‘मनोहर जोशींची ठाण्याचीही तयारी!’ (२६ सप्टेंबर) आणि उद्धव यांनी काय सांगितले याबद्दलचे   (२७ सप्टेंबर) वृत्त वाचले. जोशींनी वयाची पंचाहत्तरी ओलांडली आहे. एका मोठय़ा राज्याचा मुख्यमंत्री, लोकसभेचे अध्यक्षपद अशी अत्यंत उच्च पदे भूषविलेल्या जोशींनी आताही साध्या खासदारकीची उमेदवारी मिळायला अशा स्तराला जावे हे योग्य वाटत नाही. स्वत:  शिवसेनाप्रमुखांनीच एकदा इतक्या वृद्ध नेत्यांनी पदे घेऊ नयेत, निवृत्त व्हावे अशी भूमिका घेतली होती हे जोशीसर त्यांच्या निधनानंतर इतक्या लवकर विसरले काय? शिस्तबद्ध सनिक असल्याचे ते म्हणतात तर एखादे पद असल्याशिवायही आपल्या संघटनेचे कार्य ते करू शकतील. ही जुनी खोडे अशीच चिकटून राहिली तर नव्या रक्ताला वाव कसा आणि कधी मिळणार? जोशी हे मुळात शिक्षक! आताही त्यांनी प्रत्यक्ष राजकारणातून निवृत्ती घेऊन आपल्या तरुण कार्यकर्त्यांना चांगल्या अर्थाने राजकारण/ समाजकारण करण्याचे पाठ द्यावेत. लोकांनी ‘पुरे’ म्हणण्यापेक्षा आपण होऊन मानाने निवृत्त होणे यातच शहाणपणा आहे हे त्यांना खरे तर सांगायला नको .              
राम ना. गोगटे, वांद्रे (पू.)

‘मातोश्री’चा उंबरठा कशासाठी झिजवताहात?
‘दक्षिण-मध्यमधून लढायला उद्धव यांनीच सांगितले’  ही बातमी  वाचली. सध्या मनोहर जोशी यांना नक्की झाले आहे तरी काय? वयाच्या ७६व्या वर्षी लोकसभा उमेदवारीसाठी ते इतके उतावळे का झाले आहेत ते समजत नाही. सच्चा शिवसनिक व बाळासाहेबांचे लाडके आणि आज्ञेत असणारे जोशी यांची महापौर, मुख्यमंत्री ते लोकसभेचे अध्यक्ष अशी झालेली राजकीय व विविध व्यवसायांतून झालेली आíथक प्रगती हा महाराष्ट्र अभिमानाने पाहत आहे. असे असताना बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या ऋणातून थोडेसे उतराई होण्याची संधी त्यांच्या स्मारकासाठी आपली दादर येथील कोहिनूरचा एक छोटासा कोपरा न देऊन जोशी यांनी गमावली आहे. तेच जोशी आपली उमेदवारी दादरमधून कायम राहावी म्हणून आता ‘मातोश्री’चा उंबरठा काय म्हणून झिजवत आहेत? राजकारणातून निवृत्ती ठरावीक वय झाल्यावर घेणे आवश्यक आहे, हे बाळासाहेबांचे विचार शिरसावंद्य मानून जोशी यांनी राजकारणातून सक्रिय निवृत्त व्हावे. पुढे आपल्या कोहिनूर क्लासेसमधून आदर्श राजकारणी तरुण घडवण्याचे वर्ग घ्यावेत. असे केल्यास स्वत: एक यशस्वी महाराष्ट्रीय राजकारणी असे आणखी चांगले तरुण राजकारणी समाजासाठी घडवू शकतो, असे उदाहरण पंतप्रधानपदासाठी अनेक वर्षे गुडघ्याला बािशग बांधून वाट बघणाऱ्या इतर समवयस्क नेत्यांसाठीही ठेवू शकतो.
– प्रवीण आंबेसकर, ठाणे</strong>

वेतन आयोगाचा निर्णय चुकीचा नाही
‘पंतप्रधानांची दौलतजादा’ हा अग्रलेख (२७ सप्टेंबर) वाचला. वेतन आयोग नेमणे व वेतनश्रेणी लागू करणे यात फरक आहे. मागील आयोग कधीही नेमले गेले तरी त्यांची अंमलबजावणी ही नेहमी पूर्वलक्षी प्रभावानेच झाली आहे. अंमलबजावणीनुसार दोन वेतन आयोगांमधील कालावधी हा नेहमीच १० वष्रे राहिला आहे. त्यामुळे या निर्णयाची थोडी घाई झाली असली तरी हा निर्णय चुकीचा नाही.
आपण वाजपेयींचा संदर्भ दिला आहे म्हणून आठवण करून द्यावीशी वाटते. भाजपच्या निवडणूकपूर्वीच्या ‘इंडिया शायनिंग’जाहिरातबाजीचा आणि त्याआधी सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या गेलेल्या ५० टक्के  महागाई भत्ता एकत्रित करण्याच्या निर्णयाचा विसर संपादकांना पडलेला दिसतो. सहावा वेतन आयोग २००६ साली लागू होणे अपेक्षित असताना त्या आयोगाची स्थापना पुढे ढकलली गेली. चार वर्षांची थकबाकी देताना सरकारांच्या तोंडाला फेस आला. भाजपने सहाव्या आयोगाची स्थापना पुढे ढकलून वेळ मारून नेली. त्यामुळेच सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा अतिरिक्त बोजा सर्वच सरकारांवर आला. हे म्हणजे भाजपने थकवलेल्या कर्जाचा हफ्ता नंतरच्या सरकारांनी फेडण्यासारखे झाले. सरकारी तिजोरीवरील भाराबद्दल बोलायचे झाले तर या भाराला कर्मचाऱ्यांच्या पगारापेक्षा भ्रष्टाचारांची कोटीच्या कोटी उड्डाणे कारणीभूत आहेत. तसेच खाजगी क्षेत्रात लोकांनी पगारवाढ न मागता वर्षांनुवष्रे काम केल्याचे ऐकिवात नाही.
संजय रावत

राम नाईकांचे अभिनंदन!
माजी मंत्री राम नाईक निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होत असल्याची बातमी वाचली. नाईक यांचे या ठाम भूमिकेबद्दल अभिनंदन. वयाची सत्तरी उलटल्यावर ज्येष्ठांनी कार्यकारी भूमिकेतून निवृत्त होणे श्रेयस्कर, कारण यानंतर माणसाची शारीरिक, बौद्धिक व मानसिक सक्षमता कमी होते. तरीही ज्येष्ठांनी यानंतर मार्गदर्शकाच्या भूमिकेतून कार्यरत राहावे. त्यामुळे त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा पुढच्या पिढीला उपयोग होईल व प्रत्येक वेळी स्वतंत्र ठेच खाण्याची वेळ काही प्रमाणात टळेल. सर्वच पक्षांतील वयाची सत्तरी उलटलेल्या ज्येष्ठांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होऊन प्रगल्भतेचे उत्तम उदाहरण आपल्या वागण्यातून घालून द्यावे व आपला मान राखून घ्यावा.
ज्योती जपे, ठाणे

किती सहन करायचे हल्ले?
‘दहशतवादी हल्ला’  हे वाचून आज भारतीय नागरिकांचे रक्त खवळते आहे. किती म्हणून सहन करायचे? असे हल्ले हे तर नित्याचे झाले आहेत. सीमेवरील आमचे सनिक विनाकारण मृत्यूच्या दाढेखाली ढकलले जात आहेत. का? त्यांना आक्रमण करण्याचे पूर्ण आदेश असूनही शासनाने त्यांचे हात बांधून ठेवले आहेत.
आम्ही सहन करणार नाही, जशास तसे उतर देऊ, आम्हाला शहीद झालेल्या भारतीय जवानांबद्दल सहानुभूती आहे, शहीद जवान व पोलिसांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी अख्खा देश आहे. या सर्व बाबी आणि शब्द आमचे पंतप्रधान आणि  गृहमंत्री यांचेच आहेत ना? मग हे का? आमच्या देशावर कितीही हल्ले झाले तरी आम्ही पाकशी चर्चा चालूच ठेवणार. आपण जनता फक्त वृत्तपत्रातील बातम्या वाचणार व दोन दिवसांत लगेच विसरून जाणार. मग पुन्हा  एकदा दहशतवादी हल्ला..
-दिलीप साटम, सांताक्रूझ

मोठी जीवित हानी झाल्यावरच चित्रनगरीकडे लक्ष देणार?
दोन दिवसांपूर्वी फाळके चित्रनगरीतील ‘कॉमेडी विथ कपिल’च्या सेटला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाचे जवान जिवाची पर्वा न करता त्या आगीत शिरले होते.  ज्याचा धावा आम्ही अर्धा तास करत होतो, त्या देवाने कुठून तरी जोराचा वारा आमच्या सेटच्या बाजूने पाठवला होता. तो आग विझेपर्यंत वाहत होता आणि त्यामुळे त्या आगीच्या ज्वाळा आमच्या सेटच्या विरुद्ध बाजूला जात होत्या. कपिलचा सेट खाक झाला आहे. त्याबद्दल किंवा त्यांच्याबद्दल दु:ख वाटेवाटेपर्यंत पुन्हा उलटसुलट बातम्या यायला लागल्या.. आग लागली की लावली?.. चित्रनगरीमध्ये अशा घटना नवीन नाहीत. खूपदा असे झालेय.. काही वेळा देव धावलाय, काही वेळा नाही, एवढाच काय तो फरक.
चित्रनगरीच्या ४५० एकर जागेमध्ये काय करायला हवे हे नमूद करणारे पत्र मी मुख्यमंत्र्यांसह सर्व संबंधितांना दिले होते. अनेकदा बोलण्याचा प्रयत्नही केला, परंतु  अजून आगी आणि मोठी जीवितहानी झाल्याशिवाय जाग येणार नाही असे वाटते.  खड्डे पडलेले रस्ते, वारंवार वीज गायब होते, गढूळ पाणी, सुरक्षेचा बोजवारा, घाणीचे साम्राज्य, सेटबांधणीचे नियोजन नसणे अशा असंख्य गोष्टींचे काळे ढग तिकडे अविरत वाहतायत.
मधल्या काळात तर चित्रनगरीच्या प्रत्येक झाडावर एक सूचना फलक लागला होता. त्यावर लिहिले होते- सावधान, इकडून बिबटय़ा येतो. हा फलक पाहून हसावे की रडावे हेच समजत नव्हते. हजारो लोक भरपूर भाडे देऊन तिकडे काम करत असतात आणि रात्री दिवे नसलेल्या चित्रनगरीच्या रस्त्यावरून फिरत असतात, घरी जात असतात, त्या वेळी जर एखाद्या बिबटय़ाने हल्ला केला आणि एखाद्याचा प्राण गेला तर संबंधित लोक काय म्हणणार.. आम्ही फलक लिहिला होता. फलक लिहिणारे आणि अशा गोष्टींवर चर्चा करणारे आपआपल्या गाडय़ांमध्ये बसून जातात-येतात, मग त्यांनी स्वत: फलक वाचला काय, बिबटय़ा आला काय किंवा गेला काय.. काय फरक पडतो? संबंधित लोकांनी सगळ्यांना रेड कार्पेट द्यावे असे म्हणणे नाही, परंतु गरजेच्या गोष्टी आणि सुरक्षिततेच्या गोष्टी, भाडे भरूनही आम्ही शासनाकडे नाही मागायच्या तर काय देवाकडे मागायच्या?
– वीरेंद्र प्रधान, गोरेगाव