राजेश बोबडे

बुवाबाजीविरुद्ध आक्षेप कसे घ्यावेत, याचे चिंतन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वेळोवेळी केले आहे. ‘‘जगात जिकडे तिकडे, सर्व धर्म संप्रदायात बुवांचा सुळसुळाट झाला’ हे म्हणून दाखवण्याआधी लोकांनाच ते दिसत आहे; मग असे झाले म्हणण्याचा अधिक काय बोध होणार? असे आपण लोकांना नेहमी दाखवल्याने किंवा अश्या बुवांचे नेहमी उणे चिंतल्यानेच आपण बुवांच्यापेक्षा लोकात अधिक उठून दिसणार आहोत आणि लोक आपल्याला आश्रय देणार आहेत का?’’ असा प्रश्न करून महाराज म्हणतात , ‘‘ज्या वाईट बाबींचा आम्ही तिरस्कार करतो त्या स्वत:मध्ये तिळमात्र न दिसण्याचा प्रयत्न केला पाहिजे व हे न सांगता लोकांच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे; तरच आपण आपले भले करू शकू.

नाहीपेक्षा बुवा ‘बुवाबाजी’ करतो म्हणून तुच्छ आणि ‘बाजी’ची उखाडपछाड करणारे आपलीच ‘बाजी’ मिरवतात म्हणून तुच्छ; असे म्हणण्याचा प्रसंग येऊ नये. त्याकरिता, ‘निर्लोभीपणा, समजंस वृत्ती, उदारपणा, त्याग व खरी देश किंवा देवसेवा यात आमचे अंत:करण आहे’ हे लोकांना आपल्या आचरणातून न सांगता दिसले तरच तुमच्या त्या म्हणण्याचा माणुसकीच्या लोकांवर परिणाम होईल; नाहीपेक्षा ‘बुवाबाजी’ला वाणीने व कलेने रंगवून दाखवणारे, नव्हे त्याचे अति बारीक छिद्र पाहणारे हे ‘अवास्तव युक्तिवादी’ ठरतात! मग एवढे काय म्हणून लोक आपल्याला मानतील? एवढेच की काही भोळेबापडे लोक बुवाच्या पाशात पडून चकनाचूर होतात त्याऐवजी काही युक्तिवादाची चर्चा करणाऱ्या, ‘खिलाडूबाजी’ काढणाऱ्या लोकांचे अनुयायी म्हणून राहतील; पण एवढय़ाने देशाचे वा धर्माचे भागते, असे कोण म्हणेल? त्याकरिता समाजाला काय हवे आणि पूर्वीच्या खऱ्या लोकांनी काय केले आहे किंवा काय केल्याने उत्तम वा वाईट होते, हे सांगण्यात जर आपली ऊर्जा खर्च केली तरच जगाचे कल्याण होणार आहे.. आणि असे सांगताना आपणही ‘एक बुवा’च आहो असा सकल समाजाचा समज होणार आहे, एवढे नक्की!

महाराज आपल्या ‘आदेश रचना’ ग्रंथात लिहितात : 

चमके हिरा तेजे स्वये,

म्हणुनी निघाले काचही ।

या संतपुरुषा पाहुनी,

नकली निघाले भक्तही ।।

विपरीत ना घे भावना –

‘असली हिऱ्याची जात ना’।

निजधर्मतत्वा शोधण्या,

कर सामुदायिक प्रार्थना ।।

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rajesh772@gmail.com