काही उत्तरे, नवे प्रश्न..

लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत सुटले. अनेकांनी मैदानातल्या विहिरीत उडय़ा टाकल्या.

आनंद हर्डीकर

जालियनवाला बाग म्हटले की जे हत्याकांड आठवते, ते घडल्याला आजच्या बैसाखीला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. आज ती घटना आठवताना तीन पुस्तकांचा परिचय करून घेणे आवश्यक आहे.

पहिले पुस्तक तसे जुने आहे. निगेल कोलेट या एका माजी लष्करी अधिकाऱ्याने लिहिलेले. मदोन्मत्त, क्रूरकर्मा जनरल रेजिनाल्ड डायर याचे चरित्र : ‘द बुचर ऑफ अमृतसर’ (रूपा पब्लिकेशन्स, पृष्ठे- ६१२, किंमत- २९५ रुपये)!  हे पुस्तक जालियानवाला बाग समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

दुसरे पुस्तक आहे- गेल्या वर्षी उत्तरार्धात प्रसिद्ध झालेले. एका भारतीय महिला इतिहासकाराने लिहिलेले. नाटककार, कादंबरीकार किश्वर देसाई या अमृतसरला स्थापन झालेल्या ‘विभाजनविषयक संग्रहालया’च्या मुख्य विश्वस्त म्हणून इतिहासाच्या अभ्यासकांना बऱ्यापैकी ठाऊक आहेत. आपल्या आजीकडून ज्या दुर्घटनेबद्दलचे असंख्य हुंदके ऐकून आपण लहानाच्या मोठय़ा झालो आणि ज्या दहशतीच्या राज्याबद्दलचे करुणरौद्र मौन असंख्य आप्तेष्टांनी आपल्यापर्यंत पोचवले, त्याबद्दलची वस्तुस्थिती सगळ्यांना कळावी या हेतूने प्रेरित होऊन किश्वरजींनी लिहिलेले ‘जालियानवाला बाग, १९१९ : द रीअल स्टोरी’ (कॉन्टेक्स्ट/ वेस्टलॅण्ड बुक्स, पृष्ठे- २८६, किंमत- ६९९ रुपये)  हे पुस्तक अनेक अर्थानी वैशिष्टय़पूर्ण आहे.

तिसरे पुस्तक आहे- लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठात भारतीय इतिहासाचे अध्यापन करणाऱ्या किम ए. व्ॉग्नर यांनी लिहिलेले. व्ॉग्नर लिखित ‘जालियनवाला बाग’ या पुस्तकाचे उपशीर्षक आहे- ‘अ‍ॅन एम्पायर ऑफ फीअर अ‍ॅण्ड द मेकिंग ऑफ द अमृतसर मॅसॅकर’ (पेंग्विन/ व्हायकिंग, पृष्ठे- ३७२, किंमत- ५९९ रुपये)!

पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतीयांनी ब्रिटनच्या युद्धमोहिमेला जे सहकार्य देऊ केले होते, त्याची जाणीव ठेवून ब्रिटिश राज्यकर्ते आपल्याला स्वराज्य देऊ करतील, निदान त्या दिशेने थोडी तरी पावले उचलतील, अशी भारतीय जनतेची अपेक्षा होती. परंत तिची दखल न घेता रौलट कायदा लागू करून ब्रिटिशांनी दडपशाहीचे धोरणच दामटायला सुरुवात केली. मग सरकारी धोरणाविरुद्ध जनतेचा असंतोष या ना त्या प्रकारे व्यक्त होऊ लागला.

तशाच एका निषेध सभेसाठी १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसरमध्ये लोक प्रचंड संख्येने जालियनवाला बागेत एकत्र जमले होते. शहरात लष्करी कायद्याचा अंमल होता, जमावबंदीचा हुकूम काढण्यात आला होता. तरीही लोक त्या सभेसाठी एकत्र जमले. योगायोगाने त्या दिवशी बैसाखीचा सण होता. त्या निमित्ताने अमृतसर शहरात यात्रेसाठी आलेले बाहेरगावचे स्त्री-पुरुषही त्या ठिकाणी मोठय़ा संख्येने जमले. त्या वेळी अमृतसर शहर ज्याच्या ताब्यात होते, त्या जनरल डायर या ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्याने त्या जमावाला कोणतीही पूर्वसूचना न देता अंदाधुंद गोळीबार केला. मैदानातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग अडवून तो गोळीबार करण्यात आला. लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत सुटले. अनेकांनी मैदानातल्या विहिरीत उडय़ा टाकल्या. बायका-मुलांसह शेकडो लोकांची अशी विनाकारण हत्या करण्यात आली. असंख्य जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत दिली गेली नाही. त्यानंतरही कित्येक दिवस लष्करी कायदा वापरून जनसामान्यांवर अत्याचार करण्यात आले.

पुढे या साऱ्या अत्याचारांना वाचा फुटली, तेव्हा सरकारने लॉर्ड हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनेसुद्धा समांतर चौकशी आरंभली. त्या दोन चौकशांमधून वेगवेगळी माहिती मांडली गेली. एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली, की जनरल डायरला -एका व्यक्तीला- दोषी ठरवून आपण नामानिराळे राहण्याची ब्रिटिश प्रशासनाची प्रवृत्ती बदलण्याची आशा व्यर्थ आहे. हंटर समितीसमोर साक्ष देताना खुद्द डायरने आपल्या निर्णयाचे व हिंसक कृत्याचे केलेले समर्थन आणि कालांतराने ब्रिटिश पार्लमेंटमध्ये झालेल्या चर्चेमध्ये विन्स्टन चर्चिलसारख्या नेत्यांनी घडवलेले साम्राज्यवादी मानसिकतेचे दर्शन अत्यंत स्पष्ट होते.

या घटनेच्या पाश्र्वभूमीपासून परिणामांपर्यंतचा विस्तृत पट नजरेसमोर आणल्यास वरील विवेचनात अनेक जागा मोकळ्याच सोडून दिलेल्या जाणवतील. त्या जागा भरण्याचे काम कोलेट- देसाई- व्ॉग्नर यांची पुस्तके करतात.

निगेल कोलेट यांचे पुस्तक जनरल डायरबद्दलच्या धक्कादायक तपशिलांनी भरलेले आहे. ब्रिटन आणि भारत या दोन्ही देशांमधील लष्करी अभिलेखागारांमधील असंख्य कागदपत्रे अभ्यासून, डायरच्या कुटुंबीयांच्या व अन्य सहकाऱ्यांच्या प्रदीर्घ मुलाखतीही घेऊन कोलेट यांनी हे चरित्र लिहिले. वरवर पाहता त्यांनी डायरची विधिनिषेधशून्य कत्तलखोर म्हणून निंदानालस्ती केली आहे. ‘बुचर’ असेच शीर्षकात स्पष्टपणे म्हटले आहे, पण बारकाईने वाचल्यानंतर हे स्पष्ट होते की डायरला व्यक्तिगत स्तरावर दोषी वा गुन्हेगार ठरवण्याऐवजी परिस्थितीलाच दोषी मानण्याकडे त्यांचा कल आहे. एक प्रकारे डायरचे मनोविश्लेषण करण्याचाच त्यांचा प्रयत्न आहे.

डायरचा जन्म भारतात मरी येथे झालेला. भारतीयांमध्येच तो वाढलेला. इंग्रजांपेक्षा तो भारतीयांमध्येच मिसळणारा. तोतरे बोलणाऱ्या आईमधले ते वैगुण्य आनुवंशिकतेमुळे त्याच्यातही आलेले. मद्यनिर्मितीच्या क्षेत्रात चांगले यश कमावणाऱ्या वडिलांकडून श्रमप्रतिष्ठेचा संस्कार मिळालेला आणि त्याचबरोबर उपयोजित गणित व दृष्टिशास्त्र याबद्दलचे कुतूहलजन्य प्रेमही वारशाने चालत आलेले. लहानपणापासूनच मानी, करारी, समोरच्या प्रतिस्पध्र्याशी चार हात करायला नेहमीच सज्ज राहण्याचा स्वभाव. ऐन किशोरवयात आई-वडिलांपासून दूर राहावे लागल्यामुळे काहीसा एकलकोंडा, एककल्ली झालेला.. असे तपशील देता देता त्याच्या हातून पुढे घडलेल्या दुष्कृत्याची स्वाभाविक वाटणारी पाश्र्वभूमी तयार करण्याचा कोलेट यांचा हेतू चाणाक्ष वाचकाच्या लक्षात आल्यावाचून राहत नाही.

डायरचे सॅण्डहर्स्टच्या लष्करी प्रशिक्षण केंद्रात असताना सैद्धांतिक अध्ययनापेक्षा प्रात्यक्षिकांमधील प्रावीण्य संपादनाकडे अधिक लक्ष होते. बंदुकीने गोळीबार करताना लांबवरचा लक्ष्यभेद नेमकेपणाने करता यावा म्हणून त्याने रेंजफाइंडरसारख्या उपकरणाचा शोध लावून त्याचे पेटंटसुद्धा मिळवले होते. ब्रह्मदेशापासून हाँगकाँगपर्यंत वेगवेगळ्या वसाहतींमध्ये कमी-अधिक कालावधीसाठी निरनिराळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर १९१५ च्या प्रारंभी डायरच्या रेजिमेंटची रावळपिंडीत नियुक्ती झाल्यामुळे त्याला आनंद झाला होता.

त्याच सुमारास पंजाबमध्ये ‘गदर’ पार्टीच्या प्रोत्साहनाने ‘क्रांतिकारकांचा सुळसुळाट’ झाला होता. युद्धकाळात त्या तशा कारवायांना पायबंद घालण्यासाठी ब्रिटिश प्रशासनाने योजलेल्या अनेक उपायांमुळे सर्वसामान्य जनतेत असंतोष पसरत चालला होता. जनतेच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून तिला टप्प्याटप्प्याने तरी अधिकार प्रदान करण्याऐवजी ओडवायरसारखे पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर रौलट कायद्यासारख्या जुलमी हत्याराचाच अवलंब करीत होते. आफ्रिकेतून मायदेशी परतलेले गांधी काँग्रेससारख्या संघटनेचे सदस्य झाले नसले, तरी सत्याग्रहासारखे अनोखे अस्त्र परजून अहिंसक मार्गाने ब्रिटिश सरकारकडून हक्क मिळवण्याच्या प्रयत्नात होते. डॉ. सैफुदिन किचलू आणि डॉ. सत्यपाल यांच्यासारखे स्थानिक नेते सत्याग्रहाच्या त्या मोहिमेत सहभागी झाल्यामुळे प्रशासनाच्या रोषाला पात्र ठरले होते. जनतेमधील असंतोष फक्त निदर्शनांपुरताच मर्यादित न राहता अमृतसर रेल्वे स्थानकावरचे व आजूबाजूचे रूळ उखडून टाकण्यापर्यंत आणि विजेच्या तारा तोडून प्रशासनाला एकटे पाडण्यापर्यंतही तो पोचला होता.

त्यामुळेच डायरने शहरात १९ ठिकाणी दवंडी पिटून जमावबंदीची सूचना दिली होती आणि तरीही जालियनवाला बागेत हजारो लोक सभेसाठी एकत्र जमल्याचे वृत्त समजल्यामुळे तो बिथरला. त्याने जमावाला धडा शिकवायचा निर्णय घेतला आणि गुरखा रेजिमेंटच्या व फ्राँटियर फोर्सच्या बरोबर असणाऱ्या सैनिकांना बागेत शिरून गोळीबार करण्याच्या पवित्र्यात उभे राहण्यास सांगितले. हवेत गोळीबार करून लोकांना पांगवण्याचा प्रयत्नसुद्धा त्याने केला नाही, कारण जमावबंदीचा आपला आदेश न जुमानणाऱ्यांना धडा शिकवण्याचाच त्याने अवघ्या तीन सेकंदांत निर्णय घेतला होता.

आधी प्रशासनाने हे सारे प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न केला, पण तो यशस्वी होणे कठीणच होते. प्रशासनाला आपली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी चौकशी समिती नेमावीच लागली. त्या हंटर समितीसमोर साक्ष देताना डायरने बिनदिक्कतपणे त्या कृतीचे समर्थनच केले. तथापि, समितीने मृतांची संख्या ३७९ असल्याचे निश्चित केले व त्याची जबाबदारी डायरवर टाकून त्याची लष्करी चौकशी केली जावी, अशी शिफारस केली.

त्या चौकशीअंती डायरला दोषी मानण्यात आले. त्याला सैन्यातून बडतर्फ करण्यात येऊन कोणतेही आर्थिक लाभ दिले जाणार नाहीत, असेही निश्चित करण्यात आले. पुढे ब्रिटिश पार्लमेंटमध्येही यावर चर्चा झाली. ब्रिटनच्या अंतर्गत राजकारणातील पक्षोपपक्षांमधील सत्तास्पर्धेचेही प्रतिबिंब त्या चर्चेत पडले. परंतु एकंदर कल साम्राज्यवादी अभिनिवेशानेच प्रभावित झालेला होता.

कोलेट यांच्या या पुस्तकात अशा असंख्य लहान-मोठय़ा बाबींबद्दल तपशील आढळतात. त्यामुळे ‘द बुचर ऑफ अमृतसर’ लक्षवेधी आणि प्रभावी ठरले आहे. तथापि, हा सारा खटाटोप डायर हा बळीचा बकरा ठरवला गेल्याची भावना निर्माण करण्यासाठी तर नाही ना, असा संशय पुस्तक वाचताना वारंवार येतो.

किश्वर देसाई यांचे पुस्तक हे कोलेट यांच्या पुस्तकाच्या पाश्र्वभूमीवर भारतीय दृष्टिकोनातून लिहिलेले म्हणून अधिकच उठून दिसते. भारतीय संदर्भ साहित्याला त्यांनी अधिक प्रमाण मानले आहे. शिवाय डायरचे कृत्य हे एखाद् दुसऱ्या अधिकाऱ्याच्या हातून क्षणिक अविचारातून घडलेले कृत्य नव्हते, ते ब्रिटिश प्रशासनाच्या गुर्मीचे प्रातिनिधिक कृत्य होते, हे सिद्ध करण्याच्या हेतूने उपलब्ध पुराव्यांची त्यांनी तर्कशुद्ध पद्धतीने मांडणी केली आहे. महायुद्धकाळात रासबिहारी बोस यांच्या प्रयत्नांमुळे पंजाबमध्ये क्रांतिकारक उठावाला अनुकूल वातावरण कसे तयार झाले होते आणि त्याची चाहूल लागताच ब्रिटिश प्रशासनाने कशी दडपशाही आरंभली होती, याचे असंख्य पुरावे या पुस्तकामुळे अभ्यासकांना उपलब्ध झाले आहेत. ब्रिटिश अधिकाऱ्यांची ‘त्या’ घटनेपूर्वीची तयारी आणि बंदोबस्तासाठी विमानांचीसुद्धा मागवलेली कुमक तत्कालीन कागदपत्रांतून स्पष्ट होते. जनतेविरुद्ध युद्ध पुकारण्याची मन:स्थिती तयार झालेली असताना तिला चिरडण्याची संधी आपल्याला भाग्यानेच मिळते आहे, अशी भावना डायरच्या मनात कशी उद्भवली असेल आणि जालियनवाला बागेत हजारोंच्या संख्येने एकत्र आलेले नि:शस्त्र लोक ठार मारण्यात त्याला कसा आसुरी आनंद झाला असेल, याचे ‘अ गिफ्ट ऑफ फॉच्र्युन’ आणि ‘काऊंटिंग द कॉप्र्सेस’ या दोन प्रकरणांच्या ६५ पानांमध्ये केलेले विवेचन मुळातून वाचावे इतके महत्त्वपूर्ण आहे.

हत्याकांडानंतरच्या दडपशाहीचे वर्णन करणारे ‘द फॅन्सी पनिशमेंट्स’ हे ७५ पानी प्रकरण म्हणजे ब्रिटिश राज्य यंत्रणेच्या तथाकथित न्यायप्रियतेचे आणि विवेकबुद्धीचे काढलेले वाभाडे आहेत. ब्रिटिश प्रशासन सूड घ्यायला कसे उतावीळ झाले होते, हत्याकांडानंतरही पंजाबच्या ग्रामीण भागातून सैन्यभरती सुरूच राहावी म्हणून विमानांतून बॉम्बफेक करवून दहशत कशी माजवली जात होती, हेसुद्धा या प्रकरणात दाखवून देण्यात आले आहे. नंतरच्या प्रकरणात ब्रिटिश प्रशासन फक्त वंशवादी होते की फॅसिस्ट होते की दोन्ही अवगुणांचे धनी होते, असा प्रश्न उपस्थित करून त्याचा साधकबाधक ऊहापोह करण्यात आला आहे. ‘यू कॅन नॉट किल अ टायगर जंटली’ या समारोपाच्या प्रकरणात हत्याकांडाबद्दल ब्रिटिश पार्लमेंटमध्ये झालेल्या चर्चेचा आढावा आहे.

बाह्य़ स्वरूपात यत्किंचितही वाचकस्नेही नसलेले किम ए. व्ॉग्नर यांचे पुस्तक जालियनवाला बाग हत्याकांडाचे यथोचित आकलन होण्याच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे आहे. या घटनेच्या पाश्र्वभूमीबद्दल वा नंतरच्या घडामोडींबद्दल फारसे काही विवेचन करण्याच्या फंदात न पडता केवळ एप्रिल १९१९ मधील अमृतसरवरच लक्ष केंद्रित केल्याचे व जागतिक इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेकडे अतिसूक्ष्म दृष्टिकोनातून पाहण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी प्रस्तावनेत स्पष्ट केले आहे.

१८५७ साली झालेल्या सशस्त्र उठावाचे आव्हान मोडून काढण्यात त्या वेळी ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना जरी यश मिळाले होते, तरी या देशाची सूत्रे कंपनीकडून आपल्या हातात घेणाऱ्या ब्रिटिश राज्यकर्त्यांना त्या प्रकाराच्या पुनरावृत्तीची शक्यता पुढे कायमच भेडसावत राहिली होती. १९१९ मध्ये एका बाजूने महायुद्ध संपल्यानंतरचा थकवा वातावरणात जाणवू लागला होता, तर दुसऱ्या बाजूने हातात काहीही न पडल्यामुळे सामान्य भारतीयांच्या मनात असंतोष खदखदू लागला होता. त्या असंतोषाला रौलट कायद्याविरुद्ध सुरू झालेल्या सत्याग्रहामुळे वाढती धार प्राप्त होऊ लागली होती. कोणते तरी मोठे कटकारस्थान शिजते आहे अशा संशयाने पंजाबमधील सर्व प्रशासन कसे पछाडले होते. प्रशासनाला ‘सत्याग्रही’ म्हणजे बंडखोर सैनिकच कसे भासू लागले होते, गांधीजी किंवा लाला लजपतराय यांच्यासारख्या बडय़ा नेत्यांप्रमाणेच डॉ. किचलू-डॉ. सत्यपाल यांच्यासारखे स्थानिक नेतेसुद्धा बडय़ा कटाचे सूत्रधार असावेत अशी शंका येऊन प्रशासन दडपशाहीची योजना कशी अमलात आणत होते, याचे असंख्य तपशील व्ॉग्नर यांनी पुस्तकात दिले आहेत. प्रत्यक्ष हत्याकांडाचा दिवस उजाडण्यापूर्वीच्या घटना व त्यांच्यामागचे विविध संदर्भ उलगडून दाखवण्यासाठी त्यांनी केलेले तारीखवार विवेचन ‘सूक्ष्म इतिहास लेखना’चा वस्तुपाठ ठरावे, इतके प्रभावी झाले आहे.

जालियनवाला बागेतील हत्याकांडावरील या तिन्ही पुस्तकांमध्ये तेच तेच काही तपशील पुन:पुन्हा वाचावे लागतात; त्याला इलाज नाही. परंतु प्रत्येक पुस्तकात वेगळेसुद्धा बरेच काही सापडते. भावनांचा प्रक्षोभ होतो, तसेच बुद्धीला खाद्यही मिळते. विचारांना चालना मिळते. जुन्या प्रश्नांना उत्तरे सापडतात, तोच नवे प्रश्नही समोर उभे राहतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 100 years of jallianwala bagh massacre book on jallianwala bagh