scorecardresearch

चेतासंस्थेची शल्यकथा : तंत्रज्ञानाच्या मर्यादा

विशिष्ट प्रकारे दोन मणक्यांमधली डिस्क घसरलेल्या रुग्णांमध्ये एन्डोस्कोपीनं शस्त्रक्रिया करता येते.

चेतासंस्थेची शल्यकथा : तंत्रज्ञानाच्या मर्यादा
मणक्याच्या शस्त्रक्रियेचा एन्डोस्कोप

डॉ. जयदेव पंचवाघ

विशिष्ट तंत्रज्ञानाच्या कक्षेत एखाद्या आजाराला बळजबरीनं बसवलं तर अपयश पदरी येतं. आजाराच्या कक्षेत बसणारं तंत्रज्ञानच अशा वेळी वापरणं गरजेचं!

साधारण महिन्यापूर्वीची गोष्ट असेल.. एका रुग्णाच्या कंबरेच्या मणक्याच्या खालच्या भागात, अगदी आतल्या बाजूला, एक गाठ असल्याचं निदान झालं होतं. त्याच्या ‘एमआरआय’कडे बघताना ही गाठ कॅन्सरची नसून साध्याच प्रकारची आहे हे स्पष्टपणे दिसत होतं. कमरेच्या मणक्याच्या आतल्या पोकळीत स्थित असलेल्या नसांच्या पुंजक्यावर ही गाठ दाब आणत होती. या गाठीचा एक भाग उजव्या बाजूने, मणक्यातून निघून पायाकडे जाणाऱ्या नसेबरोबर बाहेर पसरलेला होता. त्यामुळे गाठीचा मणक्याच्या पोकळीतला आतला भाग आणि मणक्याबाहेर पसरलेला दुसरा भाग अशी रचना दिसत होती. या दोन फुगीर भागांना जोडणारा एक निमुळता दुवा होता. व्यायाम करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डंबेलसारखा या गाठीचा आकार होता. या भागात अशा प्रकारच्या गाठी होणं हे बऱ्यापैकी कॉमन आहे. या विशिष्ट आकारामुळेच अशा गाठींना ‘डंबेल टय़ुमर’ म्हणतात.

या गाठीमुळे या रुग्णाला कंबरेपासून सुरू होऊन कंबर, मांडी आणि पोटरीत कळ येत होती. सर्वसाधारणपणे हे लक्षण ‘साएटिका’ म्हणून ओळखलं जातं. या गाठी काळजीपूर्वक केलेल्या मायक्रोस्कोपिक न्यूरोसर्जरीने पूर्णपणे काढून टाकण्यासारख्या असतात. वेळेवर व योग्य पद्धतीने शस्त्रक्रिया केल्यास त्या पूर्णपणे बऱ्या होतात. ‘निदान’ व्हायला उशीर झाला किंवा शस्त्रक्रिया टाळायचा प्रयत्न झाला तर नसांना इजा होऊन कायमस्वरूपी व्यंग राहू शकतं.

हे सर्व त्या रुग्णाशी अत्यंत तपशीलवार बोलल्यानंतर त्यांनी मला, ‘‘म्हणजे ही शस्त्रक्रिया एन्डोस्कोपीने होणार ना?’’ असा प्रश्न विचारलाच! ‘‘आम्ही एन्डोस्कोपमधूनच ही गाठ काढून घेऊ इच्छितो. (विच्छा माझी पुरी करा(च)!)’’

गूगलच्या युगात एन्डोस्कोपी, लेझर अशा शब्दांची लोकांमध्ये इतकी आवड निर्माण झालेली दिसते की, उपचार हे व्यक्ती बरी होण्यासाठी करायचे की विविध तंत्रज्ञानं वापरून त्यांना चालना देण्यासाठी करायचे असतात, असा प्रश्न मला हल्ली नेहमी पडतो. मणक्याच्या अशा गाठींसाठी एन्डोस्कोपी वापरली जात नाही किंवा वापरता येत नाही. जगात कुठेही अशा गाठी एन्डोस्कोपीमधून काढल्या जात नाहीत.

मात्र अशीच लक्षणं असलेल्या आणि विशिष्ट प्रकारे दोन मणक्यांमधली डिस्क घसरलेल्या रुग्णांमध्ये एन्डोस्कोपीनं शस्त्रक्रिया करता येते. लक्षणं जरी सारखी असली तरी, आजाराच्या प्रकाराप्रमाणे उपचार करायला हवेत ना! कुठलंही सिद्ध झालेलं तंत्रज्ञान वाईट नसतं. पण ते योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीनं आणि योग्य हातांनी वापरलं गेलं नाही तर उपयोगी ठरणं सोडून त्रासदायक होऊ शकतं. आपण व्यवस्थित बरं व्हावं याचा आग्रह न धरता, वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा आग्रह धरण्यात शहाणपणा नाही हा ‘कॉमन सेन्स’ आहे असं मला वाटायचं, पण.. असो!

हे निमित्त साधून कंबरेच्या मणक्याच्या एन्डोस्कोपीबद्दल लिहावं असं मला वाटलं. म्हणजे हे तंत्रज्ञान नेमकं कुठे वापरलं जातं हे अगदी थोडक्या स्वरूपात तरी सांगता येईल.

ज्या आजारासाठी याचा उपयोग होतो तो म्हणजे कंबरेच्या मणक्यात स्पाँडिलोसिसमुळे किंवा डिस्क घसरल्यानं दाबली गेलेली नस. कंबरेच्या मणक्यात एक किंवा अधिक नसा दाबल्या गेल्यानं होणारी लक्षणं आपण पूर्वीच्या काही लेखांमध्ये बघितली होती, ती थोडक्यात आठवू. कंबर दुखणं, साएटिका (कंबर मांडीचा मागचा भाग आणि पोटरीपर्यंत पसरणारी कळ), मांडी व पायात दुखण्याबरोबरच मुंग्या येणं- बधिरपणा वाटणं, थोडं अंतर चालल्यावर मांडय़ा व पोटऱ्या भरून येणं, जड पडणं आणि थोडं अंतर चालल्यावर दुखण्यामुळे -भरून येण्यामुळे व जड पडल्यामुळे चालणं थांबवावं लागणं. हळूहळू पोटऱ्या आणि घोटय़ात कमजोरी येणं वगैरे.

अशी लक्षणं असणाऱ्या बहुतांश रुग्णांमध्ये मणक्यातून पायाकडे जाणाऱ्या एक किंवा अधिक नसा दबलेल्या असतात. दोन मणक्यांच्या मधली डिस्क घसरलेली असते. अशापैकी काही रुग्णांमध्ये बिन टाक्याची मणक्याची शस्त्रक्रिया करून दाब काढून घेणं आणि रुग्णाला वेदना मुक्त करणं शक्य असतं. ही शस्त्रक्रिया नेमकी कशी केली जाते, हा प्रश्न अनेक लोकांचा असतो. त्याचं थोडक्यात वर्णन मुद्दाम इथं दिलं आहे.

पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही शस्त्रक्रिया पूर्ण भूल न देता केली जाते, म्हणजे ज्या भागातून शस्त्रक्रिया होते तेवढाच भाग बधिर केला तरी पुरतो. पण एखाद्या व्यक्तीला पूर्ण भूल घेऊनच शस्त्रक्रिया व्हावी असं वाटत असेल तर तसंही करता येतं. ऑपरेशन टेबलवर पालथं पडलेल्या अवस्थेत आणि एक्स-रे मशीनच्या मार्गदर्शनाखाली एक बारीक आकाराची सुई वापरून शस्त्रक्रिया करण्याचा मार्ग बधिर केला जातो. त्यानंतर दुसऱ्या एका बारीक सुईचं टोक ज्या ठिकाणी डिस्क घसरलेली असते तिथपर्यंत अचूकपणे सरकवलं जातं. एक्स-रे वर (या फिरत्या एक्स-रे ला सी-आर्म असं म्हणतात) हे टोक अचूक ठिकाणी असल्याचं निश्चित झालं की त्या मार्गावरून एक फाऊंटन पेनच्या जाडीची नळी आत सरकवण्यात येते. या नळीतून एन्डोस्कोप, ज्या ठिकाणी घसरलेली डिस्क नसेमध्ये घुसलेली असते, त्या जागेपर्यंत आत ढकलण्यात येतो. या एन्डोस्कोपमधून दिसणारं चित्र कॅमेरामधून स्क्रीनवर प्रक्षेपित केलं जातं. या चलचित्राकडे बघत नसेवर दाब आणणारा डिस्कचा तुकडा अलगदपणे काढला जातो. शस्त्रक्रिया संपल्यावर त्वचेवरच्या त्या अगदी छोटय़ा-छेदाला चिकटपट्टीनं बंद केलं जातं आणि अगदीच वाटल्यास एक विरघळणारा टाका घेण्यात येतो. या शस्त्रक्रियेला ‘पीईएलडी’ (पोस्टेरो लॅटरल एन्डोस्कोपिक लंबर डिस्केक्टॉमी) म्हणतात. या शस्त्रक्रियेनंतर अर्ध्या ते एका तासात रुग्ण चालत घरी जाऊ शकतो. मात्र पूर्ण भूल दिली असेल तर आठ ते दहा तासांनी रुग्ण घरी जातो.

मागच्या शतकाच्या अखेरीस, साधारण १९७० ते २००० सालांदरम्यान मूत्रमार्गावरच्या आणि पोटाच्या आतल्या शस्त्रक्रिया एन्डोस्कोपमधून करण्याचं शास्त्र हळूहळू विकसित होत गेलं. ‘शरीराच्या आत, जिथली शस्त्रक्रिया करायची तिथपर्यंत अगदी बारीक नळीतून जाऊन सर्जन उभा राहिला’ (म्हणजे पुराणकथांसारखं सूक्ष्मरूप धारण करून) आणि ‘शस्त्रक्रिया करून बाहेर आला’ तर कसं होईल.. असा कल्पनाविलास असलेले काही सिनेमे मागच्या शतकात आले होते. ती कल्पना प्रत्यक्षात उतरवणारं उपकरण म्हणजे एन्डोस्कोप. एका पेनाच्या आकाराच्या बारीक पोकळ नळीत अनेक िभगं बसवून आणि या नळीचं टोक अगदी लहान छेदातून शरीराच्या आत ढकलून खोलवरची रचना स्पष्टपणे दाखवण्याची क्षमता एन्डोस्कोपमध्ये असते. या नळीच्या शरीराच्या बाहेर येणाऱ्या भागाला एक उच्च दर्जाचा कॅमेरा जोडला की आतलं दृश्य टीव्हीसारख्या स्क्रीनवर दिसतं. या तंत्रज्ञानामध्येसुद्धा आता त्रिमितीय म्हणजेच थ्री-डी तंत्रज्ञान वापरलं जाऊ लागलं आहे आणि त्यामुळे सर्जनचे डोळेच जणू शस्त्रक्रिया करण्याच्या भागापर्यंत आत गेल्याप्रमाणे, किंबहुना त्यापेक्षाही सुस्पष्ट- दृश्य शस्त्रक्रिया करण्यासाठी दिसू लागलं आहे.

अशाच प्रकारचं दृश्य मायक्रोस्कोपमधूनसुद्धा दिसू शकतं, फक्त त्यामध्ये नळी आत घातली जात नाही; तर शरीरावर छोटा छेद घेऊन मायक्रोस्कोप आत डोकावून बघू शकतो. एन्डोस्कोप किंवा मायक्रोस्कोप या दोन्ही तंत्रज्ञानांना सर्वसाधारणपणे ‘दुर्बीण’ असं म्हटलं जातं.

असं असलं तरी इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती म्हणजे कुठल्या आजाराला एन्डोस्कोप वापरायचा कुठल्या आजाराला मायक्रोस्कोप किंवा इतर तंत्रज्ञान वापरायचं हे आजाराच्या प्रकारावर ठरतं. विशिष्ट तंत्रज्ञानाच्या कक्षेत एखाद्या आजाराला बळजबरीनं बसवलं तर अपयश पदरी येतं. याउलट आजाराच्या कक्षेत बसणारं तंत्रज्ञानच अशा वेळी वापरणं गरजेचं असतं. आग्रह आणि प्रयत्न हा आजार परिणामकारकपणे बरा करण्याचा असावा. अमुक एक तंत्रज्ञान वापरण्याचा तो नसावा हे आजच्या गूगलच्या काळात रुग्णांनी नीट समजून घेणं गरजेचं आहे. नाहीतर ‘विच्छा माझी पुरी करा’मधील विच्छा पूर्ण करणारी एखादी व्यक्ती भेटेलही आणि पंचाईत होईल.

त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाची माहिती देताना त्याच्या मर्यादा रुग्णांपर्यंत व्यवस्थित पोहोचवणं हे डॉक्टरांचंसुद्धा कर्तव्य आहे. शस्त्रक्रियेत वापरण्यात येणारी विविध तंत्रज्ञानं म्हणजे भात्यातले बाण आहेत. आजार किंवा रोग नामक शत्रूला मारण्यासाठीच्या युद्धात विशिष्ट शत्रूसाठी नेमका बाणच निवडावा लागतो. साध्या सैनिकाला मारायला पशुपतास्त्र किंवा महान योद्धाला मारायला साधा बाण वापरला तर सत्यानाश ठरलेला आहे. झपाटय़ानं प्रगत होत जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे -आपण तंत्रज्ञानासाठी नाही- याचं भान आणि तारतम्य ठेवणं गरजेचं असतं हे निश्चित.

(लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत.

brainandspinesurgery60@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या