29 February 2020

News Flash

‘पूर्ण स्पर्धे’चे केवळ स्वप्नच

‘लौंदासी भिडवावा..’ या अग्रलेखात (८ डिसें.), इंटरनेटच्या माध्यमातून व्यापार करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात बलाढय़ रिटेल कंपन्यांनी स्पध्रेला घाबरून जो टाहो फोडला आहे आहे त्यावर नेमका प्रकाश

| December 10, 2014 05:06 am

‘लौंदासी भिडवावा..’ या अग्रलेखात (८ डिसें.), इंटरनेटच्या माध्यमातून व्यापार करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात बलाढय़ रिटेल कंपन्यांनी स्पध्रेला घाबरून जो टाहो फोडला आहे आहे त्यावर नेमका प्रकाश टाकला आहे. जागतिकीकरण, उदारीकरणाचे विकसित राष्ट्रांनी ढोल वाजविताना भारतासारख्या अविकसित देशांना ‘पूर्ण स्पध्रे’चे गाजर दाखविले होते. पूर्ण स्पध्रेच्या प्रतिमानात ‘असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते, एकजिनसी वस्तू, उत्पादक/विक्रेत्यांना बाजारात मुक्त प्रवेश व गमनाचे स्वातंत्र्य, उत्पादक व ग्राहकाला बाजाराचे, उत्पादन खर्चाचे व सर्वच बाबींविषयक संपूर्ण माहिती, ज्ञान, तसेच वस्तू व सेवा आणि उत्पादनाचे घटक एका जागेवरून दुसऱ्या जागेवर किंवा दुसऱ्या उद्योगात जाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य, वाहतूक खर्चाचा अभाव, जाहिरात खर्चाचा अभाव, विवेकवादी  (खरे तर स्वार्थी) असे ग्राहक आणि जास्तीत जास्त नफ्याची अपेक्षा करणारे उत्पादक’ अशी अशक्य गृहीतके एकत्र असतील तर अशा स्पध्रेत ग्राहक हा सार्वभौम राजा ठरू शकतो, दीर्घ काळात खर्च किमान पातळीला येऊन किमती किमान पातळीला येतील, उत्पादकांना देखील सर्वसाधारण नफा मिळेल, असे मानले जाते.
अशा पूर्ण स्पध्रेची स्वप्ने विकून जागतिकीकरण लादले गेले. प्रत्यक्षात विकसित देशांमध्येदेखील बलाढय़ कंपन्यांची मक्तेदारीवाढत गेली. या कंपन्यांनी तेथील राजकीय पक्षांना निवडणूक खर्च/ वित्तपुरवठा केला व काही मोजक्या मक्तेदार कंपन्यांचे साम्राज्य निर्माण झाले. पूर्ण स्पर्धा हे स्वप्नच राहिले. भारतातदेखील इंटरनेटच्या माध्यमातून जेव्हा खरी स्पर्धा निर्माण झाली तेव्हा या कंपन्यांनी आपले खरे रूप दाखविणे सुरू केले आहे, अशा वेळेस सरकारने अत्यंत कडक धोरण स्वीकारून अधिकाधिक कंपन्यांना स्पध्रेत आणून ग्राहकांचा फायदा, हितसंवर्धन करावे, त्याचबरोबर छोटय़ा उत्पादकांना विक्रेत्यांना विशेष सवलती द्याव्यात, जेणेकरून ते या स्पध्रेत टिकू शकतील.
-शिशिर सिंदेकर, नाशिक [सध्या चंडीगढ]

आर्थिक व्यवहार धर्मातीतच हवे
हिंदू धर्मावर आधारित फंड या विषयावरील  विद्वांस यांचा लेख वाचला. एक म्हणजे केवळ एकाने केले म्हणून दुसऱ्याने करावे हे अर्थविषयक नियमात बसत नाही. आर्थिक व्यवहार हे आíथक तत्त्वांवरच केले गेले पाहिजेत, त्यात धर्म किंवा राजकारण आणले की त्यात बाधा येते.
 दुसरी गोष्ट त्यांनी ही सूचना करताना सर्व बाजूंनी विचार केलेला दिसत नाही. नाही तर यातील धोके त्यांच्या लक्षात आले असते. धर्माच्या नावावर लुटण्याचे सर्वाधिक प्रकार बहुधा आपल्या देशात होतात. येथे धर्माच्या नावावर बाजार चालतो आणि त्यात आपली दुकाने थाटून लोकांना लुबाडले जाते. यात ते यशस्वीही होतात याचे कारण धर्म म्हटले की, या देशातील बहुसंख्य जनता निर्बुद्ध होते आणि उरलीसुरली हतबुद्ध होते. अशा परिस्थितीत धर्माच्या नावावर फंड म्हणजे माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखे होईल. विद्वांस यांनी एक मंडळ स्थापन करण्याचे सुचवले आहे. थोडक्यात येथील स्वयंघोषित गुरू, उचापतखोर शंकराचार्य, साधू यांना एक चराऊ कुरणच मिळेल. या फंडाच्या नावावर पसे गोळा करून ते लुबाडले तरी कोणाला काही करता येणार नाही. कारण सेबीने कारवाई करायचे ठरवले तरी तो हिंदू धर्मावर हल्ला आहे अशी हाकाटी पिटली जाईल. एखादी साध्वी सेबी अधिकाऱ्यांना हरामजादे ठरवून मोकळी होईल.
 तेव्हा आíथक व्यवहार हे धर्मातीतच असू द्यावेत. हिंदू धर्माच्या नावावर चाललेली दुकाने आणि लुबाडणूक कमी करता आली नाही तर निदान वाढवू तरी नका.
कालिदास वांजपे (कंपनी सेक्रेटरी), ठाणे

एकांगी विचारांचा पुरस्कार नको..
सर्वच धर्म मानवतेचा पुरस्कार करणारे आहेत. सर्वच धर्मग्रंथ पूजनीय आहेत. न्यायदेवताही धर्मग्रंथावर हात ठेवून साक्षीदाराकडून शपथ घेवविते. पण म्हणून त्यांपकी एकच ग्रंथ हा राष्ट्रीय म्हणून घोषित करणे शहाणपणाचे म्हणता येणार नाही.
 कारण राज्यव्यवस्था, नागरिकांची कर्तव्ये व त्यांचे हक्क, सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक कुवत यांचा राष्ट्रीय स्तरावर सर्वागीण विकास व्हावा म्हणून जी राज्यघटना तयार केली गेली आहे त्याउप्पर श्रेष्ठत्व दिलेला कोणताही ग्रंथ नसावा ही सर्वसामान्यांची अपेक्षा अगदी साहजिक आहे.
बायबल, कुराण, ग्रुरुग्रंथसाहेब आणि श्रीमद्भगवद्गीता हे सारे ग्रंथ जरी मानवतेच्या आचरणाकडे जाणारे असले तरी काही वेळा आपापल्या धर्मातील लोकांना धार्जिणी ठरणारी एकतर्फी तत्त्वे सांगणारे असू शकतात. आध्यात्मिकतेच्या पातळीवरून ईश्वरकृपा, अतिंद्रीय शक्ती, सुष्ट-दुष्ट प्रवृत्ती ठरवण्याची एकांगी दृष्टी, दुष्टांचा नायनाट करण्यासाठी योग्य नियम घालून दिलेले युद्ध आणि शत्रू हा केवळ शत्रूच असतो, त्यामुळे त्याच्या बाबतीत अहिंसेचा विचार बाजूला ठेवणे, हे विचार पेरले गेलेले असतात.
 त्यामुळे माणूस म्हणून जगताना जाती-धर्माच्या अदृश्य भिंतींनी माणुसकीला तडे जाऊ शकतात आणि एखाद्याला शत्रू ठरवण्याची विकृत प्रवृत्ती दृढ होऊ शकते.
– श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे

First Published on December 10, 2014 5:06 am

Web Title: readers response on loksatta news 15
Next Stories
1 हिंदू फंडाच्या फंदात पडताना..
2 मोदींवर कोणाचा दबाव?
3 आंबेडकरी चळवळीत आपण कधी सामील होणार?
X
Just Now!
X