News Flash

लोकमानस : ‘ओबीसी’ मूळचे नागवंशीयच!

ओबीसींच्या नियोजित ‘घरवापसी’ची बातमी (लोकसत्ता, २९ डिसें.) आणि त्यावरची संजय सोनवणी यांची प्रतिक्रिया (लोकमानस, ३० डिसें.) वाचली.

| January 2, 2015 12:17 pm

मी अथवा बहुजन समाज हा ‘नागवंशीय आहे’ किंवा नाही, याचे प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न संजय सोनवणी यांनी करू नये व त्या नादात द्वेषमूलक विधानेही करू नयेत. सोनवणी यांच्यासाठी नव्हे तर ओबीसी बांधवांसाठी हा खुलासा करीत आहे. ओबीसी कुटुंबांकडे राजस्थानातून भाट येतात, त्यांनीही नागवंशी असल्याचे पुरावे दिलेले आहेत. नागवंशींचाच सूर्यवंशी हा एक हिस्सा आहे. हे ‘अस्पर्श पूर्वीचे कोण होते’ या ग्रंथात दिलेले आहे. हे माझे व माझ्या सर्व सहकाऱ्यांचे धर्मातर नाही तर ‘स्वगृही परती’चा भाग आहे.
भारतातील बहुजन हे नागवंशी म्हणजेच एका अर्थाने आम्ही बुद्ध धम्माचा प्रचाराचा पायाच पक्का करीत आहोत. स्वयंस्फूर्तीने, स्वखुशीने येणारे आमच्याबरोबर आहेत. ज्यांना पटत नाही त्यांना आम्हीच घेणार नाही, हे धम्मच आम्हाला सांगतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समाजवंश शास्त्रज्ञ होते हे वेगळं सांगायला नको. त्यांनी ‘अस्पर्श मूळचे कोण’ या ग्रंथातील भाग तीनमध्ये अस्पर्शाच्या उगमाच्या जुन्या उपपत्ती, अस्पर्शतेचे मूळ वंशभेद, अस्पृश्यतेचे मूळ उद्योगधंदे यात नागवंशींचा पूर्ण इतिहास दिलेला आहे. यात ऋग्वेदातील उल्लेख देताना नाग हे फार पुरातन लोक होते. ते असंस्कृत किंवा वन्य लोक नव्हते. राजा कृष्णवर्मा यांच्या कदंब कुळाचा उगम नागांशी केलेला विवाह याचा पुरावा देवगिरी दप्तरात सापडतो. अश्वत्थामाचा विवाह नागवंशीय झाल्याचे शिलालेखातून स्पष्ट होते. गौतमी पुत्रनामक भारशिव नरेश भवनाग या नागवंशीचा झाला. द्वितीय चंद्रगुप्ताचा विवाह कुबेर नागाशी, कोक्किल प्राचीन राज्यात नाग मुलीशी विवाह, तसेच परभार नरेश सिंधुराज दहाव्या शतकात शशिप्रभा नावाच्या नागकन्येशी विवाहबद्ध झाला. १०३०-९७३ (विक्रम स. हर्षांच्या शिलालेखावरून प्रथम गुहाह
हा विग्रहराज हा नागवंशी होता. ओरिसातील कौमत वंशातील याचा विवाह नागवंशीच्या कन्येशी झाला. नागांचे भारतात बऱ्याच भागात शासन होते. राजे नागवंशीय होते. आंध्रप्रदेश सुरुवातीला नागलोकाचे होते. संपूर्ण महाराष्ट्र नागांचा होता. नाशिकचे शालिवाहन-सातवाहन हे पण नागवंशीय होते. याचा अखेरचा राजा पुलूमनी तसेच चुटू राजाच्या मुलीने नागपुरुष व शिवकंप नागश्री नावाचा मुलगा भेट दिला होता. सिलोन-सयाम बौद्ध परंपरेपुसार कराचीजवळ मजेरिक नागवेश होता.
पुराणे, प्राचीन शिल्पे, शिलालेखावरून उत्तर भारतातील अनेक राज्ये नाग राजाच्या आधिपत्याखाली होती. भारशिव तसेच अच्युत गणपती हे नागवंशीय होते. एकंदरीत समुद्रगुप्ताच्या काळापर्यंत सर्व नाग नावाचे राज्यशासन म्हणून होते.
नागाला आपण वंशाचा मूळ पुरुष मानून त्याची पूजा करणारी दुसरी नाग टोळी तक्षशिलेपासून वायव्य प्रांतापर्यंत आणि आसामपर्यंत सर्वत्र भारतात पसरलेली होती. या विषयावर सी.एफ. ओल्डहॅम म्हणतात की, द्रविडांचे विभाजन झाले, ते असुर होते, ते नागवंशी मानीत होते. हिमालयाच्या खोऱ्यात लोकही नागवंशींची पूजा करीत होते. सूर्यवंशी लोकही सर्व आपल्या वंशाला नाग ही मूळ देवता मानतात. नाग व दास हे एकच आहेत.
संपूर्ण भारतातील दस्यु व नागाची भाषा तामील होती. दस्यु हेच नाग लोक. ‘भारतात फक्त दोन वंश होते. एक आर्य व नाग’ असे पुरावे आहेत. दास हे दाहक राजा नागवंशी यावरून पडलेले आहे. हे सर्व अनार्य होते. या दासांना शूद्र बनविले.
पोटजात ही भारतीय समाजाचा मूलभूत घटक नसून कुटुंब हा मूळ घटक आहे. कूळ व गोत्रानुसार रोटीबेटी व्यवहार होत होता. त्या आधी टोळ्या होत्या. त्या टोळ्यांचे कूळ व गोत्र होते.
नाग लोक कोण होते? ते अनार्य होतेच, पण वैदिक परंपरा व नागवंशीमधील दोन विरुद्ध टोळ्यांच्या संस्कृतीमध्ये वैर होते. नाग लोक यज्ञयाग-कर्मकांड-अंधश्रद्धेला न मानता इंद्राला मानणारे होते. म्हणजेच ते बौद्ध धम्माशी जुळलेले होते. कारण आर्य व नाग हे दोन वंश त्या काळी असल्याचे डॉ. आंबेडकर सिद्ध करतात.
केळुसकर गुरुजींनी १९०८ साली तथागत गौतम बुद्ध हा ग्रंथ लिहिला, त्यातही त्यांनी भारतातील बहुजन समाज हा नागवंशी आहे असे लिहिलेले आहे. नालंदाचा नागनाथ हा ‘नागवंशीय’ होता. नागनाथ- मच्िंछद्रनाथ- गोरखनाथ- गहिनीनाथ-निवृत्तिनाथ- ज्ञानोबा ही गुरू-शिष्यांची परंपरा होती. समता- बंधुत्व- न्याय- करुणा, शील, प्रज्ञा हेच तत्त्वज्ञान मानीत असे, तसेच वारकरी संप्रदायांवरही समतेचे प्रभाव हा सर्व बुद्ध धम्माकडून आला.
बौद्ध काळातही जात होती हे म्हणणे अत्यंत अविचारी व द्वेषापोटी आहे. दास्य अर्थात शूद्र, अस्पर्श हे राजे-महाराजे, क्षेत्रीय, वैश्य होते. १८५ इ.स. पूर्व ब्रह्मदत्ताची हत्या पुष्पराज शृंगांनी केल्यावर जाती निर्माण झाल्या. बौद्धाच्या काळातही वैदिक परंपरेने वर्णव्यवस्था लादली होती. त्याविरुद्धच धम्म हा प्रभावी हत्यार आणून समता प्रस्थापित करून सर्वाना समतेत धम्माने आणले. त्या काळी कर्माने वर्ण ठरला जायचा, त्याला वर्णव्यवस्था म्हणायचे. उदा. कपडे शिवणारे शिंपी, धातूचे काम करणारे लोहार-सोनार, लाकडाचे काम करणारे सुतार, सूत कातणारे साळी, कापड विणणारे कोष्टी, रंग देणारे रंगारी ही त्यांची व्यावसायिक ओळख होती.
म्हणून सुमित भंगी, उपाली नाभिक ह्य़ांच्या व्यवसायावरून ओळख देणाऱ्या व्यवस्थेला वर्णव्यवस्था समाजमान्यता वेदाच्या रूपाने दिली गेली. म्हणून तथागत गौतमाने सुमित भंगी, उपाली नाभिक, अंगुलीमाल अश्या अनेकांना संघात उच्च स्थान वर्ण नष्ट करण्यासाठी दिले होते. परंतु पुष्पराज शृंगाने त्यावेळी अशा समतेला मानणाऱ्या बौद्ध-जैन त्याच्या अनुयायाची कत्तल करून प्रतिक्रांती केली व या नागवंशांच्या हातातील लेखणी-शस्त्र-धन काढून वर्णव्यवस्थेचे रूपांतर जातिव्यवस्थेत केले. हा सर्व इतिहास या संजय सोनवणी यांनी वाचावा.

 धर्मातराचे स्वातंत्र्य आहेच, तेव्हा तत्त्वांकडे अधिक लक्ष हवे
ओबीसींच्या नियोजित ‘घरवापसी’ची बातमी (लोकसत्ता, २९ डिसें.) आणि त्यावरची संजय सोनवणी यांची प्रतिक्रिया (लोकमानस, ३० डिसें.) वाचली. गेल्या तीन वर्षांपासून ‘ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर’ ही चळवळ सुरू आहे. तिला ओबीसी समाजाच्या सर्व स्तरांतून व्यापक पािठबा मिळू लागला असून धर्मातर करू इच्छिणाऱ्या अनेकांनी रीतसर नोंदणीही सुरू केली आहे. परंपरेने पदरात पडलेला धर्म चिकित्सापूर्वक नाकारण्याचे आणि आवडेल असा दुसरा कुठलाही धर्म विचारपूर्वक स्वीकारण्याचे स्वातंत्र्य हे खुद्द राज्यघटनेनेच प्रत्येक नागरिकाला बहाल केलेले असल्यामुळे धर्मातराला विरोध करणे म्हणजे एका अर्थाने राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या व्यक्तीच्या धर्मस्वातंत्र्याला विरोध करण्यासारखे ठरते. याची कल्पना असल्यामुळे संजय सोनवणींसारखे लोक तो मार्ग न अवलंबता ओबीसींचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करीत आहेत. चातुर्वण्र्यव्यवस्थेचे समर्थक आजवर जे करीत आले, तेच सोनवणी करीत आहेत. बौद्ध धर्म स्वीकारणे चांगले की वाईट, या मुख्य मुद्दय़ावर चर्चा न करता ते भलतेच मुद्दे उपस्थित करून दिशाभूल करू पाहत आहेत. ‘लाखो ओबीसींसह मी २०१६ साली धर्मातर करणार’ असे उपरेंनी वारंवार जाहीर करूनही ‘पाहा, उपरेंनी अजूनही धर्मातर केलेले नाही’ असा शंकास्पद प्रचार सोनवणी का करतात, हे कोडेच आहे! वास्तविक, सोनवणी आणि तत्सम मंडळींकडे वैदिक िहदू धर्माला एखादा सक्षम पर्याय असेल आणि तो बौद्ध धर्माइतका तत्त्वज्ञानसमृद्ध असेल तर त्यांनी तो सांगावा! वैचारिकदृष्टय़ा तो पुरेसा प्रगल्भ आणि आधुनिक काळाला सुसंगत असेल तर जागृत लोक तोही स्वीकारण्याचा विचार करतील! स्वत:ही काही करायचे नाही आणि दुसरा काही करू पाहत असेल तर त्याला खोडा घालायचा प्रयत्न करायचा, हे कशासाठी?
बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान हे व्यक्तिस्वातंत्र्य, समता, बंधुभाव, बुद्धिप्रामाण्य, विवेकवाद यावर आधारित आहे. यापकी कोणतीही गोष्ट िहदू धर्मात नाही म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी िहदू धर्माला रजा देऊन बौद्ध धर्म स्वीकारला आणि आता हनुमंत उपरे तीच भूमिका घेऊन त्याच मार्गाने जात आहेत. बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्याचे तत्त्वज्ञान प्रामाणिकपणे अंगीकारले तर माणसाची हळूहळू का होईना उन्नतीच होईल; परंतु िहदू धर्माचे तत्त्वज्ञान अंगीकारण्याने उन्नती तर सोडाच, अधोगतीच होणार आहे आणि याची पुरेपूर प्रचीती व अनुभूती घेऊन झाली आहे! दुसरी गोष्ट म्हणजे, भारतीय बहुजन समाज हा मुख्यत: नागवंशीय आहे आणि याच समूहाने प्रारंभीच्या काळात बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता हे ऐतिहासिक सत्य खुद्द बाबासाहेबांनीच मांडले होते. बौद्ध धर्माला शह देण्यासाठी नंतरच्या काळात वैदिकांचे वर्चस्व असलेला एक धर्म क्रमाक्रमाने उदयाला आला, ज्याला फार अलीकडेि हिंदू हे नाव मिळाले, हीदेखील वस्तुस्थितीच होय. त्यामुळे आज स्वत:ला हिंदू समजणारा ओबीसी समाज मूळचा बौद्ध होता, ही मांडणी रास्तच म्हटली पाहिजे.
ओबीसींनी १९५६ सालीच बाबासाहेबांचे ऐकले असते तर आज सामाजिक चित्र वेगळे आणि चांगले दिसले असते. तसे झाले नाही म्हणून उपरेंना हे सारे नव्याने मांडावे लागते आहे. यात भावनिक गोष्टी निर्माण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आज सर्व वंशांमध्ये सरमिसळ झालेली दिसत असली आणि शुद्ध स्वरूपात कोणताही वंश (वा समूह) शिल्लक राहिला नसला तरी त्याचा अर्थ प्राचीन काळी वेगवेगळे वंश (वा समूह) नव्हतेच, असा होत नाही. अर्थात तरीही, उपरे हा मुद्दा अनुषंगानेच मांडतात आणि मुख्य भर बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानावरच देतात. परंतु यातले काहीच लक्षात न घेता सोनवणी टीका करीत आहेत.  
बौद्ध धर्माचा स्वीकार केल्या केल्या लगेच जातीपाती नष्ट होतील असा स्वप्नाळू आशावाद कुणीच बाळगत नाही. बाबासाहेबही नाही, रूपा कुळकर्णीही नाही, सुरेश भटही नाही आणि आता हनुमंत उपरेही! जातीपाती नष्ट होत नाहीत म्हणून जातीपाती नष्ट करण्याची भूमिका व क्षमता असलेले तत्त्वज्ञानच स्वीकारायचे नाही आणि याचा परिणाम म्हणून जातीपातींचे उघड समर्थन करणारे जे तत्त्वज्ञान ‘धर्म’ म्हणून समाजाच्या बोकांडी बसले आहे ते तसेच राहू द्यायचे, हे समीकरण अनाकलनीय आहे!
मारुती कुंभार,  मुंबई

भारतीय उद्योगपतींची वृत्ती सरंजामीच
नव्या जमीन धारणा कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत हे मान्य. त्याचबरोबर आधीचा कायदा उद्योगांचे थडगे बांधणारा होता हेही मान्य. जुना कायदा तर आपल्या संविधानातून वगळल्या गेलेल्या संपत्तीच्या मूलभूत अधिकारालाच जवळपास परत आणणारा होता. काँग्रेस सरकार असलेली राज्येही याबद्दल नाराज होती. पण हे असे- आधुनिक जगात मूर्ख वाटणारे- कायदे आलेच कसे, याचा कोणी विचार करते का? आपण भांडवलशाहीचा गुणगौरव करतो आणि पाश्चात्त्यांनी कशी प्रगती केली याचा दाखला देतो. पण युरोपात, अमेरिकेत किंवा ऑस्ट्रेलियात जर कुठे जमिनीत सोनं, कोळसा किंवा अगदी हिरे मिळाले किंवा ती जमीन काही उद्योगांसाठी घेतली गेली की जमिनीचा मूळ मालक नुकसानभरपाई तर मिळवू शकतोच, शिवाय तो त्या उद्योगात भागीदारही बनू शकतो. आपल्या उद्योगपतींची ही मानसिकता आहे का? आपले उद्योगपती सरंजामी वृत्तीचे आहेत. सरकारचे आधी बोट आणि पुढे बखोट धरून सरकारलाच दलाली करायला लावायची आणि त्यातून लाभ पाडून घ्यायचा.
या क्रॉनी (कुडमुडय़ा) भांडवलशाहीमुळेच मागास तत्त्वे असलेल्या जयराम रमेश यांच्यासारख्यांचा फायदा होतो आणि जुनाट कायदे येतात. नव्या कायद्यात किमान याचा तरी विचार व्हावा.
सौरभ श्रीपाद गणपत्ये, ठाणे

वादाची कारणे निराळीच
‘जीएम बियाणेही आपले हवे’ या लेखात  प्रदीप चव्हाण लिहितात की विशिष्ट ट्रान्सजेनिक पिकांमध्ये कीडनाशक गुण वापरण्यातील जोखीम आणि सर्वसाधारण जनुक-अभियांत्रिकीच्या तंत्रज्ञानामधील धोका, असे दोन प्रकारचे वाद आहेत. वास्तव असे आहे की, जीएम पिकांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांपकी बहुतेकांचा जेनेटिक्स विषयाचा काहीही अभ्यास नसल्याने वाद वेगळेच आहेत. पहिला – पर्यावरणवादी आंदोलने करणारे बहुतेक गट डाव्या विचारसरणीचे असतात व डाव्यांचा बहुराष्ट्रीय (विशेषत अमेरिकन) कंपन्यांना विरोधच असतो. दुसरा- भारत मागासलेला राहावा याकरिता भारतातील स्वयंसेवी संस्थांना हाताशी धरून आंदोलने करविली जातात, यात आता आश्चर्याचा धक्का बसण्यासारखे काहीही नाही. तिसरा – आपली थोर पर्यावरणवादी अशी प्रतिमा उभी करणे, गोंजारणे.  
चेतन पंडित

‘शिकार’ टाळण्यासाठी..
‘अल काइदाची शिकार कोण?’ हा आनंद करंदीकर यांचा लेख (१ जानेवारी २०१५) सकारात्मक आहे. त्या संदर्भात आणखी काही गोष्टींचा विचार आवश्यक आहे असे वाटते.
बजाजी निम्बाळकर व नेताजी पालकर यांना परत िहदू धर्मात सामावून घेण्यासाठी छत्रपती शिवरायांनी त्या वेळच्या धर्मसत्तेला चांगलेच खडसावले. काश्मीरच्या िहदू राजाला जेव्हा तेथील मुसलमानांनी परत िहदू धर्मात घ्यायची विनंती केली, तेव्हा काश्मिरी पंडित राजाच्या विरोधात उभे ठाकले आणि हे पूर्वाश्रमीचे िहदू मुस्लीमच राहिले व आज आपण ‘काश्मिरी पंडित विस्थापित झाले’ म्हणून गळा काढतो! स्वा. सावरकर ‘सहा  सोनेरी पाने’ या पुस्तकात म्हणतात की, ‘उत्तर भारतातील असंख्य मुसलमान मराठय़ांकडे आशेने पाहत होते की, मराठे आपल्याला परत हिंदू धर्मात घेतील. पण त्यांची निराशा झाली.’
या सर्व गोष्टींचा विचार करता करंदीकर म्हणतात त्याप्रमाणे दहशतवाद्यांच्या आहारी न गेलेल्या येथील बहुसंख्य मुसलमानांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. त्याच जोडीला ज्यांना खुद्द िहदू समाजात फारसे स्थान नाही अशा बजरंग दलसारख्या संघटनांनाही आवर घातला पाहिजे.
अभय दातार, ऑपेरा हाउस (मुंबई)

.. मग जीएम इन्शुलिनवरही बंदी घाला!
‘जीएम बियाणेही आपले हवे’ या लेखात (लोकसत्ता, ३१ डिसेंबर) जणू उत्क्रांतीदेवीच्या मांगल्यामुळे, ‘आज अनेक जीव गुण्यागोिवदाने परस्परविश्वासाच्या तत्त्वावर नांदत असतात’ असे प्रदीप चव्हाण म्हणतात. एखादे हरीण ‘गडय़ांनो तुम्ही पळा. मी थांबतो. बिचारा वाघ खरोखरच भुकेला आहे,’ असे म्हणताना त्यांनी ऐकले असावे. साऱ्या प्रजाती ‘उत्क्रांतीदेवी’ने ‘ठरवून दिलेल्या’ भूमिकेचे उल्लंघन करीत नाहीत. माणूसच काय तो ओरबाडणारा! गुरांना व शेळ्यांना गवत ओरबाडण्याच्या भरात कोवळे कोंब खाऊ नयेत हे कळत नाही, म्हणून तर अण्णा हजारे यांना ‘चराईबंदी’ची घोषणा द्यावी लागली. मानवाने नसíगक संतुलनात बिघाड निर्माण करण्याचे सर्वात मोठे कारण प्रचंड लोकसंख्या वाढ हेच आहे. एरवी अशी अति वाढलेली प्रजाती नष्ट झाली असती.   
चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे मानवानेही ‘नॅचरल सिलेक्शन’ची चाचणी देऊन मुकाटय़ाने नष्ट व्हायला काहीच हरकत नाही. जर पाश्चात्त्यांनी शोधलेले लसीकरण व अँटिबायोटिक वापरले नाही तर ‘एलिमिनेट’ होण्याचे स्वातंत्र्य आहेच की!  
चव्हाण जनुक अभियांत्रिकीला ते झटपट उत्क्रांती म्हणतात, पण डोळस उत्क्रांती का म्हणत नाहीत? ‘वीड’ (तणसुद्धा) हा शब्द माणसानेच तयार केला आहे, हे खरेच. पण मग ‘राष्ट्र’ हा शब्द काय निसर्गातच होता की काय? टाचेची कातडी आणि मेंदूची पेशी एकाच जीनोमने बनते याचा ‘जीएम’शी काय संबंध? लेखकाला भिववणारे, ‘परिवर्तनात फेरगठित होणारे हॉट-स्पॉट किंवा सुप्तावस्थेत असलेले विषाणुवत जनुकीय द्रव्य’ या गोष्टी बिगरजीएममध्ये नसतात की काय? जीएममध्येच असे कोणते आक्रीत घडते की जे इतरत्र नसते, हे लेखकाने सांगावे. कच्ची भाजी खाल्ली जाते याची लेखकास काळजी वाटते ती मात्र योग्य आहे. त्या भाजीवर कोणकोणते कृषिजिवाणू नांदत असतील कोण जाणे! सेंद्रिय शेतीत तर अर्निबध जनुकांतर होण्याचा धोका सर्वाधिक आहे.
जनुकसंग्रहातील वैविध्य हे एरवी नामशेषच होत होते. या खेळात जाणता मानव उतरल्यापासून मानवच नमुने जपून ठेवत आहे. बियाणे कीडविरोधक बनवताना त्या फळाची/भाजीची विशिष्ट चव नष्ट करण्याची कोणतीही गरज नसते. भारतातील गरजा, जमीन, हवामान वगरे पाहून, भारतीयांनीच तयार केलेल्या बियाणांना, फक्त जीएम तंत्राची जोड देण्याचा प्रश्न आहे. ते तंत्रही ज्यांनी आत्मसात केलेले आहे अशा भारतीयांच्याच चाचण्यांवर भारतीयांनीच बंदी लादली आहे. विदेशी बियाणे चोरून वापरण्यावर मात्र बंदी नाही!
‘देशाभिमान असला की कोणतेच तंत्र वाईट नसते’ असे चव्हाण म्हणतात. अहो, अणुबॉम्ब हे तंत्र देशाभिमान्यांचेच तर अपत्य आहे! आज आपण सारे भारतीय ई-कोलाय नावाच्या जंतूत मानवी जनुक पेरून बनवलेले मानवी इन्शुलिन घेत असतो व हेही तंत्र ‘आपल्याला’ सापडलेले नाहीच. त्या बिचाऱ्या जंतूचे ते नसíगक कार्य थोडेच आहे? मग इन्शुलिनवरही बंदी घालणार काय?               
राजीव साने, पुणे
जीएम बियाण्याबद्दल भीतीच्या मुद्दय़ांना उत्तरे आहेत..
प्रदीप चव्हाण यांनी जी. एम. बियाणावर काही मुद्दे समतोलपणे मांडले आहेत, पण काही मुद्दय़ांबद्दल प्रतिक्रिया नोंदवणे आवश्यक आहे.
(१) मानवी प्रगतीत मानवाला केंद्रस्थानी धरूनच बाकीची रचना करावी लागते. जी.एम. संशोधनातही माणसाची गरज आणि सुरक्षितता हीच केंद्रस्थानी आहे.
(२) सस्तन प्राण्यांच्या दोन पिढय़ांवर प्रयोग झाले पाहिजेत, हे त्यांचे म्हणणे बरोबर आहे, पण असे जनुक आपल्याला ज्ञात असलेल्या अ‍ॅलर्जकि व विषारी पदार्थाच्या डाटाबेसची छाननी करून सुरक्षितता तपासूनच पुढे जाते. एखादा जैवरासायनिक पदार्थ इंद्रियांवर किंवा गर्भावर दुष्परिणाम करीत असेल तर त्याचे परिणाम कळायला काही वष्रे जावी लागतात ही गोष्ट खरी आहे. शिजवल्याक्षणी जनुक विघटित होते हे आहेच, पण पालेभाज्या कच्च्या खाल्ल्या तरी जठरात/आतडय़ांत पेशींचे व प्रथिनांचे पचन-विघटन होत असल्याने शरीरांतर्गत पेशींना जनुकस्वरूपाने काही हानी पोचणे असंभव आहे. जनुकीय अभियांत्रिकी पूर्वीसारखी अनमानधपक्याची राहिलेली नाही हा त्यांचाच मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे.
(३) बीटी कापूस लावताना इथून पुढे २० टक्केसाधे बियाणे जी.एम. बियाणाच्या पिशवीतच मिसळले जाईल. आजही तुरीच्या आंतरपिकानेही हेच काम होते.
(४) बीटी वांग्यामुळे सर्वच लोक एकच वाण लावतील ही भीती खरी नाही, कारण भारतातल्या कंपन्या बीटी जनुक निरनिराळ्या प्रचलित वाणांमध्ये घालून देणार आहेत.
(५) भारताचे जैववैविध्य जी. एम.मुळे धोक्यात येण्याचा संभव नाही, कारण जी. एम. तंत्रज्ञान पिकांसाठीच आहे. जंगली वनस्पतींचा त्याचा संबंध नाही. तसेही बहुतेक पिके जंगलात किंवा निसर्गात तग धरू शकत नाहीत. या पाळीव वनस्पती मानवी आधारानेच वाढू व तगू शकतात.
(६) बहुराष्ट्रीय कंपन्या फायदा मिळवतात, त्यामुळे प्रगतिशील देशाची गळचेपी होईल हा आक्षेप खरा नाही. उदा. बीटी कापसाने भारतात वाढीव उत्पन्न सुमारे ५० हजार कोटींचे झाले (व्हॅल्यू अ‍ॅडिशनसहित ५ लाख कोटी), त्यातील सुमारे ४०० कोटी त्या जनुक-कंपन्यांना रॉयल्टीपोटी मिळाले. केवळ बहुराष्ट्रीय कंपन्यांचा फायदा असेल तर कोण कशाला असे पीक लावील? भारत सरकारच्या संशोधन संस्था आणि भारतीय कंपन्याही जी. एम. तंत्रज्ञानावर संशोधन करीत आहेत. ती बहुराष्ट्रीय कंपन्यांचीच मक्तेदारी नाही.
(७) काळ्या ज्वारीचा उपयोग मद्य बनवण्यासाठी होऊ शकतो, तसा चांगल्या धान्याचाही होईल ही भीती व्यर्थ आहे, कारण चांगल्या धान्याची किंमत मोजावी लागेल (चोरीचा मुद्दा वेगळा). यामुळे उलट मागणी वाढून ज्वारीची शेती परवडायला लागेल. या लेखामुळे जी. एम. पिकांबद्दल होत असलेल्या अपप्रचाराची तीव्रता कमी होईल अशी आशा वाटते.
– डॉ. श्याम अष्टेकर, नाशिक

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 12:17 pm

Web Title: religious conversion freedom
Next Stories
1 दारिद्रय़ाचे भेदक चित्रण!
2 प्रादेशिक असमतोल आणि विदर्भ यांवर पवार यांचा खरा रोख!
3 गंभीर चर्चेची संधी हुकली
Just Now!
X