News Flash

योगामुळे मानसिकता बदलेल, पण गैरव्यवस्थाही बदलावीच..

राज्यातील मोठय़ा तुरुंगातील कैद्यांना तेथील गरव्यवस्थे मुळे मानसिक आजार जडण्याचे प्रमाण वाढत असल्याचे वृत्त (लोकसत्ता, १ जून) वाचले.तुरुंगातील कोंडवाडय़ांत क्षमतेपेक्षा जास्त कैदी, तेथील कष्टाचे

| June 2, 2015 01:02 am

योगामुळे मानसिकता बदलेल, पण गैरव्यवस्थाही बदलावीच..
राज्यातील मोठय़ा तुरुंगातील कैद्यांना तेथील गरव्यवस्थे मुळे मानसिक आजार जडण्याचे प्रमाण वाढत असल्याचे वृत्त (लोकसत्ता, १ जून) वाचले.तुरुंगातील कोंडवाडय़ांत क्षमतेपेक्षा जास्त कैदी, तेथील कष्टाचे जीवन यामुळे हे आजार जडत आहेत व त्यावर योग व प्राणायाम आदी उपचार देण्यात येणार आहेत, असेही या वृत्तात म्हटले आहे.
तुरुंगातील कैद्यांना मानसिक आजार जडण्यास तेथील गरव्यवस्था कारणीभूत असल्याने योग व प्राणायाम आदी उपचार देताना भोवताल च्या परिस्थितीमधील गरव्यवस्था दूर करणे देखील तितकेच गरजेचे आहे. अनेकदा मानसिक आजार जडण्यास भोवतालची परिस्थिती कारणीभूत असते. कुटुंबीय व/वा समाजाकडून होणारा टोकाचा अन्याय, त्याबद्दल झालेली सातत्याची मुस्कट दाबी, शारीरिक मानसिक गरजा न भागल्याने होणारा कोंडमारा व कुचंबणा, संघर्षमय जीवन, त्यातील कोलाहल, रोजच्या आयुष्यातील प्रश्न सोडवताना झालेली दमछाक, त्यात आलेले अपयश व सरतेशेवटी नराश्य अशी अनेक कारणे मुळात गुन्हा घडण्यासाठी पुरेशी असतात. कोणत्याही आजारावर वेदनाशामक औषधां सोबत आजाराचे मूळ कारण शोधून त्यावर इलाज करणे हे अधिक गरजेचे असते.
योग, प्राणायाम यामुळे पीडित व्यक्तीचे मन शांत राहून परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता वाढत असली तरी आजाराची मूळ कारणीभूत परिस्थिती त्यामुळे अर्थातच बदलत नाही. ती तशीच प्रतिकूल व अन्यायकारक राहते. मानसिक आजार झालेल्या पीडित व्यक्तींवर उपचार करताना मानसिक स्वास्थ्यासाठी अन्यायकारक, कुचंबणा करणारी परिस्थिती हटविणे त्याहून अधिक गरजेचे व सामाजिक न्यायाचे असते.
रजनी अशोक देवधर, ठाणे

कर्जमाफी, आत्महत्या ऐवजी ’कर्जमुक्ती’, ‘कर्जबळी’ म्हणा
मराठवाडय़ाच्या दुष्काळी पाहणीच्या दौऱ्यावर माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार साहेब आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जाच्या प्रश्नावर बोलताना ‘कर्जमाफी’ असा शब्दप्रयोग केला. आम्ही या शब्दावर आक्षेप नोंदवतो आहोत. शरद पवार जेव्हा महाराष्ट्राचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्याच सुमारास उदयास आलेल्या शेतकरी संघटनेने ‘कर्जमाफी’ या शब्दाला तेव्हापासूनच सातत्याने विरोध करून ‘कर्जमुक्ती’ असा शब्द वापरण्याचा आग्रह धरला आहे. कारण माफी द्यायला शेतकऱ्याने काही गुन्हा केला आहे की काय?
शेतकऱ्याचे कर्ज हे त्याच्या चुकलेल्या नियोजनाचा परिणाम नसून ते सरकारी धोरणाचे पाप आहे. शेतीमालाची बाजारपेठ, शेतीमालाचा व्यापार, शेतीमालाची आयात निर्यात यात सातत्याने शासनाने हस्तक्षेप करून शेतकऱ्यावर अन्याय केला आहे. इतकेच नाही तर शेती कर्जावरील व्याजाची आकारणी करताना रिझव्‍‌र्ह बँकेची परिपत्रके/नियम यांचे पालन केले गेले नाही. अतिशय चूक पद्धतीने शेती कर्जावरील व्याज आकारले गेले आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणजे मुद्दलाच्या कित्येक पट व्याजाची आकारणी करण्यात आली. इतके सगळे असताना परत परत ‘कर्जमाफी’ असा शब्द वापरून शेतकर्याच्या दु:खावर डागण्या देऊ नये. उलट ‘कर्जमुक्ती’ असा शब्द वापरून त्याच्यावर केलेल्या अन्यायापासून त्याची मुक्तता करण्यात यावी असा आमचा आग्रह आहे.
दुसरा उल्लेख पवार साहेबांनी शेतकरी आत्महत्येचा केला. शेतकऱ्यांची आत्महत्या ही आत्महत्या नसून हे ‘कर्जबळी’ आहेत. ‘हुंडाबळी’ असा शब्द महिला आंदोलनाने रूढ केला आणि या सगळ्या प्रकरणात आत्महत्या हा गुन्हा ठरण्यापासून त्या अन्यायपीडीत महिलेची सुटका झाली; त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्येलाही ‘कर्जबळी’ म्हणावे असा आमचा आग्रह आहे.
सरकार कुठलेही असो शेतकऱ्याला ‘अच्छे दिन’ येतच नाहीत. शरद पवार हे आता विरोधी पक्षात आहेत आणि शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा करीत आहेत. हे पाहून आम्हाला समाधान वाटले.
– कैलास तवार, अ‍ॅड. प्रकाश पाटील,
रमेश िशदे, जी. पी. कदम, दत्ता भानुसे
(जि. औरंगाबाद)

प्रस्थापित कामगार पुढाऱ्यांची सामाजिक न्यायाबद्दल पोपटपंची, हा जगाचे भान नसल्याचा पुरावा
‘या ‘शहाणपणा’चा उद्देश काय’ (लोकमानस, २९ मे) हा प्रतिसाद वाचून आश्चर्य वाटले नाही . कायम संघटित वर्गाच्या बाजूने बोलून खरे गरीब, श्रमिक आणि असहाय शेतकरी यांच्याविषयी ब्र सुद्धा न काढणारे प्रस्थापित कामगार पुढारी जेव्हा सामाजिक न्यायाबद्दल पोपटपंची करू लागतात तेव्हा जग आणि भारत बदलत असल्याचे भान त्यांना नसल्याचे सिद्ध होते.
कामगार वर्गाचे भले करण्याची संधी डाव्यांना पश्चिम बंगालने दिली होती. तिचे त्यांनी काय केले हे जगासमोर आहे. केरळमधील तरुण नोकरी करण्यासाठी आखाती देशात जातात. केरळात डाव्यांनी काय दिवे लावले? त्यांचे देवस्थान असलेल्या रशियात आज काय घडत आहे? अर्थात डाव्यांना तेथे वा चीनमध्ये काय चालू आहे याची खबरबात घेण्याची गरज वाटत नाही. याचे कारण उघड आहे. डाव्यांचे लाड आज फक्त भारतातच चालतात. अगदी क्युबामध्येही उत्पादनास खीळ घातल्यास फटके पडतात. तथाकथित भांडवलशाही देशांची गोष्टच निराळी. भारतात कामगार संघटना फोफावल्या त्या मनगटशाहीच्या जोरावर. त्यांना विरोध करणारे कामगार नेते आणि कार्यकत्रे यांना निर्दयपणे संपवण्यात आले. पुढे हेच अस्त्र त्यांच्यावर उलटले. मात्र अनेक कामगार पुढारी गबर झाले. एस. वाय. कोल्हटकर हे डावे पुढारी ५५५ ब्रँडची सिगरेट ओढत. त्यांना देशी सिगरेट चालत नसे. मी अज्ञ असतानाच्या काळात मी त्यांना याबद्दल विचारले असता त्यांनी ‘व्यक्ती आणि समाज’ या विषयावर दीर्घ निरूपण केले आणि असे व्यक्तिगत प्रश्न ज्येष्ठ नेत्यांना विचारू नयेत असे मार्गदर्शन मला केले. ते मी मान्य केले नाही हा भाग अलाहिदा. अशी अनेक उदाहरणे आहेत. आजारी पडले की डावे नेते उपचार घेण्यासाठी परदेशी जात. अर्थात आधीच्या कम्युनिस्ट नेत्यांनी केलेला त्याग विसरता येणार नाही. परंतु नंतरचे नेते फारच वेगळे निघाले. या वृत्तीचा बंगालमध्ये अतिरेक झाला. नंदिग्राममध्ये विशेष आíथक क्षेत्राला विरोध करणाऱ्या गरीबांना कम्युनिस्ट शासन गोळ्या घालत असताना सीताराम येचुरी मुंबईत अशा क्षेत्रांना विरोध करणाऱ्या डाव्या मोच्र्याचे नेतृत्व करत होते. अखेर कम्युनिस्ट पक्षाला गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतरही डाव्या नेत्यांनी कधीतरी आपल्या चुका कबूल केल्या का?
कामगार वर्गाचे भले होणार आहे परिश्रम करून, देशाच्या प्रगतीला हातभार लावून. नेमका हा संदेश डावे कधीच देत नाहीत कारण असे झाल्यास आपले दुकान बंद होईल अशी भीती त्यांना आहे. भारत-चीन युद्धात चीनची तरफदारी करणाऱ्यांकडून आणखी काय अपेक्षा करणार?
दिलीप चावरे, अंधेरी

लग्नाला न जातो मी
‘लग्नाहून परतताना ६ ठार, ७ जखमी’ अशी यवतमाळची बातमी (लोकसत्ता, १ जून) वाचली. काळ आणि सोयी सवलती बदलल्या तरी आपण बदलत नाही हे सध्याच्या विवाह समारंभांमधून दिसते. खरे तर ५०० ते ६०० किलोमीटर अंतरावर अशा गाडय़ा काढून जाणे योग्य नाही. वेळ वाचवण्यासाठी अशा गाडय़ा रात्रीचा प्रवास करतात. रात्री निघणे, दिवसा समारंभ परत रात्री प्रवास.. अपघात होणारच. त्यातही अशा गाडय़ांमधून प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी (माझ्या पाहण्यातील उदाहरणांची सरासरी-१३ प्रवासी) असतात.
आत्मप्रौढी वाटली तरी चालेल, परंतु मी लांबच्या प्रवासाच्या लग्न समारंभाला जात नाही. माझे वय ६४, परंतु वयोवृध्द जेष्ठांनी तर अशा लांब ठिकाणी लग्नाला जाऊ नये असे माझे एकांगी वाटणारे मत आहे. फोनच्या सोयीमुळे तुम्ही लग्नाच्या आदल्या दिवशी, लग्न असणाऱ्या मुलामुलीशी व त्यांच्या आई वडिलांशी २० ते २५ मिनिटे बोलून शुभेच्छा देऊ शकता, जे प्रत्यक्ष हजर राहून करू शकत नाही.
महादेव न. ढोकळे, डोंबिवली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2015 1:02 am

Web Title: readers response for loksatta articles
टॅग : Readers Response,Yoga
Next Stories
1 नोकरभरतीवरील बंदी चुकीची
2 भाषिक भेदभावास संविधानाचा विरोध नाही!
3 कामगार कायदे आजही झगडूनच मिळवावे लागतील!
Just Now!
X