scorecardresearch

दुवा की दुखणे?

भले तो बौद्धिक असेल पण राहुल गांधी जे करीत आहेत तो उनाडपणाच होय

दुवा की दुखणे?
(संग्रहित छायाचित्र)

 

पाच महत्त्वाच्या राज्यांत निवडणुका जाहीर झालेल्या असताना राहुल गांधी यांनी विद्वानांशी चर्चेत आणीबाणी आदी इतिहासाची मढी उकरणे, ही आत्मनाशाचीच प्रेरणा..

कोणत्याही नेतृत्वाचा मुद्दा असो. ‘समोर आहेच कोण’, असा लबाड आणि आपमतलबी युक्तिवाद प्रस्थापितांकडून नेहमीच केला जातो. वास्तव तसे कधीच नसते. गांधी घराण्याला काँग्रेसमध्ये पर्याय असू शकतो..

हा आपला राष्ट्रीय जनुकीय गुण असावा. आपण भविष्याची उज्ज्वल चित्रे रंगवतो. पण वर्तमानावर भाष्य करायची वेळ आल्यास भूतकाळात घुसतो. चौकसपणे शोध घेतल्यास हे सत्य सर्वधर्मीय, सर्ववर्णीय आणि म्हणून सर्वपक्षीय आढळेल. या सत्याच्या अनुभूतीसाठी (तूर्त) काँग्रेस पक्षाविषयी भाष्य करणे उचित ठरेल. या पक्षाचे ‘धरले तरी पळतात आणि सोडले तर चावतात’ असे आणि ‘बुडाला तर बेडूक, उडाला तर पक्षी’ म्हणावेत असेही नेते राहुल गांधी यांचे ताजे विधान. त्यात त्यांनी आपल्या आजीने जाहीर केलेली आणीबाणी किती अयोग्य होती त्याची कबुली दिली. उत्तरपत्रिका कोरी ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांस स्वच्छता आणि टापटिपीचे दोन गुण द्यावेत त्याप्रमाणे आणीबाणीस चूक ठरवण्याच्या प्रामाणिकपणाबद्दल राहुल गांधी यांना त्यासाठी एखादा गुण देता येईलही. पण त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या अवस्थेत काडीचाही फरक पडणारा नाही. अशा वेळी मुळात राहुल गांधी यांच्या या मुलाखतीच्या उबळीची चिरफाड होणे गरजेचे ठरते.

ही मुलाखत राहुल गांधी यांनी दिली विख्यात अर्थतज्ज्ञ कौशिक बसु यांना. ते अमेरिकेतील विद्यापीठात अध्यापन करतात आणि आपल्या विश्लेषणात्मक तरीही चुरचुरीत लेखनासाठी ओळखले जातात. इतक्या मोठय़ा विद्वानाशी संवाद साधावासा वाटला ही बाब राहुल गांधी यांच्यासाठी कौतुकास्पद खरीच. पण तिचे प्रयोजन काय? याआधी त्यांनी रघुराम राजन ते थॉमस पिकेटी अशा अनेकांशी अशा प्रकारचे संवाद साधले. राजकारण्याने स्वत:स बुद्धिवानांतील सर्वोत्तम मानून आपल्या मिजाशीत न राहता आपल्यापेक्षा विद्वानांकडून काही समजून घेणे आवश्यकच. त्यासाठी राहुल गांधी यांचे कौतुकच. पण यातील पंचाईत अशी की आधी मुळात राहुल गांधी यांनी त्यांचे नियत कर्तव्य प्राणपणाने करावे. तिथेच काँग्रेसचे घोडे पेंड खायला जाते. हे म्हणजे शालेय विद्यार्थ्यांने सर्व वेळ ‘अभ्यासपूरक उपक्रमां’त (‘एक्स्ट्राकरिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटी’) खर्च करण्यासारखे. आधी ‘अभ्यास’ चोख केला असेल तर त्या ‘पूरक उद्योगां’स महत्त्व येते. एखादा विद्यार्थी अभ्यास सोडून सर्वकाळ या ‘पूरक उद्योगांत’च खर्च करत असेल तर त्यास मराठी भाषेत उनाडपणा असे म्हणतात.

भले तो बौद्धिक असेल पण राहुल गांधी जे करीत आहेत तो उनाडपणाच होय. त्याचे प्रयोजन जसे अंधारे तसेच त्याची वेळदेखील चुकीची. आता काही करण्यासारखे नाही अशा अवस्थेत पोहोचल्यावर विद्वानांशी चर्चा वगैरे ठीक. पण घराला आग लागलेली असताना या निर्थक खंडनमंडनात वेळ वाया घालवण्यात काय शहाणपणा? आणि तोही पाच महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या असताना. या राज्यांतील पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूत काँग्रेसला काहीही आशा नाही, हे समजण्यासारखे. पण जेथून हे राहुल गांधी लोकसभेवर निवडून जातात तो वायनाड मतदारसंघ ज्या राज्यात आहे त्या केरळातही विधानसभा निवडणुका आहेत. तेथे डावी आघाडी काँग्रेसला शिरकाव करू न देण्याचा चंग बांधून लढाईस उतरली आहे. फारसे काही स्थान नसलेल्या भाजपने आपल्या यशाचा हुकमी एक्का असलेल्या ध्रुवीकरणाची चोख व्यवस्था केली असून त्या आधारे हा पक्ष आपला विस्तार करण्याच्या इराद्याने सज्ज आहे. अशा वेळी या राज्यांतील स्वपक्षीयांना काही मदत होईल हे पाहायचे की इतिहासाची मढी उकरत बसायचे हा विवेकाचा मुद्दा. वास्तविक ज्यांनी आणीबाणीचे टोकाचे पाऊल उचलले त्या इंदिराबाईंनीच उत्तरायुष्यात त्याविषयी खेद व्यक्त केला होता. तेव्हा आपण काही मोठे ऐतिहासिक कार्य करीत आहोत अशा थाटात या चुकीची कबुली ऐन निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी यांनी द्यावी याची काहीही गरज नव्हती. बरे या आपल्या विधानामुळे आपलाच पक्ष अडचणीत येईल याची त्यांना कल्पना नव्हती असेही नाही. कारण याच मुलाखतीत ते पुढे आपल्या या आणीबाणी विधानाचा माध्यमांकडून कसा विपर्यास केला जाईल हे स्मितहास्य करीत सांगताना दिसतात. इतके कळत असतानाही काँग्रेस नेतृत्वाची ही आत्मनाशाची आस अतक्र्य म्हणायला हवी.

त्याआधी जम्मूतील मेळाव्यात गुलाम नबी आझाद आणि अन्यांनी पक्षाची कशी वाताहत होत आहे, याबाबत गळा काढला. ही वाताहत रोखण्याची ताकद फक्त गांधी कुटुंबातच आहे असे अजिबात नाही. राजीव गांधी यांची १९९१ साली हत्या झाल्यानंतर पाच वर्षे गांधी कुटुंबीय पक्षापासून दूर होते. तरीही काँग्रेसचा गाडा उत्तम वेगात त्या वेळी दौडत होता. आताही राहुल गांधी यांना पक्षाध्यक्षपद घेणे अगदीच आणि प्रामाणिकपणे नकोसे वाटत असेल तर त्यांनी ते घेऊ नये. पण अट इतकीच की अन्य कोणी पक्षाची जबाबदारी घेण्यास पुढे येत असेल तर त्यास आडवे तरी घालू नये. पक्षाची धुरा वाहण्याची क्षमता असलेले त्या पक्षात अनेक आहेत. प्रश्न फक्त पूर्ण स्वातंत्र्य आणि संधी देण्याचा आहे. पक्षाच्या असो वा देशाच्या; कोणत्याही नेतृत्वाचा मुद्दा असो. ‘समोर आहेच कोण’, असा लबाड आणि आपमतलबी युक्तिवाद प्रस्थापितांकडून नेहमीच केला जातो. वास्तव तसे कधीच नसते. देश असो वा पक्ष. हे काही पोकळीत राहू शकत नाहीत. परिस्थिती पर्याय पुढे करतेच करते.

काँग्रेसच्या बाबतही हे सत्य लागू होते. त्याकडे त्या पक्षास दुर्लक्ष करायचे असेल आणि राहुल गांधी यांना पाठ फिरवायची असेल तर मतदार आपला मार्ग शोधतील आणि सत्ताधाऱ्यांना पर्याय उभा करतील. दिल्लीतील ताज्या पोटनिवडणुकांनी हेच सत्य अधोरेखित केले आणि त्याआधी २०१९ साली महाराष्ट्राने पर्याय कसा उभा राहतो याची जाणीव करून दिली. ज्या आणीबाणीच्या चुकीची कबुली राहुल गांधी यांनी दिली त्या आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत तर दूर दूर राजकीय क्षितिजापर्यंत इंदिरा गांधी यांना आव्हान देईल असा पक्ष आणि चेहराही नव्हता. पण तरीही मतदारांनी इंदिरा गांधी यांना घरी पाठवले. पुढे देवेगौडा ते गुजरालमार्गे विश्वनाथ प्रताप सिंग हे काही सत्ताधाऱ्यांस पर्याय म्हणून मान्य झालेले नव्हते. तरीही मतदारांनी त्या त्या वेळी प्रस्थापितांना धूळ चारली आणि या मंडळींना स्वप्नातही पाहिली नसेल अशी पंतप्रधानपदाची संधी मिळाली.

या प्रत्येक वेळी काँग्रेस अधिकाधिक आकसत गेली. तेव्हा आपले हे आकसणे थांबवायची इच्छा असेल तर राहुल गांधी यांना अंग झाडून मेहनत करावी लागेल. ही मेहनत म्हणजे कॅमेऱ्यासमोर जोरबैठका काढणे नव्हे. ही राजकीय मेहनत कशी असते हे समजून घ्यायचे असेल तर त्यांनी मोदी-शहा यांच्याकडून धडे घ्यावेत. प्रतिस्पध्र्याकडून घेण्यासारखे बरेच काही असते. आणि विजयी प्रतिस्पर्धी हा तर गुरूसमानच असतो. राजकारण आता २४ तास पूर्णवेळचा उद्योग आहे. अर्धवेळचा छंद नाही.

आणि एवढे होऊनही काही शिकायचेच नसले तर कार्य सिद्धीस नेण्यास मतदार श्री समर्थ आहेच. काँग्रेससाठी गांधी घराणे हा सर्वाना जोडणारा दुवा आहे हे मान्य. पण हा दुवा फक्त दुखणेच वाढवणार असेल तर काँग्रेसींनाही दुसरा विचार करावाच लागेल. राहुल गांधी यांना आवडो वा न आवडो. त्याची सुरुवात झालेली आहे. तेव्हा त्यांनी फार इतिहासात न रमता वर्तमानात यावे हे बरे.

मराठीतील सर्व अग्रलेख ( Agralekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या