मुंबईतील दादरच्या ‘अमर हिंद मंडळा’ने स्थापना काळापासूनच (१९४७) ‘वसंत’ व्याख्यानमाला सुरू केली. तिसऱ्या वर्षीच्या व्याख्यानमालेत २८ एप्रिल, १९४९ रोजी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे ‘धर्मातीत राज्य’ विषयावर व्याख्यान संपन्न झाले. ते या मंडळाने प्रकाशित केलेल्या ‘वादगंगा’ भाषण संग्रहात अंतर्भूत आहे.

तर्कतीर्थांनी आपल्या या भाषणात ‘धर्मातीत’ शब्दाच्या निधर्मी, विधर्मी, अधर्मी, ऐहिकसारख्या पर्यायवाची शब्दांचा ऊहापोह केला आहे, परंतु ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द वापरलेला नाही. कारण, हे भाषण राज्यघटना तयार होत असलेल्या काळातील आहे. या काळात निधर्मी राज्य आणि धार्मिक राज्य, अशी चर्चा प्रचलित होती. या भाषणात तर्कतीर्थांनी या दोन्ही स्वरूपांची सविस्तर चर्चा केली आहे. निधर्मी राज्याबद्दल त्यांनी म्हटले आहे की, स्वातंत्र्य मिळालेल्या या राज्याचे (राष्ट्र) अधिष्ठान परंपरागत धर्म असावे की पुरोगामी जनसमाज तंत्र असावे, हा आपणासमोरचा खरा प्रश्न आहे. परंपरागत धर्माप्रमाणे ते चालावे असे ठरले, तर ते धार्मिक राज्य होईल. एका विशिष्ट धर्माचे ते राज्य होईल. ते पुरोहितांच्या तंत्राने चालवावे लागेल. पुरोगामी जनसमाज तंत्राने निधर्मी राज्य चालविण्यात या राज्याचे कल्याण आहे, असे माझे मत आहे. निधर्मी राज्य उभारण्याचाच काळ आता आला आहे. निधर्मी राज्य ही भूमिका अधिक शास्त्रशुद्ध आहे. त्यासाठी सर्व धर्मीयांना हे राज्य ‘आपले’ आहे, असे वाटण्यासाठी राज्यसंस्था ही सर्व धर्मांपासून अलिप्त अशी असणे अधिक हितावह आहे. देशातील राज्य एका विशिष्ट धर्मावर आधारलेले असेल, तर विधर्मी लोक राज्यावरील संकटावेळी राज्याला मदत करणार नाहीत. तेव्हा नव्या राज्याबद्दलची आपली जबाबदारी नीट ओळखली पाहिजे आणि त्या राज्याला बळकटी आणण्याचे उपाय योजले पाहिजेत.

याच व्याख्यानात तर्कतीर्थांनी ‘धार्मिक राज्य’ संकल्पनेवर विस्तृत विचार व्यक्त केले आहेत. त्यासंदर्भात त्यांनी म्हटले आहे की, हिंदुस्थानात स्थापन झालेले हिंदी राज्य हिंदू राज्य आहे का? याचे उत्तर होकारार्थी देता येणार नाही. या राज्यात हिंदूंचे प्राधान्य आहे खरे; पण येथे मुसलमानांची संख्याही कमी नाही. या राज्याला हिंदू राज्य म्हटले, तर मुसलमान, ख्रिाश्चन, पारसी इत्यादी धर्मीयांना ते ‘आपले’ राज्य वाटणार नाही. आपल्या धर्माला धोका आहे असे त्यांना वाटू लागेल. हिंदी राज्य हिंदू राज्य नसून लोकराज्य आहे.

आपल्याकडे पूर्वी हिंदू राज्य होते खरे; पण हिंदू धर्माचे वैशिष्ट्य असे आहे की, त्यात एखाद्या विशिष्ट धर्माचा अभिनिवेश संचरत नाही व धर्माव्यतिरिक्त अन्य धर्मीयांचा छळ करावा, अशी प्रवृत्ती हिंदूंची कधीच नव्हती. इतरांना गुलाम करावे, अशी कल्पनाही आपल्याला सहन होत नाही, त्यामुळे इतर ठिकाणी धर्मराज्य स्थापन झाल्याने जसे परिणाम दिसतात, तसे आपल्याकडे दिसले नाहीत. प्राचीन काळी इजिप्त इ. देशांमध्ये धर्मराज्य आले. तेथे धर्म ‘लोकमान्य’ आणि ‘राजमान्य’ झाला. धर्मसंख्येला एकदा राज्य प्रतिष्ठा प्राप्त झाली म्हणजे मूळच्या धार्मिक व पवित्र आचार-विचारांना फाटा मिळत जातो. धर्मसंस्था राज्यसंस्थेशी तन्मय होण्याचा प्रयत्न करते. येथे धार्मिक स्वातंत्र्याचा लोप होण्याचा संभव वाढतो. धर्मसंस्था दंडधारी झाली की, तिचे आध्यात्मिक सामर्थ्यही लोप पावते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धर्मसत्ता व राज्यसत्ता यांचा संगम झाला, तर पुरोहितांच्या हाती राजदंड येतो. मग पुरोहितांच्या तंत्राने राज्यकारभार चालू लागतो. हे ख्रिास्ती, बौद्ध धर्मसत्ता काळात दिसून आले आहे. हिंदू राज्य या देशात स्थापन करायला येणारी आणखी एक अडचण म्हणजे या धर्माचा इतर धर्मांप्रमाणे विशिष्ट असा धर्मग्रंथ ठरलेला नाही. देवही ठरलेला नाही. नव्या राज्याविषयी आपले एक विशिष्ट कर्तव्य आहे. इथे जुन्या रूढी, समजुती, परंपरा, मूल्य यांची कसून तपासणी करण्याचे काम आहे. नाना मतांचा गलबला नाहीसा करावयाचा आहे. सर्व मूल्यांत मानव श्रेष्ठ आहे, हे ध्यानात घ्यावयाचे आहे. मागासलेल्यांना पुढे आणावयाचे आहे. यासाठी प्रतिमेच्या अगोदर प्रज्ञेची वाढ करण्यासाठी आपणास धडपडायचे आहे.
drsklawate@gmail.com