सर्वप्रथम स्वत:ला महाभारतातला ‘संजय’ समजणाऱ्या व्यक्तीचा मी निषेध करतो. माझ्या आडनावात एक ‘आकडा’ ध्वनित होतो. त्याचा मला अभिमान आहे. मात्र विकृत मनोवृत्तीच्या या व्यक्तीने या आकडयाचा संबंध थेट पत्त्याशी जोडण्याचा कृतघ्नपणा केला. त्यासाठी राज्यातील विचारी जनता त्या व्यक्तीला कधीही माफ करणार नाही. राजकीय व्यस्ततेतून कुटुंबासाठी वेळ काढून त्यांना फिरायला नेणे यात काहीही गैर नाही. प्राचीन व आधुनिकतेचा सुंदर मिलाफ असलेल्या मकाऊची मी निवड केली. तरीही माझी नाहक बदनामी केल्यामुळे या निवेदनाद्वारे वस्तुस्थिती जनतेसमोर मांडत आहे. ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेला सर्वोच्च मान देणाऱ्या पक्षाचा पाईक म्हणून मी नुकतेच महाभारताचे वाचन केले. या महाकाव्यातील युद्धाला कारणीभूत ठरलेला द्यूताचा खेळ माझ्या मनात घर करून होता.
मकाऊला गेल्यावर तेथील इतिहासाची चांगली जाण असलेल्या वाटाडयाने चीनमध्ये ‘अधिकृत’ असलेला जुगाराचा खेळ महाभारतातल्या याच द्यूतावर बेतलेला अशी माहिती दिली. त्यातून माझी उत्सुकता जागी झाली. भारत आणि चीनमधील सांस्कृतिक संबंध अतिशय जुने. त्या परंपरेला नवा आयाम देणारा हा खेळ नेमका काय हे तपासून बघण्याचे मी ठरवले. आयुष्य हे जुगार आहे व राजकारण हा त्यातला कॅसिनो असे लोक म्हणत असले तरी आयुष्यात मी कधीच जुगार खेळलो नाही. त्यामुळे वाटाडयाच्या मदतीने हा द्यूतसदृश खेळ नेमका कसा खेळला जातो हे बघायचे ठरवले. मी खुर्चीसोबतच टेबलाचा आदर करणारा माणूस. मात्र टेबलावरील निंद्य पदार्थ व वस्तूंपासून मी कायम अंतर राखलेले. मात्र हा खेळ समजून घ्यायचा असल्याने मी टेबलावर बसलो. या खेळाचे संगणकीकरण कसे झाले हे वाटाडया व शेजारी बसलेल्या चिनी बांधवाकडून समजून घेतले.
हेही वाचा >>> अन्वयार्थ : मस्क यांची मस्ती!
मी परंपरावादी असल्याने तिथल्याही परंपरेचा मान राखावा असे ठरवले. त्यामुळे न खेळताही त्यांनी माझ्यासमोर ‘क्वाईन’ आणून ठेवले तेव्हा मी कुठलीही हरकत घेतली नाही. क्वाईन हा शब्द द्यूतातल्याच ‘फासे’ या शब्दापासून तयार झाला हे जेव्हा सांगण्यात आले तेव्हा माझा ऊर अभिमानाने भरून आला. महाभारतात शकुनीमामाने तयार केलेले फासे विशिष्ट हाडांपासून बनवल्याचे ठाऊक असल्याने मी क्वाईनची उत्पत्ती कशी झाली याची विचारणा केली व त्यासाठी म्हणून ते हातात धरले. तेव्हा शकुनीने फासे वश करून घेतले होते. खेळासोबत ही लबाडीसुद्धा इथे चालते का अशी विचारणा मी केली. माझी कुतूहलबुद्धी अजूनही शाबूत असल्याने द्यूत व हा खेळ एकसारखा कसा यावरून बरेच प्रश्न विचारले. भारतात मूळ असलेल्या द्यूताला आधुनिकतेचा साज चढवून त्याचे व्यापारात रूपांतर करणाऱ्या चिनींची कल्पकता बघून मी चकित झालो. कॅसिनोचा प्रसार जगभर झाला असला तरी त्याचे मूळ भारतीय द्यूतात दडलेले अशी प्रांजळ कबुली देणाऱ्या वाटाडयाचे मी कौतुक केले. या अर्ध्या तासात मी जुगार खेळलो नाही, त्यामुळे साडेतीन कोटी हरण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. एका सामान्य कुटुंबातून समोर येत कधीकाळी ऑटोरिक्षा चालवून मोठा होत सध्या मध्यमवर्गीय जीवन जगणारा मी सामान्य माणूस. त्यामुळे कोटी काय लाख रुपयेसुद्धा अशा वाईट गोष्टीवर खर्च करणे मला झेपणारे नाही. राज्यात नवे सरकार आल्यापासून सगळया ऑटोवाल्यांचा द्वेष करणाऱ्या कथित ‘संजय’ने ही गोष्ट ध्यानात ठेवावी व देशहितासाठी कलम झिजवण्याचे काम सोडून कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावणे बंद करावे. अन्यथा त्यांना भविष्यात आणखी गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल हे लक्षात असू द्यावे.