे’ दृश्य, ध्वनी, स्पर्शानुभव, चवी यांना अनुभवण्यात काही फारसा रस नसतो. तो अनुभव घेण्यासाठी या अपरिचित अनुभवांना ‘नवीन’, ‘वेगळं’ असं नाव देऊन, ‘घेऊन तर बघ’ असं स्वत:ला किंवा दुसऱ्याला सांगण्याची गरज भासते. याचं कारण भाषा आपल्या सर्व अनुभवांना नावं ठेवायला शिकवते व त्यामुळे मेंदू नेहमी ‘एक्सायटिंग’ असं नाव असलेल्या अनुभवांकडेच जास्त लक्ष देऊन पाहतो. जे समोर आहे ते पाहत नाही. चित्र पाहायला, रसग्रहण करण्यासाठी आपल्याला अपरिचित असलेलं, ज्याचं नाव काय, हे आपल्याला माहीत नाही, त्याला पाहण्याची, अगदी नीट पाहण्याची सवय लागली पाहिजे. कारण जेव्हा चित्रं ‘कशाचं’ आहे ते कळत नाही तेव्हा आपल्यातला भाषिक प्राणी जागा होऊन लगेच प्रश्न विचारतो. चित्र कोणाचं आहे? कोणी काढलं? विषय काय? चित्र कशानं रंगवलंय? अर्थ काय? म्हणूनच सांगावं लागतंय! हाताची घडी, तोंडाला कुलूप (बोटाऐवजी) आणि डोळे उघडे ठेवून चित्र फक्त पाहा, डोळे भरून पाहा, अगदी सावकाश, चित्राचा कोपरान्कोपरा पाहा.. जर का भाषिक प्राणी शांत झाला असेल तर चित्र पाहून मनात निर्माण होणारे प्रतिध्वनी चित्राचा अर्थ समजायला मदत करतील. असं केल्यानं दृश्याबाबत, चित्राबाबतची तरलता आपल्यामध्ये निर्माण होईल, वाढेल..
प्रत्येक संस्कृती समाजामध्ये अत्यंत मूलभूत मानवी कृती, श्वास घेणं, डोळ्यांनी पाहणं, ऐकणं, खाणं, बसणं, चालणं, बोलणं अशा अनेक कृतींबाबत काही सवयी, मापदंड विकसित करतो. या सवयी, या कृती कशा पद्धतीने, तरलतेने, संवेदनशीलतेने करता येतात ते दर्शवतो, शिकवतो. या तरलतेतूनच, संवेदनशीलतेमधूनच कला, तत्त्वज्ञान, विज्ञान विकसित होतं. त्यामुळे चित्रं समजत नसतील तर आपण भाषेचा अतिवापर करत आहोत का? त्याचा आपल्यातील तरलता, संवेदनशीलता यावर परिणाम झालाय का हे पाहायला, तपासायला पाहिजे..
सोबतचं चित्र पाहा! अमेरिकन चित्रकार एडवर्ड हॉपरचं ते चित्र आहे. ‘अर्ली संडे मॉर्निग’ असं त्याचं नाव आहे. चित्रात वरच्या भागात आकाशाचा आयत दिसतो. त्याखाली एकमजली, अनाकर्षक, आडवी पसरलेली इमारत दिसते. तळमजल्यातली बहुतेक दुकानं बंद आहेत. पहिल्या मजल्यावरच्या सर्व खिडक्या बंद आहेत. अगदी चिटपाखरूही दिसत नाही. सगळं अगदी शांत, सामसूम आहे. फुटपाथवर एक पाण्याचा स्प्राऊट व रंगीत खांब आहे. सर्वाना कोवळ्या सकाळच्या उन्हाने थोडंसं उबदार केलंय व त्यांच्या लांब सावल्या फुटपाथवर पसरल्या आहेत..
म्हटलं तर महाराष्ट्रात ज्याला ‘निसर्गचित्र’ म्हणतात त्या प्रकारात मोडणारं हे चित्र आहे. पण ते एका सकाळी जाऊन तिथल्या तिथे रंगवून संपवलेलं चित्र नाही. ते अशा अनेक शांत, अबोल रविवार सकाळच्या वेळा अनुभवून व कदाचित अनेक रविवारी ही पाहिलेली बिल्िंडग, रस्ता मनात साठून तयार झालंय. म्हणूनच या दृश्याला प्रत्यक्षात पाहून मनात जे प्रतिध्वनी निर्माण होतात त्या थोडय़ाशा आळशी, अबोल, शांत, उबदार सकाळच्या वातावरणातून हे चित्र तयार करण्याची इच्छा व या इच्छेतून हे प्रतिध्वनी व्यक्त करण्यासाठी चित्र हॉपरने रंगवा. चित्र नीट पाहा, शांतपणे, तोंडाला कुलूप लावून, मग हॉपरच्या मनातील प्रतिध्वनी आपल्याला आपल्या मनात ऐकू येतील. दृश्यतरलता अनुभवता येईल.

*लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2015 12:51 pm

Web Title: fluidity of visuals
टॅग Language
Next Stories
1 संवाद प्रतिमा
2 पाण्याचा धप् असा आवाज!
Just Now!
X