हृदय-शल्यचिकित्सक म्हणून विख्यात असलेले डॉक्टर मार्तंडवर्मा शंकरन् वालिआथन हे कधीतरी १९८० च्या दशकात एका शेळीच्या मृत्यूने व्यथित झाले नसते, तर पुढे पद्माश्री (२००२) आणि पद्माविभूषण (२००५) किंवा अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचा वैद्याकीय शिक्षणकार्यासाठीचा पुरस्कार (२००९), फ्रेंच सरकारचा ‘शवालिए’ किताब (१९९९) आदी अनेक सन्मानही त्यांच्याकडे फिरकले नसते. वालिआथन यांना व्यथित करणारी ती शेळी साधीसुधी नव्हती… तिच्या हृदयात डॉ. वालिआथन यांनीच, संपूर्णत: भारतीय बनावटीची कृत्रिम झडपे बसवली होती. त्याआधीच्या काही वर्षांतल्या बऱ्याच संशोधनानंतर दोनदा सुधारणा करून मगच ही झडपे त्या शेळी-हृदयात बसवली गेल्याने तिच्या जीवनमरणावर बरेच काही अवलंबून होते… चाळिशीतले हृदयरोगी पोराबाळांची शिक्षणे पूर्ण होईपर्यंत तरी जगणार की नाही, हेसुद्धा! पण ती शेळी तीन महिन्यांत गेली. मग डॉ. वालिआथन यांना आणखी पाच-सहा वर्षे प्रयोग करत राहावे लागले. अखेर १९९० मध्ये यश मिळाले.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध: सुनीती जैन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. वालिआथन यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या या कृत्रिम झडपांची उघडझाप दरवर्षी चार कोटी वेळा करणारे अनेक रुग्ण अगदी २०१५ मध्ये, तिरुवनंतपुरमच्या ‘श्री चित्रा मेडिकल इन्स्टिट्यूट’मधील एका इमारतीला डॉ. वालिआथन यांचे नाव देण्याच्या सोहळ्यासही उपस्थित होते. ही ‘श्री चित्रा मेडिकल इन्स्टिट्यूट’ म्हणजे त्रिवेन्द्रमच्या राजघराण्याने दान केलेल्या महालात, केरळ सरकारने १९७६ पासून उभारलेली प्रगत वैद्याकीय संस्था. १९३४ मध्ये जन्मलेले डॉ. वालिआथन हे १९६० दशकातच शिष्यवृत्तीवर रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स (एडिंबरा) आणि लिव्हरपूल विद्यापीठात हृदय-शल्यचिकित्सेची पदव्युत्तर पदवी मिळवून मायदेशी परतले होते आणि तिरुवनंतपुरमच्या ज्या एकमेव वैद्याकीय महाविद्यालयाच्या पहिल्या ‘बॅच’मधून एमबीबीएस झाले तिथे शिकवू लागले होते. अशा वेळी ‘चित्रा इन्स्टिट्यूट’चा हृदय विभाग सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली. ती स्वीकारताना ‘केवळ उपचार नव्हे- संशोधन’ हे ब्रीद त्यांनी जपले. दोनच वर्षांत हृदय-झडपेवर संशोधन सुरू झाले. अनेक अपयशांनंतर, १९९० मध्ये फळास आले. ‘चित्रा व्हॉल्व्ह’ अवघ्या ११ वर्षांत भारतीय आणि आशियाई अशा ५५ हजार रुग्णांमध्ये हृदयस्थ झाला. नियमाप्रमाणे राज्य सरकारच्या नोकरीतून १९९४ मध्ये डॉ. वालिआथन निवृत्त झाले होते. वैद्याकीय पेशातला ‘लोकसेवक’ कसा असावा, याचा आदर्श घालून देणारे हे डॉ. वालिआथन १७ जुलै रोजी निवर्तले. संशोधनाखेरीज वैद्याकोपचार स्वस्त होत नसतात आणि संशोधनासाठी सरकारी मदत आवश्यकच असते, हा त्यांचा जीवनसंदेश मात्र कदाचित अंधारातच राहील.