सद्गुरू हाच माझ्या जीवनाचा खरा सूत्रधार आहे, पण तो खरा सद्गुरू मात्र हवा, असं हृदयेंद्र ठामपणे म्हणाला.
दादासाहेब – अगदी बरोबर! चांगल्या वैद्याच्या हातून मरण बरे, पण भोंदू वैद्याच्या हातून बरे होणे नको, असं म्हणत, ते उगीच नाही! भोंदू वैद्याच्या हातून लहानसा आजार बरा झाला तरी त्याच्यावरच्या विश्वासापायी जन्मभर रुग्णाईतही रहावं लागेल!
ज्ञानेंद्र – पण खरा सद्गुरू कोण, हे ओळखायला स्वत:मध्ये शुद्ध ज्ञानाचा अंश तरी लागेलच ना?
हृदयेंद्र – पण म्हणूनच आधी भगवंतावर पूर्ण विश्वास हवा, त्याच्यावर सोपवून त्याची भक्ती करीत राहिलो तरी मग तोच खऱ्या सद्गुरूपर्यंत मला पोहोचवेल! आणि भक्ती जर खरी असेल तर मग खऱ्या आणि भोंदू गुरुची जाणीव स्वत:लाच होईल..
ज्ञानेंद्र – म्हणजे आधी भक्ती साधा, ती शुद्ध झाली पाहिजे, मग ज्ञान आपोआप होणार.. आणि आधी भक्ती मग ज्ञान, हा क्रम तरी स्वीकारार्ह कशावरून? मी ज्याची भक्ती करतो, त्याच्या सच्चेपणाचं ज्ञान आधी झालं तरच मग भक्ती खरी होईल ना? तेव्हा आधी ज्ञान असलं पाहिजे.
बुवा – हा वाद कधीच न संपणारा आहे! पण नाथांच्या अभंगाचा दाखला द्यायचा तर भक्ती आधी आहे..
ज्ञानेंद्र – पण एकनाथ महाराज भक्त होते म्हणून ते भक्तीची महती गातीलच, एखाद्या ज्ञान्याचं उदाहरण का घेत नाही?
हृदयेंद्र – (हसत) पण एकनाथी भागवतात ज्ञान नाही का? आधी अभंग तर ऐक..
बुवा – पूर्ण म्हणत नाही, ऐका.. भक्तीचे उदरीं जन्मलें ज्ञान। भक्तीने ज्ञानासी दिधले महिमान।। भक्ति तें मूळ ज्ञान तें फळ। वैराग्य केवळ तेथींचें फूल।। फूलफळ दोनी येरयेरा पाठीं। ज्ञानवैराग्य तेविं भक्तीचे पोटीं।। भक्तीविण ज्ञान गिंवसती वेडे। मूळ नाहीं तेथें फळ केविं जोडे।। भक्तियुक्त ज्ञान तेथें नाहीं पतन। भक्तिमाता तया करितसे जतन।। तेव्हा भक्तीच्या पोटी ज्ञान जन्मतं आणि त्या भक्तीनं ज्ञानाचा महिमा वाढतो. भक्ती मूळ आहे, ज्ञान फळ आहे.. या दोहोंच्या संयोगाने जे वैराग्य वागण्यात आपोआप उतरतं ना ते या जीवनवेलीवरचं फूल आहे! जे मूळ नाकारतात ते रोप कसं लावतील? मग फळ कसं मिळवतील? किंवा झाडं लावलंय, पण मुळांकडेच लक्ष दिलं नाही, मुळांनाच पाणी दिलं नाही तरी झाड जगेल का? फळ येईल का? तेव्हा भक्तियुक्त असं जे ज्ञान त्यानं कधी पतन होत नाही..
ज्ञानेंद्र – विठोबादादा रागावू नका.. पण जिथे भक्ती असते तिथे भोंगळपणाच असतो. अंधश्रद्धाच असते. तिथे ज्ञान कसं असेल?
हृदयेंद्र – ज्ञान्या तू सांगतोयस ते सार्वत्रिक नाही.. आता मला सांग, मीराबाई यांना तू ज्ञानी मानतोस की भक्त?
ज्ञानेंद्र – भक्त म्हणून त्या प्रसिद्ध आहेत, आता त्यांचा ज्ञानाचा एखादा अभंग हा प्रतिवाद होऊ शकत नाही..
हृदयेंद्र – प्रतिवाद म्हणून नाही, पण भक्तीतून ज्ञान कसं सहज प्रकटतं, याचा दाखला पहा. त्या एका भजनात म्हणतात- माई मैंनो लियो है सांवरिया मोल। कोई कहै कारो, कोई कहै गोरो, मै तो लियो है अंखियां खोल!
बुवा – फार छान! बाई मी विकत घेतला श्याम!
हृदयेंद्र – वस्तु विकत घेताना ती पारखून घ्यावी लागते ना? तसं मीराबाई म्हणताहेत मी या भगवंताला विकत घेतलंय. कोणी म्हणतात तो काळा आहे, कोणी म्हणतात तो गोरा आहे, मी मात्र डोळे उघडे ठेवून त्याला विकत घेतलंय! म्हणजे जे त्याला काळा म्हणतात आणि जे गोरा म्हणतात त्यांनी डोळे उघडून त्याला आधी पाहिलंच कुठे आहे? तेव्हा सावता माळी महाराज ज्या विठ्ठलाला धुरीण मानतात, त्याच्या धुरीणत्वाचं त्यांना स्पष्ट ज्ञान आहे! म्हणून त्याला ते संसाराच्या आसक्तीचा नाश करायला सांगतात..
बुवा – म्हणून समर्थही काय मागतात? ‘प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी। अचळ भजनलीळा लागू दे आस तूझी।।’ प्रचलित बुद्धीला भजनाची आस लागणारच नाही! ‘करी संसाराची बोहरी’ हे सावता माळी महाराजांचं मागणं आणि ‘प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी’, हे समर्थाचं मागणं एकच आहे! किंबहुना सर्वच संतांचं हेच मागणं आहे! आणि जो जे देऊ शकतो तेच त्याच्याकडे मागणं हे खरं ज्ञान आहे! जो अज्ञानातून मला सोडवू शकतो त्याला तसं साकडं घालणं हेच ज्ञान आहे!!
चैतन्य प्रेम