‘झेमिन ते जिनिपग’ हा अग्रलेख (३ डिसेंबर) वाचला. त्यात वर्णन केल्याप्रमाणे खरे तर सध्याचे चीनचे अध्यक्ष जिनिपग काय किंवा रशियाचे पुतीन काय, किंवा उत्तर कोरियाचे किम जॉन काय हे सगळे जर्मनीचा क्रूरकर्मा हिटलरचे वंशज. या अशा आक्रमक सत्ताधाऱ्यांमुळे सगळय़ा जगभरातीलच शांतता आणि सुव्यवस्था कशी धोक्यात येत आहे हे आज रशिया युक्रेन युद्धामुळे सगळे जग पुन्हा अनुभवते आहे, आणि यापुढे चीनचे जिनिपग हे तैवानवर आक्रमण करणार नाही, याची हमी सध्या तरी कोणीच देऊ शकत नाही. जिनिपग यांच्या आक्रमक धोरणामुळे तैवान प्रश्नावरून युरोप अमेरिकेचेही चीनशी संबंध ताणलेले आहेत. आज करोना आपत्तीमुळे सगळय़ा चीनलाच त्यांनी बंदिगृह बनवले आहे. म्हणूनच अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे चीनचा कोंडवाडा करणाऱ्या जिनिपग यांच्यापेक्षा झेमिन हे चिनी जनतेला देवदूतासमान वाटतात. – अनिल दत्तात्रेय साखरे, ठाणे

जिनिपग यांची कारकीर्द भरकटल्यासारखी वाटते
‘झेमिन ते जिनिपग’ या संपादकीयात एका विधानाने लक्ष वेधले, ते म्हणजे ‘जिनिपग यांच्यासमोर आदर्श माओ त्सेतुंग यांचा.’ माओ भारतभेटीवर आले तेव्हा आम्ही ‘हिंदूी चीनी भाई भाई’चे नारे दिले आणि १९६२च्या भारत-चीन या अपयशी युद्धाचे साक्षीदार बनलो. माओ युद्धखोर, सैनिकी ताकदीचा भोक्ता, भांडवलदारांचा विरोधक आणि शेतकरी कष्टकरी यांचा समर्थक, साम्राज्यवादी आणि व्यक्तिपूजक. दुर्लक्षित, दरिद्री चीनला जागतिक नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी त्याला जे करणे आवश्यक वाटले ते त्याने केले. पण जिनिपग या बाबतीत नेहमीच काहीसे गोंधळलेले दिसतात. ते ना धड पूर्णपणे माओकडे झुकत ना झेमिनकडे. पण माओ असो वा झेमिन, त्यांच्या त्यांच्या काळातील चीनची जी गरज होती, ती पूर्ण करण्यात ते दोघेही यशस्वी ठरले. पण जिनिपग मात्र चीनला अमेरिकेच्या तोडीची महासत्ता बनविण्याच्या त्यांच्या उद्देशात ना जागतिक पातळीवर चीनचे महत्त्व अधोरेखित करण्यात यशस्वी होताना दिसत आहेत, ना झेमिनप्रमाणे अंतर्गत पातळीवर जनतेचा विश्वास, आदर आणि लोकप्रियता मिळवू शकत आहेत. पाकसारखा एकमात्र मतलबी मित्र सोडला तर जिनिपग यांचा जागतिक पातळीवर खात्रीलायक मित्र नाही. – अॅड. एम. आर. सबनीस. अंधेरी, मुंबई

Paris Olympics Opening ceremony faces major changes
ऑलिम्पिक सोहळा पुन्हा स्टेडियममध्ये? सुरक्षेचा धोका असल्याची फ्रान्सच्या अध्यक्षांना भीती
worlds eldest person
सुदृढ आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी काय लागतं? १९०० मध्ये जन्मलेल्या व्यक्तीनं सांगितलं सोपं गुपित!
loksatta analysis survey in britain predict uk pm rishi sunak s seat at risk
विश्लेषण: ब्रिटनमध्ये पंतप्रधान ऋषी सुनक यांचे पद धोक्यात? ताज्या निवडणूक सर्वेक्षणाचा निष्कर्ष काय?
Thailand House of Representatives approves same sex marriage
समलैंगिक विवाहाला आता थायलंडमध्येही मान्यता… हा प्रवास आव्हानात्मक कसा ठरला?

जिनपिंग यांना सगळ्यांचे शत्रुत्व का हवे आहे?
‘झेमिन ते जिनिपग’ या संपादकीयावरून झेमिन आणि जिनिपग यांच्या राजकीय कारकीर्दीचे अवलोकन करता आले. हे दोन्हीही तुल्यबळ नेते, प्रखर महत्त्वाकांक्षी, दृढ देशभक्त आणि तेवढेच चतुर मुत्सद्दी, पण फरक असा दिसतो की झेमिन हे लोकांच्या मनावर राज्य करत होते. जिनिपग यांना विरोध करताना चीनमध्ये झेमिन यांची पोस्टर्स दाखवली जातात, यावरून त्याची प्रचीती येते. जिनिपग यांची जागतिक राजकारणात असणारी दुटप्पी भूमिका कधी-कधी अभ्यासकांना बुचकळय़ात टाकते. जिनिपग यांना जगातील इतर राष्ट्रांचा रोष ओढून काय साध्य करायचे आहे हे कोडेच आहे. – शरद शिंदे, राहुरी

आधीचे निर्णय बदलून म्हणे आम्ही महान..
‘प्लास्टिकवरील निर्बंध शिथिल, एकदा वापरायची ताटे, वाटय़ा, पेल्यांवरील बंदी उठवली’ हे वृत्त (२ डिसेंबर) वाचून नवल वाटले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक मंडळ व पर्यावरणतज्ज्ञ समिती यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे यांची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्लास्टिकची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना आनंदाचे उधाण आले असणार. प्लास्टिक वस्तूंची योग्य ती विल्हेवाट लावून, त्या कचरा पेटीत टाकण्याची सवय अनेकांना नसते. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या लोक रस्त्याने जाताना, गाडीतून रेल्वे मार्गावर इतस्तत: फेकताना दिसतात. त्यामुळे भर पावसात प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे पाणी तुंबते आणि वाहतूक विस्कळीत होते. तसेच या प्लास्टिकच्या पिशव्या खाऊन, काही गायी, गुरे मेल्याची उदाहरणे आहेत. त्यांचा कोण विचार करणार? सांगायचे तात्पर्य हेच की, महाविकास आघाडी सरकारने, त्या त्या परिस्थितीनुसार, जनहितार्थ काही चांगले निर्णय घेतले होते. ते बदलून, त्यांना तोंडघशी पाडणे, आणि आपले सरकार कसे महान आहे, हे दाखवण्याचा शिंदे-भाजप गटाचा हा प्रयत्न आहे. – गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली, मुंबई

विघटन होणाऱ्या प्लास्टिकचा शोध लागलाय?
एकदाच वापरल्या जाणाऱ्या आणि विघटन होऊ शकणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू, अर्थात पिशव्या, ताटे, वाटय़ा चमचे आदींच्या वापरावरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पण यातील एक तरी वस्तू विघटन होऊ शकणारी आहे का? विरघळणारे किंवा विघटन होणाऱ्या प्लास्टिकचा जगात शोध कधी लागला? व्यापाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आणि आम्ही पर्यावरणाचा विचार करूनच अशी सवलत देत आहोत म्हणत जनतेच्या डोळय़ात धूळ फेकण्यासाठी विघटन शब्द वापरला असावा का?एकदा निर्बंध शिथिल झाले की अनिर्बंध धंदा व वापर सुरू होणार. त्याला सरकार कसा आवर घालणार? जागतिक तापमानवाढीबद्दल जागतिक मंचावर काळजी दाखवणारे की, राज्यात निर्बंध शिथिल करणारे? जनतेनेच आता अशा वस्तूंचा वापर टाळावा. अन्यथा सर्व काही ठीकच आहे. – राजन र. म्हात्रे, मुंबई

आलीऔ सिसे हा आदर्शवत!
सेनेगलचे प्रशिक्षक आलीऔ सिसे यांचा ‘अन्यथा’मधून गिरीश कुबेर यांनी उलगडलेला जीवनप्रवास वाचनीय आहे. अत्यंत गरीब राष्ट्र असलेल्या सेनेगलला यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत पोहोचविण्याचे कसब आलीऔ सिसे यांच्यामुळेच शक्य झाले. त्यांची संपूर्ण कारकीर्द आदर्शवत आहे. भारतातही गरिबीतून क्रिकेटच्या विश्वात पोहोचलेल्या काही खेळाडूंचा थक्क करणारा प्रवास आपण पाहिला. दुर्दैवाने काही खेळाडूंना यश पचविता आलेले नाही. काही खेळाडू गरिबीतून पुढे येऊनही गरीब खेळाडूंना साथ देण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत आलीऔ सिसे यांनी आपल्या गरीब देशाचे प्रशिक्षकपद भूषविल्याची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. – राजलक्ष्मी प्रसाद, मुलुंड, ठाणे</strong>

त्यापेक्षा खऱ्या प्रश्नांकडे लक्ष द्या
‘अथर्वशीर्ष अभ्यासक्रम स्थगित करा : प्राध्यापकांचे कुलगुरूंना निवेदन’ वृत्त वाचले (३ डिसेंबर) अथर्वशीर्षचा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू करण्यात आला असून तो पूर्णत: ऐच्छिक आणि विनामूल्य असल्याने त्याला विरोध का, असे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे आहे. अथर्वशीर्षांचा अभ्यासक्रम सुरू करावा अशी मागणी हिंदू धर्मीय विद्यार्थ्यांनी केल्याचे ऐकिवात नाही. समजा ती केली असेल तर अन्य धर्मीय विद्यार्थीही त्यांच्या त्यांच्या धर्मातील अशाच स्वरूपाच्या अभ्यासक्रमांची मागणी करू शकतील आणि हे प्रकरण मारुतीच्या शेपटासारखे लांबत जाईल. त्यामुळे असे वाद वाढवत बसण्यापेक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरणे, शैक्षणिक सत्र वेळेवर सुरू करणे, विद्यापीठाचा घसरता दर्जा आणि रँकिंग सावरणे, विद्यापीठाची शासनाकडील थकीत रक्कम त्वरित अदा करणे ही विद्यापीठाच्या हिताची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत म्हणजे विद्यापीठाचा कारभार सुरळीत होईल आणि नावलौकिकात भर पडेल. खऱ्या समस्यांवर भर द्यावा. नाही त्या गोष्टी उकरून कालापव्यय करू नये. – डॉ. विकास इनामदार, पौड रोड, भूगाव, पुणे

रॉय दाम्पत्याचे हे चुकले..
‘रॉय दाम्पत्याचे काय चुकले?’ हे विश्लेषण (२ डिसेंबर) वाचले. सेबीनुसार, सुरुवातीस २००८ मध्ये एनडीटीव्हीचे प्रवर्तक (रॉय दाम्पत्य) व त्यांची धारक संस्था यांनी इंडिया बुल्सकडून ५४० कोटी रु.चे कर्ज काढले होते. ते फिटवण्यास आयसीआयसीआय बँकेकडून ३७५ कोटी रु.चे कर्ज घेतले व नंतर ते फेडण्यास २००९ मध्ये विश्वप्रधान कंपनीकडून ३५० कोटी रु.चे कर्ज घेतले. विश्वप्रधान कंपनी ही अंबानी समूहातील असून तिने वरील कर्ज बिनव्याजी दिले होते. पुढे ही कंपनी अंबानींकडून अदानींकडे आली. सेबीच्या म्हणण्यानुसार, विश्वप्रधानचे २०१७ मधील उत्पन्न केवळ ६० हजार रु. असून, सुमारे ४०० कोटींची कर्जे व आगाऊ व्यवहार ताळेबंदावर होते. सेबीने असे आरोप केले की, वरील व्यवहार हा प्रत्यक्षात एनडीटीव्हीला ताब्यात घेण्यासाठी होता; परंतु ही बाब लपवण्यासाठी या व्यवहाराला एक वेगळेच स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला. तात्पर्य, एनडीटीव्ही ही वृत्तसंस्था त्या वेळीच अंबानींना जवळपास विकली गेली होती! पुढे सेबीने विश्वप्रधानला एनडीटीव्हीचे समभाग घेण्याचा (कायदेशीर तरतुदीप्रमाणे) उघड प्रस्ताव ठेवण्यास भाग पडले. मुख्य म्हणजे, २०१९ मध्ये सेबीने रॉय दाम्पत्त्य व त्यांची धारक संस्था यांना वरील कर्ज व्यवहार प्रकट न केल्याबद्दल दोषी ठरवून, त्यांच्या समभाग उलाढालीवर २ वर्षांसाठी बंदी घातली. येथेच हे प्रकरण थांबले नाही व पुढे सेबीने अंतर्गत समभाग व्यापाराचे (इन्सायडर ट्रेिडग) चे आरोप रॉय दाम्पत्यावर लावले. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. वरवर पाहता, अशी शक्यता वाटते की, रॉय दाम्पत्याने सगळे व्यवहार उघड केले नसावेत. एक वेगळी बाजू म्हणजे सेबी, ईडी, इ. संस्था खरोखर नि:पक्षपातीपणे काम करतात काय हा प्रश्न या प्रकरणी उभा राहतो. शिवाय एनडीटीव्हीतील काही कर्मचाऱ्यांचे पालक वृत्त व्यवसायाशी निगडित होते हे साटेलोटे नाकारता येत नाही. निर्भीड पत्रकारितेमध्ये सत्ताधाऱ्यांशी संघर्ष अटळ असतो; परंतु, एनडीटीव्ही हे सहसा काँग्रेसधार्जिणे असल्याचे आरोपही अनेकदा झाले आहेत. एकंदर, एक बऱ्यापैकी स्वतंत्र बाण्याची, कमी आरडाओरडा करणारी, जरा कमी सवंग अशी ही वृत्तसंस्था आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीकडे हस्तांतरित होत आहे असे चित्र दिसते. – हर्षवर्धन वाबगावकर, मुंबई
loksatta@expressindia.com