‘दु:खे आनंदात परिवíतत होतील, गुलामगिरीच्या भावनेखाली जखडलेली मने स्वातंत्र्याच्या भावनांनी बहरतील आणि मनामनांतील हिंस्रपणा नष्ट होऊन ही मने दयाभावाने भारून जातील तेव्हा जगात शांतता नांदेल. केवळ प्रेम आणि सद्भावनेतूनच जगात शांतता प्रस्थापित होऊ शकते.. ज्याच्या हृदयात राग, द्वेष आणि परस्परांविषयीचा वैरभाव जागा आहे, तो हिंदू असो, मुस्लीम असो वा ख्रिस्ती असो.. त्याचे जिणे केविलवाणेच असणार’.. सत्यनारायण गोयंका नावाच्या ‘शांततेच्या साधका’ने सन २००० मध्ये न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती परिषदेत हे विचार व्यक्त केले आणि जगभरातील विविध धर्मप्रतिनिधींनी टाळ्यांच्या प्रचंड गजरात हे विचार स्वीकारल्याची पावती दिली. निर्मळ हृदय हाच कोणत्याही धर्मविचाराचा गाभा आहे. म्हणून धर्माच्या नावाने होणारे संघर्ष थांबविले पाहिजेत, असा विचार घेऊन सत्यनारायण गोयंका यांनी विपश्यनेच्या माध्यमातून जगाला शांतीचा मार्ग दाखविला. स्वधर्माचा सन्मान आणि परधर्माचा अपमान करणाऱ्या धर्मापेक्षा परधर्माचा आदर करणारा धर्मच महान ठरतो. म्हणून आपल्या धर्माला महानतेचा मान मिळवून देण्यासाठी तरी परधर्माचा आदर करा, ही त्यांची शिकवण धर्माधतेमुळे अराजकाच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या जगासाठी मोलाची ठरली, म्हणून सत्यनारायणजी गोयंका भारताचे नव्हे, तर आधुनिक जगाचे शांतिदूत ठरले. विपश्यना हा मानसिक शांततेच्या मशागतीचा मार्ग दाखविला, आणि या मार्गाने चालणाऱ्या लाखो जीवांच्या जीवनाला एक नवा अर्थदेखील प्राप्त करून दिला. जेव्हा आसपास अंधार असतो, तेव्हा प्रकाशाची खरी गरज भासू लागते. जगात हिंसक संघर्ष, युद्धे आणि रक्तपाताचा कहर सुरू असताना शांतता आणि सौहार्दाची गरज आहे आणि तेच समाजासमोरील मोठे आव्हान आहे, हे ओळखून सत्यनारायणजींनी आपले औद्योगिक विश्व विसरून या कार्यात स्वत:ला झोकून दिले. भारताच्या भूमीत तत्त्वज्ञान आणि अध्यात्माचा शतकांचा वारसा रुजलेला आहे. अनेक धर्म, पंथ या भूमीत सामंजस्याने राहत आहेत, कारण या भूमीला भगवान बुद्धांच्या आणि सम्राट अशोकाच्या सर्वधर्मसमभावाच्या विचारांची नतिक बठक आहे. ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’ ही सर्वच धर्माची समान शिकवण आहे, आणि शांततेतूनच सुखाची अनुभूती मिळते, त्यामुळे मन:शांती हा व्यक्तिगत आणि सामाजिक सुखाचा एकमेव मार्ग आहे, असे अभूतपूर्व तत्त्वज्ञान मांडत मनामनांना शांतीचा संदेश देणारा साधक म्हणून सत्यनारायणजींना जग ओळखू लागले. मनोविकासाच्या, मन शुद्ध करण्याच्या साधनेचा मार्ग म्हणजे विपश्यना. वर्षांगणिक लाखो लोकांना या धर्मातीत साधनेची शिकवण देत समाजपरिवर्तन चळवळीचा आगळा आदर्श सत्यनारायणजींनी उभा केला. मन शुद्ध झाले की शरीर शुद्ध राहते, आणि त्यामुळे अवघे जीवनच शुद्ध होते, हा त्यांच्या शिकवणीचा सिद्धांत आचरणाऱ्या विपश्यना साधक परिवाराने शुद्ध जीवनशैलीचे आदर्श जगाच्या कानाकोपऱ्यात निर्माण केले आहेत. सत्यनारायणजी स्वत: विपश्यनेचे कठोर साधक होते. ते उत्तम वक्ते होते, कवी होते आणि लेखकही होते. विपश्यना साधनेतून धर्माचरण, सत्याचरणाचे त्यांचे विचार श्रोत्यांना आणि वाचकांना भारावून टाकणारे आहेत. दैनंदिन जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवून आणणारी विपश्यना साधना भारतातील तुरुंगामध्ये कैद्यांच्या मानसिकतेत बदल घडविणारा एक चमत्कार ठरली. हजारो दूषित मनांच्या शुद्धीकरणाच्या या प्रयोगातून मानसिक ताणतणावाखाली वावरणाऱ्या दुनियेला तणावमुक्तीचा मार्ग सापडला आहे. सत्यनारायणजींचे समाजावरील हे उपकार कालातीत राहतील.
संग्रहित लेख, दिनांक 1st Oct 2013 रोजी प्रकाशित
शांततेचा साधक
‘दु:खे आनंदात परिवíतत होतील, गुलामगिरीच्या भावनेखाली जखडलेली मने स्वातंत्र्याच्या भावनांनी बहरतील आणि मनामनांतील हिंस्रपणा नष्ट होऊन ही मने दयाभावाने भारून जातील तेव्हा जगात शांतता नांदेल.

First published on: 01-10-2013 at 01:37 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peace seekers