News Flash

लोकमानस: ‘शतप्रतिशत’नको निम्म्याहून जास्त हवेच

भाजपची ‘शतप्रतिशतची हाक’ महाराष्ट्रातही असावी यासाठी १९ मेच्या अग्रलेखाने केलेले आवाहन सकृत्दर्शनी समर्थनीय वाटत असले तरी त्यात काही महत्वाचे मुद्दे आहेत

| May 20, 2014 01:02 am

‘शतप्रतिशत’नको निम्म्याहून जास्त हवेच
भाजपची ‘शतप्रतिशतची हाक’ महाराष्ट्रातही असावी यासाठी १९ मेच्या अग्रलेखाने केलेले आवाहन सकृत्दर्शनी समर्थनीय वाटत असले तरी त्यात काही महत्वाचे मुद्दे आहेत;  ते असे-
१) सुमारे २५ वर्षांची मैत्री अचानक तोडणे बरोबर होणार नाही
२) मनसेकडून  भ्रमनिरास झालेला असल्याने मनसेचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेकडे वळतील, त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढणार आहे.
३) ग्रामीण भागात तुलनेने भाजपचा संपर्क शिवसेनेपेक्षा कमी आहे, हे मान्य व्हावे.
४)उद्धव ठाकरे यांची विश्वसनीयता यापुढील काळात वाढण्याचे संकेत आहेत.
वरील मुद्यांच्या पाश्र्वभूमीवर भाजपने विचार करावा पण मध्यम मार्ग म्हणून विधान सभेसाठीही भाजपला मोठा भाऊ म्हणून मान्यता देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावेत.  त्यासाठी २००९ साली कमी जागा लढवूनही भाजपला शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या व त्यामुळेच विधानसभेत विरोधीपक्ष नेतेपद मिळाले व ते अद्याप टिकून आहे, (विधान परिषदेतही भाजप संख्या जास्त आहे)हे सेनेने लक्षात घेऊन उदार अंत:कारणाने भाजपला जास्त जागा देण्याची तयारी करावी . ‘काँग्रेस मुक्त महाराष्ट्र’ करण्यासाठी आलेल्या संधीचा उपयोग करणे अनिवार्य आहे.  
श्रीनिवास जोशी, डोंबिवली (पूर्व)

आत्मप्रतारणा आता तरी थांबवा
बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे नंदकुमार जकातदार यांनी वर्तविलेली(आणि शुक्रवार दि. ४  एप्रिलला  पुण्याच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली निवडणुकीची भाकिते आणि शुक्रवारी, १६ मे रोजी मतदान यंत्रांतून प्रकट झालेली सत्ये अशी आहेत:-
* ‘यावेळी कोणालाच बहुमत मिळणार नाही.’ > भाजपला निर्वविाद बहुमत.
* ‘भाजपला १५५ ते १६५ जागा मिळतील.’> भाजपला २८७ जागा.
* ‘काँग्रेसला ११५ ते १२५ जागा मिळतील.’ > काँग्रेसला ४७  जागा.
* ‘पुण्यातून विश्वजित कदम निवडून येतील.’ > विश्वजित कदम पडले.
* ‘मावळमधून लक्ष्मण जगताप जिंकतील’ > लक्ष्मण जगताप पराभूत.
 * ‘काँग्रेसच्याच पािठब्याने सरकारची स्थापना.’ > पाठिंब्याची आवश्यकता नाही.
फलज्योतिषाला  ‘थोतांड’ हे विशेषण यथायोग्य आहे हे वारंवार सिद्ध झाले आहे. ज्योतिषांनी आपल्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून आत्मप्रतारणा तसेच पृच्छकांची (ग्राहकांची) वंचना थांबवावी हे बरे.
प्रा. य. ना. वालावलकर

विजयोन्मादामुळे रिपाइंचा विसर?
नरेंद्र मोदी यांच्या प्रचंड विजयानंतर बऱ्याच प्रतिक्रिया ऐकायला व वाचायला मिळत आहेत. लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून पराभूत झालेल्या अरुण जेटली यांच्यापर्यंत अनेकांचे मंत्रिमंडळात पुनर्वसन कसे होईल याची काळजी सर्वाना आहे असे दिसते. महायुतीतील मोठा घटक असलेल्या शिवसेनेलाही हीच चिंता आहे. परंतु महाराष्ट्रात महायुतीने लढवलेल्या लोकसभा निवडणुकीत रि. पा .इं (आठवले गट) हासुद्धा महत्त्वाचा घटक होता याचा विसर उन्मादात असलेल्या फक्त भाजपलाच पडला नसून तसा जाणीवपूर्वक विसर शिवसेनेलाही पडला आहे. भले रिपाइं ला निवडून येण्यात यश मिळाले नसेल, पण शिवेसेनेचे जे उमेदवार आता खासदार म्हणून निवडून आलेत त्या यशामागे  रामदास आठवले  यांच्यासह इतरांचा काहीच वाटा नव्हता अशी भावना शिवसेना नेत्यांची झाली आहे का? तसे नसते, तर आठवले यांना मंत्रिपद देण्यासाठी चक्रे फिरलीच असती.  
रोशन कांबळे, वरळी , मुंबई

हे अतिथी नाहीत,हे पाहुणेच!
बऱ्याच सांस्कृतिक कार्यक्रमांत पाहुण्यांची ओळख करून देताना ‘आजचे प्रमुख अतिथी’ अशी केली जाते. ‘अतिथी’ म्हणजे जो तिथी, वार न देता येतो तो. थोडक्यात, आपल्या आगमनाची चाहूल न देता जो येतो तो अतिथी.
सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी तर प्रमुख व्यक्तीला काही दिवस अगोदर रीतसर निमंत्रणाचे पत्र देऊन सन्मानपूर्वक बोलावले जाते. मग, तो ‘अतिथी’ कसा काय ठरू शकतो?
‘प्रमुख अतिथी’ या ऐवजी जर ‘प्रमुख पाहुणे’ हा शब्दप्रयोग केला, तर तो जास्त संयुक्तिक होणार नाही का?
  संजय वामन पाटील,
  बोरिवली (पूर्व)

‘अच्छे’ दिवस असे असणार का?
‘अच्छे दिन आनेवाले है’ हा प्रचार म्हणजे केवळ जाहिरातबाजी नव्हती, हे दाखवून देण्यासाठी आता वेळ आलेली आहे ते अच्छे दिवस आणण्याची! पक्षाचा जाहीरनामा आणि देशाचा विकास आराखडा यात फरक असतो, हे जाणून नरेंद्र मोदी यांनी पुढील १५ वर्षांसाठी ‘व्हिजन २०३०’बनवले तरी देश त्यांच्याकडे आशेनेच पाहील, अशी स्थिती सध्या आहे. देशाचा विकास हा फक्त महानगरात किवा मोठय़ा शहरांत न दिसता, तो छोटय़ा खेडेगावात पसरला पाहिजे. आíथक विकासाची त्रराशिके म्हणजे शेती, उद्योग आणि सेवा या तिन्ही क्षेत्रांत सरकारने लक्ष घातले पाहिजे. कृषिप्रधान देशात नवनवीन पद्धती अवलंबल्यास आणि शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहचवल्यास, शेतकऱ्यांना वित्त व मनुष्यबळ व्यवस्थापन, पिकांचे व्यवस्थापन तसेच विपणनाचे ज्ञान दिल्यास आणि त्यावर देखरेख केल्यास त्याचा निश्चितच उपयोग होईल.
औद्योगिक क्षेत्राला लागणाऱ्या जमिनी या शक्यतोवर नापीकच असाव्यात, शेतकऱ्यांच्या उपजाऊ जमिनी संपादित करू नयेत. तसेच संपादित जमिनीवर कारखाने सुरू झालेले नसल्यास त्या एकतर शेतकऱ्यांना परत केल्या गेल्या पाहिजेत किंवा आजच्या बाजारभावाने शेतकऱ्यांना त्याचा मोबदला द्यायला हवा. भारतातील सगळ्या राज्यात अप्रत्यक्ष कर म्हणजे मूल्यवíधत कर, स्थानिक कर इत्यादीसारखे असले पाहिजे. सध्याची प्रचलित करप्रणाली जाऊन त्याऐवजी वस्तू सेवा कर कायदा तसेच प्रत्यक्ष कर कायद्यामध्ये येऊ घातलेल्या सुधारणा लवकरात लवकर त्यामध्ये अंमलबजावणी झाली पाहिजे.
हे सर्व करत असताना मोदी यांनी केवळ संघ परिवारामधील लोकांना सामील न करता आपला परीघ वाढवला पाहिजे. त्यामध्ये भाजप किंवा मित्र परिवारातील सदस्य नसलेले परंतु योग्यतेचे, असे लोकदेखील जवळ केले पाहिजेत. त्यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार असोत, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया किंवा आधार कार्डाचे जनक नंदन निलेकणी असोत. १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयींनी आंतरराष्ट्रीय कृषी परिषदेस पाठवण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष शरद पवारांना केले होते, अशी उदाहरणे आहेतच.
देवेन्द्र जैन, अंबरनाथ

‘लाटा’ येतातच, काम अधिक महत्त्वाचे
भारताचा स्वातंत्र्योत्तर इतिहास पाहिला तर असे लक्षात येईल की अशा अनेक लाटा काँग्रेसला उद्ध्वस्त करून गेल्या. पण काँग्रेस प्रत्येक वेळेस सावरून पुन्हा नव्या जोमाने उभी राहिली. अगदी भाजपविरुद्ध अशीच लाट इंदिरा गांधींच्या निधनानंतर आली होती. त्यातून सावरून भाजप आता पूर्ण बहुमताने सत्ता स्थापन करत आहे.
मोदी लाट ही काही अचानक आलेली नाही. नियोजनबद्ध पद्धतीने रा. स्व. संघाने मोदींना पंतप्रधानपदासाठी घोषित करून या लाटेची सुरुवात केली. अण्णा हजारेंचे आंदोलन, राष्ट्रकुल घोटाळा, निर्भया प्रकरण, टू-जी घोटाळा, आदर्श घोटाळा, कोळसा घोटाळा, आंध्र विभाजन या गोष्टींतून काँग्रेसने स्वतहून लाट वाढवत नेली. काँग्रेसच्या कारभाराविरुद्ध जनतेमध्ये असलेला प्रचंड असंतोष आणि नवीन तंत्रज्ञानाचा अतिशय प्रभावी वापर यावर मोदींनी ही लाट अधिक बळकट केली. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर ती बळकटच होत गेली. शेवटपर्यंत ही लाट ओळखण्यात आणि त्याला रोखण्यात कॉँग्रेसला अपयश आले.
ही लाट केवळ कॉँग्रेसविरुद्धच्या असंतोषामुळे होती. ती घराणेशाहीविरुद्ध असती तर जनतेने रक्षा खडसे, पूनम महाजन, हीना गावित यांना निवडून दिले नसते. तसे असते तर कर्नाटकमध्ये येडुरप्पा निवडून आले नसते. काँग्रेसला समर्थ पर्याय म्हणून लोकांनी मोदी यांना भरभरून मतदान केले.
पण मोदींनी गुजरातमध्ये स्वत सोडून दुसऱ्या कोणाचेही नेतृत्व पुढे येऊ दिले नाही. केंद्रात त्यांनी असा प्रयत्न केल्यास त्यांची अवस्थादेखील इंदिरा गांधींसारखी व्हायला वेळ लागणार नाही. लाट जितक्या वेगाने येते तितक्याच वेगाने ती ओसरते. लोकांना दाखवलेली स्वप्ने आणि त्यामुळे त्यांच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करणे मोदींना जर जमले नाही तर त्यांची अवस्थादेखील आजच्या कॉँग्रेससारखी व्हायला वेळ लागणार नाही.
त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षांमध्ये मोदी सरकार कशी कामगिरी करते हेच पाहणे इष्ट.
-विनोद थोरात, जुन्नर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2014 1:02 am

Web Title: new formula in assembly elections of maharashtra
टॅग : Maharashtra
Next Stories
1 हे कसे विसरणार?
2 हा जनतेच्या अपेक्षांचा विजय
3 मोरारजींच्या वारसांना आता रोखावेच लागेल !
Just Now!
X