‘किमान सरकार’चा कमाल फायदा काही मूठभरांनाच होतो हे कालौघात वारंवार दिसून आले, त्यानंतर जो बायडेन आर्थिक समतोलाचे सूतोवाच करीत आहेत…
…लोकशाहीवाद विद्यमान अमेरिकी अध्यक्षांच्या १०० दिवसांनंतरच्या पहिल्या अधिकृत भाषणातूनही दिसला. तोही, जगात एकाधिकारशहांचीच सद्दी वाढल्याची जाणीव असताना…
ज्या अमेरिकी सभागृहाने अवघ्या साडेतीन महिन्यांपूर्वी लोकशाहीवरील काळ्या झाकोळाचे दर्शन घडवले तेच सभागृह (भारतीय प्रमाणवेळेनुसार) गुरुवारी पहाटे लोकशाहीच्या प्रसन्न आणि ऐतिहासिक किरणांनी न्हाऊन निघाले. ऐतिहासिक अशासाठी की उपाध्यक्ष आणि सभाध्यक्ष या दोन्ही पदांवर महिला विराजमान असण्याचा अमेरिकेच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग. उपाध्यक्षा कमला हॅरिस आणि स्पीकर नॅन्सी पलोसी या दोन पाठराखिणींच्या साक्षीने अध्यक्ष जो बायडेन यांनी उभय सभागृहांना उद्देशून आपले पहिले भाषण केले. निमित्त होते त्यांच्या सरकारचे पहिले शंभर दिवस. वास्तविक अध्यक्षांचा किमान चार वर्षांचा कार्यकाल लक्षात घेतल्यास त्या १४६० दिवसांतील पहिले शंभर दिवस पूर्ण होणे ही काही मोठी कामगिरी नाही. तथापि शितावरून भाताची परीक्षा करतात त्याप्रमाणे नव्या सरकारच्या पहिल्या काही दिवसांच्या बाललीलांतून ते पुढे काय दिवे लावणार याचा अंदाज बांधता येऊ शकतो. म्हणून बायडेन यांच्या या भाषणाकडे अनेकांचे लक्ष होते. बायडेन यांनी त्यांना अजिबात निराश केले नाही. त्यांनी काहीही अद्वातद्वा भाष्य केले नाही आणि एकही आचरट घोषणा केली नाही. उच्चपदस्थांनी काहीही वेडपटपणा न करण्यातच शहाणपणा शोधायच्या आजच्या काळात बायडेन यांचे मंद्र, मृदू आणि मार्दवी भाषण अत्यंत हवेहवेसे ठरते. म्हणून त्याची दखल.
या संपूर्ण भाषणात बायडेन यांनी सरकारचे लक्ष्य स्पष्ट करताना तीन मुद्द्यांवर भर दिला. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार. एकमेव जागतिक महासत्तेचा प्रमुख आपल्या पहिल्यावहिल्या भाषणात या मूलभूत मुद्द्यांनाच हात घालतो हा जागतिक नेतृत्व आदी करण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांसाठी एक धडा आहे. उत्तम व्यवहाराने स्वार्थ साधल्याखेरीज परमार्थ निरर्थक असतो असे आपले अध्यात्मही सांगते. पण त्याच्या शिकवणीचे उत्तम नमुने पाश्चात्त्य देशांतच अधिक पाहावयास मिळतात. बायडेन यांनी घालून दिलेला ताजा धडा या मालिकेतील. सत्तेवर आल्या आल्या बायडेन यांनी करोनाग्रस्त अमेरिकेसाठी जवळपास दोन लाख कोटी डॉलर्सचे विशेष अर्थसाह््य मंजूर केले. यामुळे रिपब्लिकन्स त्यांच्यावर नाराज आहेत. बायडेन यांनी देऊ केलेली मदत ही ट्रम्प यांनी केलेल्या घोषणांपेक्षा जास्त आहे; हे रिपब्लिकनांच्या नाराजीचे कारण. जनता संकटग्रस्त झाल्यास मदतीची संधी आपल्या विरोधकांना न मिळता आपल्यालाच मिळायला हवी, आपणच काय ते जनतेचे तारणहार अशी क्षुद्र मनोभूमिका अनेकांची असते. अशा रिपब्लिकनांना बायडेन यांनी भीक घातली नाही आणि असे मुद्दे अधिकाधिक जलदगतीने निकालात काढण्याचा आपला निर्धार त्यांनी व्यक्त केला. पहिल्या शंभर दिवसांत आपल्या काही उद्दिष्टांना हात घालणे बायडेन यांना जड जाताना दिसते. पण तरीही त्यांनी आपल्या अडचणींसाठी आपल्या पूर्वसुरींना जबाबदार धरण्याचा किरकिरेपणा केलेला नाही, हेदेखील विशेष.
अमेरिकी उद्दिष्टे आणि मूल्ये यांच्या गतिशील संवर्धनासाठी ज्या कोणाकडे काही कल्पना असतील त्यांनी पुढे यावे, माझे प्रशासन त्याचे स्वागत करेल असे आवाहन करताना बायडेन यांच्यासमोर त्यांचा प्रमुख विरोधी रिपब्लिकन पक्षही होता. देशाच्या प्रगतीत विरोधी म्हणवून घेणाऱ्या पक्षांचाही वाटा असतो आणि त्यांनाही सहभागी करून घ्यायला हवे, हा त्यांचा उदारमतवादी दृष्टिकोन यातून दिसतो. तथापि, असे आवाहन करीत असतानाच ‘जग अमेरिकेसाठी थांबण्यास तयार नाही’, याचीही जाणीव बायडेन करून देतात. ‘निष्क्रियता हा आपल्या समोरील पर्याय नाही’ हे त्यांचे विधान. सर्व अमेरिकी बालकांस समान प्राथमिक शिक्षण आणि किमान समान आरोग्य सुविधा ही त्यांच्या सरकारची प्राथमिकता. या आपल्या उद्दिष्टांसाठी निधी उभारणी कशी असेल हेही त्यांनी स्पष्ट केले. श्रीमंतांवर अधिकाधिक कर आणि गरिबांना अधिकाधिक करसवलती हे तत्त्व त्यांच्या सरकारच्या करआकारणीचा पाया असेल. ‘‘संपत्ती निर्मितीच्या उतरंडीची चर्चा खूप झाली. समाजातील वरचे श्रीमंत झाले की त्यांची संपत्ती खाली आपोआप झिरपते हे आपण ऐकत आलो. पण ते पुरेसे नाही. समृद्धीची बांधणी तळापासूनही व्हायला हवी,’’ असे सांगताना बायडेन यांनी अमेरिकेत गेल्या काही वर्षांत किती कोट्यधीश अब्जाधीश झाले याची आकडेवारी सादर केली.
भांडवलशाहीचे मूर्तिमंत आणि प्रच्छन्न प्रतीक मानल्या जाणाऱ्या अमेरिकेत गेली काही वर्षे एक सर्जक समाजवादी विचार मूळ धरताना दिसतो. बायडेन हे त्याचे प्रतीक. केवळ धनाढ्यवादी ठरवल्या गेल्यामुळे बायडेन यांच्या पूर्वसुरी हिलरी क्लिंटन पराभूत झाल्या. त्याचे कडवे विरोधी टोक म्हणजे त्यांच्याच पक्षाचे बर्नी सँडर्स. ते टोकाचे समाजवादी म्हणून मागे पडले. बायडेन यांचा प्रयत्न आहे तो या दोहोंचा सुवर्णमध्य काढण्याचा. त्यामुळे त्यांचा हा अर्थविचार महत्त्वाचा ठरतो. रिपब्लिकन पक्षीय डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा गरिबांची, पण कृती मात्र धनिकधार्जिणी. हे राजकीय चातुर्य अनेकांत दिसते. पण बायडेन प्रशासन गरिबांसाठी केवळ शब्दसेवेपेक्षा प्रत्यक्ष काही करू इच्छिते. त्यात त्यांना किती यश येते हे काही काळाने कळेल. पण त्यांचा प्रयत्न त्या दिशेने आहे हे निश्चित. अशी खात्री बाळगता येते याचे कारण त्यांनी तितक्याच स्पष्टपणे सरकार या संकल्पनेविषयी घेतलेली भूमिका. सुमारे २५ वर्षांपूर्वी याच स्थानावरून बायडेन यांचे पूर्वसुरी बिल क्लिंटन यांनी ‘मोठ्या सरकारांचा काळ आता संपला’ अशी घोषणा केली. ‘मिनिमम गव्हर्नमेंट, मॅग्झिमम गव्हर्नन्स’चा तो मूलाधार. तो त्या काळी योग्य होताही. तथापि कालौघात किमान सरकारचा कमाल फायदा काही मूठभरांनाच होतो हे वारंवार दिसून आले. पण कोणीही हे सत्य मान्य करण्यास तयार नाही. कारण तसे न करण्यातच सर्वांचे हित आणि हितसंबंध असतात. आपल्या पहिल्याच भाषणात बायडेन मात्र हे सत्य सांगतात आणि आपल्या सरकारचा आकार वाढवण्याची जाहीर भूमिका घेतात. अमेरिकेने असे करण्यास महत्त्व आहे. कारण त्याचेच अनुकरण अन्यत्र केले जाते.
या पहिल्या भाषणात त्यांनी उपस्थित केलेला अत्यंत लक्षणीय मुद्दा लोकशाही तत्त्वांचा. अमेरिकेत अतिलोकशाही आहे आणि म्हणून जनता त्रस्त आहे या प्रचाराचा दाखला देत बायडेन यांनी जगात एकचालकत्वी विचारतत्त्वे कशी जोर धरीत आहेत याचा दाखला दिला. या तत्त्वांना अमेरिकेच्या पराभवात रस आहे. कारण अमेरिकेचा पराभव हा लोकशाहीचा पराभव असेल. एककल्ली एकाधिकाशाह््यांना मिळणारे यश तात्कालिक असते पण ‘भविष्य मात्र लोकशाहीचे असेल’ ही त्यांची भूमिका जगातील समस्त लोकशाहीवाद्यांसाठी आश्वासक. प्रचंड व्यापक लशीकरणातील यश बायडेन सरकारच्या नावावर आहे. ट्रम्प यांच्या काळात खुरटलेल्या लशींना बायडेन यांनी अत्यंत यशस्वी गती दिली आणि सर्व अमेरिकी नागरिकांची लसीकरण मोहीम झपाट्याने हाती घेतली. त्यामुळे आज अपेक्षेपेक्षा अधिक अमेरिकींना अधिक वेगात लस मिळाली असून सार्वत्रिक मुखपट्टीचा नियम मागे घेण्यापर्यंत त्या देशाने मजल मारली आहे.
पण याची कसलीही फुशारकी बायडेन यांच्या भाषणात नव्हती. हा त्यांचा संयत शांतपणा उठून दिसणारा. तिसऱ्या प्रयत्नात मिळालेल्या अध्यक्षपदाचे मोल आणि त्याचे क्षणभंगुरत्व हे दोन्ही ते जाणतात. त्यामुळे आपल्या राजकीय विरोधकांविषयीही त्यांच्या मनात कडवटपणा नाही. असला तरी तो प्रदर्शित न करण्याइतका मुत्सद्दीपणा ते दाखवतात, हेदेखील कौतुकास्पद. स्पर्धेचा निकाल लागला की स्पर्धेची भावना संपायला हवी आणि पराभूताकडेही आपला सह-स्पर्धक या कनवाळू नजरेतून पाहता यायला हवे, हे त्यांच्या भाषणातून समजते. मर्ढेकर ‘भंगु दे काठिन्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे’ अशी इच्छा व्यक्त करतात. मनाचा असा आंबटपणा संपवलेल्या नेत्यांची आज जगाला अधिक गरज आहे. जग अशा अमेरिकेच्या प्रतीक्षेत आहे.