मानवेंद्रनाथ रॉय व त्यांचे समविचारी मित्र यांनी १९४० मध्ये भारतात ‘रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टी’ स्थापन केली होती. तिचा उद्देशच मुळी लोकशाही विचार रुजविणे हा होता. साम्यवाद आणि पारंपरिक राष्ट्रवादाच्या पलीकडे जाऊन व्यक्तिस्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक न्यायाचे बीजारोपण करण्याच्या उद्देशाने स्थापण्यात आलेला हा पक्ष पुढे १९४८ ला विसर्जित झाला तरी त्यांनी आपली ही बुद्धिप्रामाण्यवादी वैचारिक चळवळ प्रबोधन व परिवर्तनाच्या उद्देशाने चालू ठेवली. सेंटर फॉर दि स्टडी ऑफ सोशल चेंज, वांद्रे, मुंबई; लोकशाही अभ्यास मंडळ, पुणे; इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम, मुंबईसारख्या संस्था अनुक्रमे प्रा. गोवर्धन पारीख, प्रा. अ. भि. शहा, प्रा. प्रभाकर पाध्ये प्रभृती मान्यवर हे कार्य करीत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या विचारधारेचे सक्रिय कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणून या संस्थांशी संलग्न राहून निरंतर सक्रिय होते.

लोकशाही अभ्यास मंडळ, पुणेमार्फत २४ ते २७ एप्रिल, १९६५ रोजी पुण्यातील शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये लोकशाहीच्या विविध समस्यांवर विचारमंथन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र प्रादेशिक अभ्यास शिबीर भरवले गेले. त्यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे ‘लोकशाही व समाजवाद’ या विषयावर भाषण झाले. ते या मंडळामार्फत प्रकाशित ‘काही समस्या : लोकशाही दृष्टिकोन’ शीर्षक पुस्तिकेत संग्रहित आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की, अठराव्या शतकात औद्याोगिक क्रांती झाल्यानंतर लोकशाहीचा उदय झाला. या लोकशाहीस पुढे समाजवादी अधिष्ठान लाभले. स्वातंत्र्य, समता, बंधुता मूल्ये लाभली. या काळात पूर्व युरोपात रशिया, पोलंड, हंगेरी, चेकोस्लोव्हाकिया आदी देशांत साम्यवादी, समाजवादी, राज्यसत्ता विशेषत: विसाव्या शतकात पहिल्या व दुसऱ्या महायुद्धानंतर मजबूत झाल्या. लोकशाहीची भांडवलवादी व समाजवादी रूपे विविध देशांत विकसित झाली.

प्रारंभीच्या काळात जी भांडवलवादी लोकशाही होती, तिचे तीन दोष समाजवादी विचारक व सत्ताधीश मांडत- एक म्हणजे, या राज्यपद्धतीत श्रीमंत अधिक श्रीमंत होत राहतात, तर दुसरीकडे गरीब अधिक गरीब होतात. दुसरा दोष म्हणजे, भांडवली व्यापारात तेजी-मंदीचे दुष्टचक्र कायम राहते. तिसरा दोष म्हणजे, कामगारवर्गाची गरिबी निरंतर वाढत रुंदावत जाते. मार्क्स व अन्य टीकाकारांनी सांगितलेले हे दोष लोकशाहीच्या विकासकाळात कमी होत गेले व सामान्यांचे जीवन अधिक सुखपूर्ण झाले. उलटपक्षी साम्यवादी राजवटीत संघटना स्वातंत्र्य, प्रचार स्वातंत्र्य, सभा स्वातंत्र्य लोप पावले. कायद्याचे राज्य येण्याऐवजी पक्षाचे व पक्षप्रमुखांचे स्वैर आणि जुलमी राज्य प्रस्थापित झाले. भांडवली लोकशाहीतून जी संसदीय लोकशाही विकसित झाली, तिने समता, बंधुता व व्यक्तिविकास मूल्ये जोपासली. पश्चिम युरोपात संमिश्र अर्थव्यवस्था आली. भविष्यकाळात यातून शांततामय सहजीवन अस्तित्वात येईल असे वाटते.

संसदीय लोकशाही व्यवस्थेतील समाजजीवन हे साम्यवादी राजवटीच्या तुलनेत दारिद्र्य, अज्ञान, बेकारीविरुद्धचा लढा यशस्वीपणे करू शकले असे दिसते. त्या ठिकाणी मुक्त निवड (निवडणूक) अस्तित्वात आली. विरोधी पक्ष राहिले. असे चित्र साम्यवादी देशांत नाही. कल्याणकारी राज्याची शाश्वती नाही.

या व्याख्यानातून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समाजवाद, साम्यवाद इत्यादी नावांवर अस्तित्वात आलेली राज्य व राज्यसत्ता यांची तुलना संसदीय लोकशाही राज्यांशी करतात आणि ही राज्ये कल्याणकारी कार्य करीत असल्याचे दाखवून देतात. रशियातील स्टॅलिनची राजवट व जगातील लोकशाही राष्ट्रातील राजवट आपल्यापुढे ठेवत (१९६५ मध्येच) सांगतात की, भविष्यकाळात साम्यवादी राष्ट्रातील जनता व्यक्तिस्वातंत्र्यमूलक संसदीय लोकशाहीची मागणी केल्याशिवाय राहणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकशाही व समाजवादातील अन्वय अधोरेखित करताना तर्कतीर्थांनी या भाषणात स्पष्ट केले आहे की, व्यक्तिस्वातंत्र्याचे तीन मुख्य घटक असतात. संघटनास्वातंत्र्य, प्रचारस्वातंत्र्य आणि सभास्वातंत्र्य (अभिव्यक्ती-स्वातंत्र्य). ज्या देशात साम्यवादी सत्ता आल्या, तिथे यांवर टाच आली. जुलमी व हुकूमशाही वृत्तीतून मानवी स्वातंत्र्याचा संकोच झाल्याचे दिसून आले आहे. समता, बंधुता आणि व्यक्तिमत्त्वाचा मुक्त विकास ही मूल्ये समाजवाद आणि लोकशाही या दोन्हींत ही ध्येयवादाची कसोटी ठरवणारी मूल्ये आहेत, संसदीय लोकशाहीच्या मार्गानेच या मूल्यांची जोपासना होऊ शकते.
drsklawate@gmail.com