शशिकांत ऊर्फ नाना मुळे हे नाव अभिजात संगीताच्या क्षेत्रात सर्वश्रुत आहे, ते त्यांच्या उत्तम तबलासाथीमुळे. गेली पाच दशके देशातील सर्व दिग्गज कलावंतांबरोबर मैफलीत तबल्याची साथसंगत करणाऱ्या नानांना महाराष्ट्र शासनाचा यंदाचा पं. भीमसेन जोशी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. सहसा असे पुरस्कार गवयांना मिळतात. संगतकारांच्या वाटय़ाला केवळ टाळय़ा आणि रसिकांची दाद! नाना मुळे यांना हा पुरस्कार देऊन शासनाने संगतकारांचाही सन्मान केला आहे.
तालवाद्यांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी मोठी साधना लागते. संगतकारांना या साधनेबरोबरच संगीताचे आणि कलावंताच्या प्रतिभेचेही भान असावे लागते. नाना मुळे यांच्याकडे ते आहे, म्हणूनच तर सगळे बिनीचे कलावंत त्यांनाच साथीला बसण्यासाठी आग्रही असत. वयपरत्वे आता मैफलीत त्यांचे दर्शन होत नाही, हे खरे; परंतु त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील टवटवीतपणाला मात्र खळ पडलेली नाही. पं. भीमसेन जोशी यांच्यासारख्या कलावंताबरोबर भारतभर दौरे करत संगत करण्याची संधी त्यांना मिळाली. भारतातील सर्व कलावंत त्यांच्या प्रेमात पडले, याचे कारण त्यांच्या वादनातील शीतलता आणि समज. गाण्यात तबलावादकाने गायकाला हरवायचे नसते, की आपलीच कला जोमाने मांडायची नसते. गाण्याला समांतर जात कलावंताला संगत करणे हेही एक कसब असते. नानांकडे ते आहे.
‘कटय़ार काळजात घुसली’ आणि ‘मत्स्यगंधा’ या नाटकांच्या शेकडो प्रयोगांतून नाना मुळे यांनी रंगतदार साथ केली. त्या वेळी प्रेक्षकांकडून त्यांना नेहमीच विशेष दाद मिळत असे. गायक कलावंताला लयीचा मार्ग दाखवत, त्याचे गाणे खुलवत नेण्यासाठी आवश्यक त्या सूचन करणे, हे संगतकाराचे मुख्य काम. त्यासाठी तालावर प्रभुत्व हवेच, परंतु संगीताचा आणि कलावंताच्या सादरीकरणाचाही अभ्यास हवा. कोणता कलाकार लयीच्या अंगाने कसा प्रवास करेल, याची अटकळ बांधत, त्याला प्रोत्साहित करण्याची कला नानांनी अवगत केली आहे. त्यामुळेच प्रत्येक गायक कलावंताला त्यांची संगत हवीशी वाटत आली आहे. अतिशय प्रसन्न चेहरा आणि तेवढीच प्रसन्न संगत यामुळे नाना जसे कलावंतांमध्ये लोकप्रिय झाले, तसेच रसिकांमध्येही.
गायक आणि साथीदार यांच्यात प्रत्यक्ष मैफलीतही एक संवाद सुरू असतो. नजरेने, खाणाखुणांनी ते जसे एकमेकांना समजावून घेत असतात, तसेच ते प्रत्यक्ष गायन-वादनातूनही एकमेकांना काही सांगत असतात. तबला वादकाने गायक कलाकाराला त्याच्या सर्जनात साथ द्यायची असते. कधी सांभाळून घ्यायचे असते, तर कधी पुढे जाण्याचा मार्ग सुचवायचा असतो. हे सारे कोणाच्याही नकळत घडवून आणायचे असते. असे घडते, तेव्हा मैफलीतील संगीताचा आनंद अधिक समृद्ध होतो. नाना मुळे हे कलावंतांना का आवडतात, याचे हे उत्तर. त्यांना मिळालेला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार संगतकारांचाही उत्साह वाढवणारा ठरेल.