स्वत:च्या अंतिम हितासाठी वाटेल त्या थरास जाऊन हवे ते करणाऱ्या उद्योगपतींची एक नवी फळी जागतिक अर्थकारणात आलेली दिसते, त्यांपैकी एक इलॉन मस्क..

विसावे शतक उजाडलेही नव्हते त्या वेळी खनिज तेल विक्रीतून गडगंज नफा कमावणाऱ्या जॉन डि रॉकफेलर या उद्दाम उद्योगपतीचे पंख कापण्यासाठी रिपब्लिकन जॉन शेरमन याने अँटी ट्रस्ट कायदा आणला. या कायद्याने रॉकफेलर यांना स्वहस्ते आपले औद्योगिक साम्राज्य तोडावे लागले. हा कायदा आजही ‘शेरमन अँटी ट्रस्ट अ‍ॅक्ट’ याच नावाने ओळखला जातो आणि आजही एटीअँडटी, मायक्रोसॉफ्ट आदी कंपन्यांस या कायद्यास सामोरे जावे लागते. कोणीही एखादा उद्योगपती एका क्षेत्रातील आपल्या मक्तेदारीचा वापर करून दुसऱ्या क्षेत्रातील स्पर्धेचा गळा घोटण्याइतका बलवान होऊ नये, हा या कायद्याचा उद्देश. ज्यास भांडवलशाही म्हणून हिणवले जाते त्या अमेरिकेसारख्या देशात उद्योगपतींस वेसण घालणारा हा कायदा १८९० च्या सुमारास जन्मास आला आणि त्याच्या तरतुदी शिथिल कराव्यात असे अजूनही कोणास वाटलेले नाही. विजेवर चालणाऱ्या मोटार निर्मितीतील मक्तेदारी, तसेच खासगी अंतराळ वहन क्षेत्रांत आघाडी घेतल्यानंतर इलॉन मस्क याने ‘ट्विटर’ खिशात घातल्यामुळे त्यास हा कायदा लागू होतो किंवा काय हे कळेलच. पण मस्क याची हे करण्याची पद्धत आणि त्याची अशीच हडेलहप्पी कार्यशैली पाहता या त्याच्या कृतीतून अनेक प्रश्न निर्माण होतात. सर्वात प्रथम युरोपीय संघाने मस्क आणि ट्विटरसंदर्भात भूमिका घेतली असून कोणत्याही प्रकारे अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी सहन केली जाणार नाही, असे स्वच्छपणे नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर मस्क यांच्या या उद्योगाचा परामर्श घ्यायला हवा.

याचे कारण मस्क हे सर्वसामान्य नियमानुसार जाणारे उद्योगपती नाहीत. सरकार कोणत्याही पक्षाचे असो; आपणास हवी तशी धोरणे बनवून घेण्याचे कौशल्य काही उद्योगसमूहांठायी असते. याचे अनुभव आपणास नवे नाहीत. मस्क त्याच्या पुढे जातो. त्याच्याबाबत पक्षाची जागा देश घेतो. म्हणून बोलिव्हियासारख्या देशात मस्क याचे उद्योग वादग्रस्त ठरले आणि काही काळ तरी ही व्यक्ती तेथील स्थानिकांच्या रोषास बळी पडली. अमेरिका खंडातील या देशात लिथियम या धातूचे प्रचंड साठे आहेत. खनिज तेलाबाबत सौदी अरेबिया या देशाचे जे स्थान ते लिथियमबाबत बोलिव्हियाचे स्थान. विजेवर चालणाऱ्या मोटारनिर्मितीत आघाडी घेणाऱ्या मस्क याच्या ‘टेस्ला’ कंपनीच्या प्रगतीसाठी या लिथियम साठय़ांवर कब्जा मिळवणे आवश्यक होते. तथापि त्या देशातील तत्कालीन सरकारच्या धोरणांमुळे मस्क यांचे हे प्रयत्न अयशस्वी ठरले. त्या वेळी या गृहस्थाने बोलिव्हियातील विरोधकांस ‘हाताशी’ धरले आणि सरकारविरोधात रान माजवले जाईल याची व्यवस्था केली. त्यास यश आले आणि मस्क यांस ‘सोयीची’ राजवट त्या देशात आली. मस्क यांचे उद्योग इतक्यापुरतेच मर्यादित नाहीत. विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीत चीन हा अमेरिकेपेक्षाही कांकणभर सरस असा देश. चीनने गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात अवाढव्य प्रगती केली असून त्या देशात मस्क याचे प्रचंड हितसंबंध आहेत. विविध देशांतील उद्योगपतींना आकर्षून घेण्यासाठी चीन अनेक प्रलोभने दाखवतो. तसे केल्याने हे उद्योगपती आपापल्या मायदेशात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे चीनची बाजू घेतात. मस्क हे त्यातील एक आघाडीचे नाव.

म्हणूनच त्याने ट्विटरचा घास घेतल्याचे वृत्त आल्या आल्या ‘अ‍ॅमेझॉन’च्या जेफ बेझोस यांनी ‘यामागे चीनचा हात तर नाही’ अशा अर्थाचा संशय व्यक्त केला. यातील उद्योगांतील स्पर्धेचा अंश आणि असूया मान्य केली तरी बेझोस यांची चिंता अगदीच अस्थानी नाही. याचे कारण स्वत:च्या अंतिम हितासाठी वाटेल त्या थरास जाऊन हवे ते करणाऱ्या उद्योगपतींची एक नवी फळी जागतिक अर्थकारणात आलेली दिसते. मस्क त्यातील एक. तीन वर्षांपूर्वी त्यांनी स्वत:च्याच ‘टेस्ला’ कंपनीच्या समभाग खरेदीबाबत जनतेची जी फसवणूक केली ती एकाच वेळी हास्यास्पद आणि अभूतपूर्व दोन्हीही होती. म्हणजे मस्क यांनी स्वत:च स्वत:च्या कंपनीचे समभाग विकत घेण्याची घोषणा केली, त्यासाठी किती रक्कम वेगळी काढून ठेवली आहे ते सांगितले आणि नंतर ‘छे, असे काहीच नाही.. जरा गंमत केली’ असे म्हणत हे सारे नाकारले. त्याबाबत त्यास शिक्षाही झाली. अलीकडेही ‘ट्विटर’मध्ये ९.२ टक्के समभाग घेतल्याचे त्यांनी बाजारपेठ नियंत्रकास कळवले नसल्याचे उघड झाले. त्याहीबाबत त्याची चौकशी सुरू आहे. या खरेदीनंतर ट्विटरच्या संचालक मंडळात त्यास स्थान दिले जात असल्याची घोषणा झाली आणि नंतर तिचाही इन्कार झाला. इलॉन याचा भाऊ किंबल याचेही काही निर्णय आणि कृती वादग्रस्त होती आणि त्याबद्दल त्याचीही चौकशी सुरू आहे. हे असे असताना अचानक मस्क याचा ट्विटर खरेदीचाच निर्णय आला.

तो सर्वार्थाने धक्कादायक म्हणावा असाच. मुळात मस्क याच्या अन्य दोन कंपन्या आणि त्यांची उत्पादने आणि ट्विटर यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. ट्विटर ही एक मुक्तछंदी कंपनी. तिचे व्यासपीठ सर्वाना उपलब्ध असते आणि २८० अक्षरांत कोणालाही कोणतेही महाकाव्य तेथे मांडण्याची मुभा असते. हे झाले वरवरचे सत्य. अंतरंगातील वास्तव हे की या माध्यमाच्या साहाय्याने धन आणि राजदांडग्यांस आपापले दबावगट निर्माण करण्याची सोय झाली आणि तिचा सरळ ‘व्यापार’ सुरू झाला. म्हणजे ट्विटर समर्थक कृत्रिमरीत्या वाढवणे, हव्या त्याच्या संदेशांचा प्रचार करणे आणि नको त्याच्या संदेशांविरोधात समर्थकांच्या पाळीव झुंडी सोडणे, कोणाविरोधात अपप्रचार आदी सर्व उद्योग या माध्यमाद्वारे अलीकडे होतात. परिणामी या माध्यमाची विश्वासार्हता आणि उपयुक्तता याविषयी अलीकडे गांभीर्याने चर्चा होते. विशेषत: गेल्या वर्षी सत्तात्यागाची वेळ आल्यानंतर अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून जे रान उठवले आणि ज्याची परिणती वॉिशग्टन येथे प्रत्यक्ष हल्ल्यात झाली ते पाहिल्यानंतर ट्विटरविषयी विचारीजनांच्या मनात एक प्रकारची घृणाच निर्माण झाल्याचे दिसून येते. परिणामी या माध्यमाच्या वापरकर्त्यांस गळती लागली असून त्यातून ट्विटरचे उत्पन्नही घटले. तेव्हा त्यास कोणाच्या आधाराची गरज लागेल हे दिसत होतेच. तो आधार मस्क यांनी दिला. म्हणजे संकटापेक्षाही त्यावरील उपाय भयंकर. वैयक्तिक आयुष्यात काही जणांकडून मदतीची भीक स्वीकारण्यापेक्षा उपाशी राहिलेले बरे असे अनेकदा होते. तसा निर्णय घेण्यासाठी अडचणीतही विवेक शाबूत असावा लागतो. ट्विटरच्या संचालकांचा तसा तो होता किंवा काय असा प्रश्न पडू शकतो. त्यामुळे मस्क याने आपली कंपनी विकत घेतल्याच्या वृत्ताने ट्विटरच्या विधि अधिकारी विजया गड्डे यांना रडू अनावर झाल्याचे वृत्त ‘पोलिटिको’ने दिले. ते खरे असणार. कारण मस्क यांच्या गुंतवणुकीमुळे ट्विटरची आर्थिक ददात मिटेलही. पण त्याचे जे मुक्त व्यासपीठाचे स्वरूप आहे ते तसे राहील का हा प्रश्न अनेकांप्रमाणे विधि अधिकाऱ्यांसही पडला. हा धोका अनेकांस वाटतो. यातच या निर्णयाची मर्यादा दिसून येते. व्यवसायात अंतिमत: मोल अत्यंत महत्त्वाचे हे खरेच असले तरी अंतिम हिशेबात मूल्य या घटकाचेही महत्त्व असते. मस्क यांच्या निर्णयामुळे हा प्रश्न निर्माण होतो. त्याचे उत्तर जरी येणाऱ्या काळात मिळणार असले तरी त्याच्या उद्दिष्टांविषयी शंका निर्माण होणे ही त्या उत्तराची सुरुवात असू शकते. सर्वच समाजमाध्यमांची एकंदरच उपयुक्तता नक्की किती याबाबत प्रश्न निर्माण होत असताना मस्कसारख्या उचापतखोराहाती ट्विटर जाण्याने शंकेची पाल जरा जोरातच चुकचुकते. ‘कृष्णाकाठच्या कुंडल’प्रमाणे ट्विटरही आता पहिले उरले नाही, हे खरे.