26 September 2020

News Flash

साहसकथेला वास्तवाचा तडका

बलुचिस्तानच्या पाश्र्वभूमीवर ही कादंबरी उलगडत जाते. मात्र तेथील घडामोडींचे प्राधान्याने चित्रण असले तरी तिचा प्रवास दिल्ली, अहमदाबाद आणि अंतिमत: दुबई असाही होतो.

| June 13, 2015 12:29 pm

बलुचिस्तानच्या पाश्र्वभूमीवर ही कादंबरी उलगडत जाते. मात्र तेथील घडामोडींचे प्राधान्याने चित्रण असले तरी तिचा प्रवास दिल्ली, अहमदाबाद आणि अंतिमत: दुबई असाही होतो.  ही कादंबरी वाचताना बलुचिस्तान म्हणजे पाकिस्तानमधील काश्मीर आणि तेथील आयएसआय म्हणजे भारताची ‘रॉ’ असे चित्र उभे राहिले..

साहसकथा वा थ्रिलर वाचनीय असली पाहिजे. शक्यतो एकाच बैठकीत तिचा फडशा पाडणे आनंददायी. ‘द बार्ड ऑफ ब्लड’ ही साहसकथा नक्कीच या कसोटीला उतरणारी आहे. तिला वास्तवाचाही तडका असल्याने तिची खुमारी वाढते. बिलाल सिद्दिकी या विशीतील मुंबईकर तरुणाने ती लिहिली आहे, हे तिचे आणखी एक वैशिष्टय़.
बलुचिस्तानच्या पाश्र्वभूमीवर ही कादंबरी उलगडत जाते. मात्र तेथील घडामोडींचे प्राधान्याने चित्रण असले तरी तिचा प्रवास दिल्ली, अहमदाबाद आणि अंतिमत: दुबई असाही होतो. भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’चा (रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग) एजंट कबीर आनंद याच्या शौर्याची ही कथा. त्याला गुरूसमान असणारे ‘रॉ’चे वरिष्ठ अधिकारी सादिक शेख यांच्या खुनापासून तिची सुरुवात होते. कबीर हा बलुचिस्तानात सराईतपणे वावरलेला ‘रॉ’चा एकेकाळचा एजंट. त्याला २००६ मध्ये त्याच्यावर सोपविलेल्या कामगिरीत अपयश येते. अवमानकारक स्थितीत त्याला ‘रॉ’ सोडणे भाग पडते. मुंबईतील एका महाविद्यालयात तो शेक्सपिअर शिकवत असतो. मात्र शेख यांच्या खुनानंतर त्याच्यावर ‘रॉ’ पुन्हा विश्वासाने त्याच्यावर कामगिरी सोपविते. पुन्हा बलुचिस्तानात जाऊन तो ती आपल्या सहकाऱ्यांसह पार पाडतो. तालिबानने ताब्यात घेतलेल्या चार भारतीय गुप्तचरांची तो सुटका करतो. आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला तडाखा देतो आणि अंतिमत: आपल्या गुरूच्या खुनाचाही सूड उगवतो.
कादंबरी वाचताना बलुचिस्तानमधील गेल्या दशकभरातील घडामोडी उलगडत जातात. वर्तमानपत्रांमधील बातम्यांमुळे तशा त्या आपल्याला परिचित असतात. मात्र कथानकाच्या स्वरूपात त्या सामोऱ्या आल्याने त्या रोचक वाटतात. (बलुचिस्तानमध्ये ‘रॉ’च्या कारवाया वाढल्या असून, त्यांची गंभीर दखल घेऊन कठोर उपाय योजले जातील, असा इशारा पाकिस्तानी लष्कराने गेल्याच महिन्यात दिला होता.) ही कादंबरी वाचताना बलुचिस्तान म्हणजे पाकिस्तानमधील काश्मीर आणि तेथील आयएसआय म्हणजे भारताची ‘रॉ’ असे चित्र उभे राहिले. बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथील २६ ऑगस्ट २०१४ रोजीच्या नोंदीपासून कादंबरीला सुरुवात होते. १० ऑक्टोबर २०१४ रोजीच्या दुबई येथील नोंदीनिशी ती संपते. अवघ्या दीड महिन्यातील वेगवान घडामोडींचे वेधक चित्रण वाचकाला गुंतवून ठेवते. अर्थात, ही कादंबरी फार ग्रेट आहे अशातला भाग नाही. विश्वसनीय ते अविश्वसनीय अशा हिंदोळ्यावर ती हेलकावत राहते. नायकाने उडत्या हेलिकॉप्टरला लोंबकळणे, आत प्रवेश करून एकाला ठार करून दुसऱ्याला ताब्यात घेणे असे तद्दन फिल्मी प्रसंगही रंगवले आहेत. नायक शत्रूच्या थेट बालेकिल्ल्यात घुसून आपला हेतू अलगद साध्य करतो. शत्रूने बारकाव्यांनिशी आखलेली घातपाताची योजना तो उधळून लावतो, यावरही आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. तरण्याबांड लेखकाची ही पहिलीच कादंबरी. तीही त्याने कॉलेजमध्ये असतानाच लिहिलेली. त्याचा नवशिकेपणा काही प्रसंगांमधून आणि व्यक्तिचित्रणातील ढिसाळपणातून जाणवतो.
या कादंबरीला वास्तवाची डूब देण्यासाठी काही अमेरिकी आणि भारतीय गुप्तचरांकडून माहिती घेतली असल्याचे लेखकाने नमूद केले आहे. लेखकाने कष्टाने डेटा गोळा केला असल्याचे तपशिलांमधून जाणवते. वेगाने घडणाऱ्या घडामोडी त्याने चित्रदर्शी पद्धतीने मांडल्या आहेत. २९९ पृष्ठांची कादंबरी कोठेही रेंगाळत नाही. उत्सुकता निर्माण करीत ती पुढे सरकते. तिची रचना बांधेसूद आहे. शेक्सपिअरच्या मृत्यूबद्दलच्या ओळींनी तिची सुरुवात होते आणि शेवटही याच ओळींनी होतो. रंजकता हा साहसकथेचा मुख्य हेतू ती नक्कीच साध्य करते. लेखकाचा कादंबरीलेखनाचा पहिलाच प्रयत्न त्याच्याबद्दलच्या अपेक्षा वाढवणारा ठरला आहे.

द बार्ड ऑफ ब्लड
लेखक : बिलाल सिद्दिकी
प्रकाशक – पेंग्विन बुक्स
पृष्ठे – २९९ किंमत- २९९ रुपये.

संजय डोंगरे – sdongare @expressindia.com.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 12:29 pm

Web Title: the bard of blood by bilal siddiqi
Next Stories
1 सुरक्षेपुढील गुंत्यांचा आढावा
2 राजकीय स्मृतिचित्रे..
3 भूतकाळातून वर्तमानाबद्दल
Just Now!
X