प्रफुल्ल शशिकांत
राज्यातील शिक्षण क्षेत्रातील प्रगतीच्या दृष्टीने मागील दोन महिने हे अतिशय मोलाचे ठरले. शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या पुढाकारातून आणि वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन (वोपा) यांच्या तांत्रिक भागीदारीतून निर्मिती केलेल्या ‘निपुण महाराष्ट्र एससीईआरटीएम’ या ॲपद्वारे तब्बल चौदा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर चाचणी पार पडली. राज्यात पहिल्यांदाच ‘चांदा ते बांदा’ अशा व्यापक पटलावर आणि एआयआधारित तंत्रज्ञानाचा वापर करून ही पार पडलेली ही चाचणी आता विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्यांत वृद्धी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. पुरावा आधारित पद्धतीने होत असलेली ही सर्व प्रक्रिया शिक्षण क्षेत्रातील नव्या बदलांची नांदीच ठरते आहे.
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शिक्षण आणि मनुष्यबळाचा विकास. हेच लक्षात घेता नवीन शैक्षणिक धोरणात विविध उद्दिष्टे अंतर्भूत करण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त होणे हे शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीतील मूळ सूत्र. त्याशिवाय या धोरणाची परिपूर्ण अंमलबजावणी अशक्य आहे. जागतिक बँकेच्या लर्निंग पाॅवरटी निर्देशांकानुसार भारतात १० वर्षे वयोगटातील ७० टक्के विद्यार्थी त्यांच्या वयोमानानुसार योग्य असलेला छोटा मजकूरही वाचू किंवा समजू शकत नाहीत. ‘असर’सारख्या अहवालांतूनही वेळोवेळी हे समोर आलेले आहे. अशा स्थितीत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्यांच्या वृद्धीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज वारंवार पुढे येत होती. त्यादृष्टीने पाच जुलै २०२१ रोजी निपुण भारत हे अभियान हाती घेण्यात आलेले आहे. राज्यातही शासनाने या अभियानाच्या अनुषंगाने विविध प्रयत्न केले गेले. शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र आणि एससीईआरटी यांच्या पुढाकारातून निपुण महाराष्ट्र अभियान हाती घेण्यात आले.
राज्याचा विस्तार पाहता आणि हे काम पारदर्शक, पुराव्याआधारित आणि परिणामकारक पद्धतीने होण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणे अपरिहार्य होते. त्यामुळेच मिशन जरेवाडी प्रकल्प, बीड, दिशा प्रकल्प, ठाणे आणि इतर पथदर्शी प्रकल्प यशस्वी करून दाखविणाऱ्या वाॅवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन अर्थात वोपा या संस्थेच्या तांत्रिक भागीदारीतून निपुण महाराष्ट्र एससीईआरटीएम या ॲपची निर्मिती करण्यात आली. राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रयोगाची राज्यस्तरावर अंमलबजावणी होण्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात चाचणी करण्यात आली. त्यातून दीड लाख मुलांची गुणवत्ता वाढ आणि अध्ययन स्तर मूल्यांकनाचे काम गतीने आणि यशस्वीरित्या झाले. या चाचणीचा सकारात्मक परिणाम दिसू लागल्याने पुढे राज्यभरासाठी त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकणे शक्य झाले.
‘निपुण महाराष्ट्र ॲप’चे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तर प्रगतीचे संपूर्ण मूल्यांकन एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि पुरावाआधारित पद्धतीने अचूकपणे केले जाते. विद्यार्थ्यास केंद्रबिंदू मानून पालक, शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षकीय अधिकारी या चारही घटकांचा विचार केल्यानंतर आणि विविध चाचण्या घेऊनच या ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे. शिक्षक, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकीय अधिकारी यांना तत्काळ (रिअल टाईम) माहितीचे विश्लेषण ॲपवर उपलब्ध होते. त्याचवेळी पालकांनाही आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष ठेवता येते. एआय आधारित वाचन सराव हे फीचर वापरकर्त्यासाठी रंजक आहे. याद्वारे वाचनाचा वेग, वाचनाची अचूकता, चुकीचे वाचलेले शब्द या बाबी तत्काळ समजतात. लेखन, संख्याज्ञान व संख्यांवरील क्रिया या विषयांसाठीही ॲपमध्ये छायाचित्र पुरावा (फोटो एव्हिडन्स) घेता येतो. ही सर्व माहिती प्रत्येक पालकाला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यांना आपल्या पाल्याची शैक्षणिक सद्य:स्थिती समजणार असून पुढील स्तरावर त्याची प्रगती व्हावी, म्हणून याच ॲपमध्ये सराव घेता येणार आहे.
या चाचणीची तयारी गेले चार महिने सुरू होती. त्यासाठी शिक्षण आयुक्तालय आणि एससीईआरटीच्या वतीने १७ ऑगस्ट २०२५ रोजी राज्यातील पाच हजार पर्यवेक्षकांसाठी विशेष कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत वोपाच्या वतीने तांत्रिक मार्गदर्शन करत ॲपचा वापर कशा पद्धतीने करायला हवा, याची माहिती देण्यात आली. त्यानुसार २० ऑगस्टपासून राज्यातील सर्वच भागातील दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची एआय आधारित अध्ययन स्तर निश्चितीची चाचणी सुरू करण्यात आली. पर्यवेक्षकांनी आपल्या भागातील शाळांना भेटी देत प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन स्तर निश्चिती करत मराठी वाचन, लेखन, संख्याज्ञान, संख्यावरील क्रिया या चार विषयांची चाचणी घेतली.
“विद्यार्थी दिलेले वाक्य वाचतो, उतारा वाचतो. त्याचे उच्चार, वाचनाची पद्धत निपुण महाराष्ट्र (एससीईआरटीएम) ॲपमध्ये नोंद करताच एआय तंत्रज्ञान वाचनाची गती, अचूकता याची माहिती देते. अध्ययन स्तर निश्चितीची ही नावीन्यपूर्ण पद्धत मुलांसाठी आनंददायी आहे. आपला आवाज रेकाॅर्ड होतोय, म्हणून मुले खुश असतात. एक-एक करत मी माझ्या भागातील ३७ शाळांतील पाचशेंहून अधिक मुलांची अशी नोंद पूर्ण केली. मुलांची वाचनाची नेमकी स्थिती, संख्याज्ञान, गणितीय क्रिया करण्याची क्षमता ॲपमुळे लगेच कळते. त्यामुळे आता व्यक्तीसापेक्ष पद्धतीने प्रत्येकाला नेमके कशा पद्धतीने शिकवले पाहिजे, हे ठरवणे सोपे झाले आहे. त्याचा निश्चितच फायदा होईल.” अशी प्रतिक्रिया वडवली (ता. मुरबाड, जि. ठाणे) येथील केंद्रप्रमुख काशिनाथ शेलवले यांनी व्यक्त केली.
शहरी भागांपासून ते अगदी गडचिरोली, गोंदिया, पालघर, चंद्रपूर यासारख्या जिल्ह्यातील अगदी दुर्गम भागातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर चाचणीची प्रक्रिया गतीने सुरू आहे. ज्या काही भागांत मोबाईल नेटवर्कची कमतरता आहे, अशा ठिकाणच्या पर्यवेक्षकांनी तर मोठ्या प्रयत्नांतून विद्यार्थ्यांना एकत्र आणत अध्ययन स्तर निश्चितीची प्रक्रिया पूर्ण केली. मागील महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यातील नारडुवे सडेवाडी येथील केंद्रप्रमुख दत्ताराम गोराड घेतलेली त्यांच्या विद्यार्थ्यांची अध्ययन चाचणी राज्यभरात गाजली. राज्यात अनेक भागांत नाना तऱ्हेच्या अडचणींवर मात करत ‘निपुण महाराष्ट्र’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी यंत्रणा झोकून देते आहे.
शिक्षण विभाग, एससीईआरटी, डायटचे मार्गदर्शक, वरिष्ठ अधिकारी आणि गावोगावी प्रत्यक्ष काम करणारी पर्यवेक्षकीय यंत्रणा यांच्या प्रयत्नांतून आतापर्यंत सोळा लाखांहून अधिक मुलांची अध्ययन स्तर निश्चिती पूर्ण झाली आहे. यातून मुलाला अक्षर ओळख, शब्द ओळख आहे का? त्याला वाचता येते का? वाचलेले उमजते का? आकडेमोड जमते का? अशा पायाभूत प्रश्नांची उत्तरे मिळत असून या चाचणीच्या निष्कर्षांआधारेच संबंधित मुलांसाठी अध्यापनाचे योग्य नियोजन करता येणार आहे. शिक्षणक्षेत्रात होणाऱ्या बदलांची नांदी ही महाराष्ट्राच्या भावी पिढ्यांना अधिक बळकट करणारी ठरेल, असे आशादायी चित्र या माध्यमातून दिसून येतेय.
लेखक ‘वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन, पुणे’ (वोपा) या संस्थेचे संचालक असून लेखात वर्णन केलेले ॲप याच संस्थेने विकसित केले आहे.
ईमेल : Contact@vopa.in
