scorecardresearch

शिवछत्रपती त्यांच्या हयातीतच ‘ग्लोबल’ झाले होते, हे आपण शालेय मुलांना कधी शिकवणार?

एकाच वेळी भूतकाळ आणि वर्तमानकाळावर अमिट ठसा उमटवणाऱ्या शिवचरित्राचे सम्यक आकलन त्यामुळेच महत्त्वाचे ठरते.

शिवछत्रपती त्यांच्या हयातीतच ‘ग्लोबल’ झाले होते, हे आपण शालेय मुलांना कधी शिकवणार?


निखिल बेल्लारीकर

शिवछत्रपतींनी दोन वेळा सूरत लुटली ही बातमी तेव्हाच्या इंग्लंडमधील ‘लंडन गॅझेट’ (फेब्रुवारी १६७२), नेदरलँड्समधील ‘हार्लेम्स कोरांट’ (डिसेंबर १६७०, ऑगस्ट १६७१), इ. वृत्तपत्रांतही छापून आली होती!  

शिवचरित्र हा महाराष्ट्राच्या चिरंतन अभिमानाचा, आत्मीयतेचा आणि अस्मितेचा विषय आहे. विद्यापीठांतील प्राध्यापकांपासून ते राजकारण्यांपर्यंत, धनाढ्य उद्योगपतींपासून ते मजुरांपर्यंत सर्वच सामाजिक स्तरांवरील व्यक्तींना एकत्र आणणारी अन्य विभूती आज तरी महाराष्ट्राकडे नाही. त्यामुळे शिवचरित्रातली घटिते जरी भूतकाळात जमा झाली असली तरी त्यांच्या अनेकपदरी आकलनामुळे समाजाची आजही होणारी घुसळण लक्षात घेता शिवचरित्र हा आजही निव्वळ इतिहास नव्हे तर वर्तमानही आहे. एकाच वेळी भूतकाळ आणि वर्तमानकाळावर अमिट ठसा उमटवणाऱ्या शिवचरित्राचे सम्यक आकलन त्यामुळेच महत्त्वाचे ठरते.

हेही वाचा >>>उरुस आणि सुफी सर्किटच्या अभ्यासाचा आनंद

या लेखाचा उद्देश कोणत्याही एका राजकीय किंवा विश्लेषक विचारसरणीद्वारे इतिहासाचे विवेचन करण्याचा नसून, शिवचरित्रातील काही तुलनेने दुर्लक्षित परंतु अतिमहत्त्वाच्या पैलूंची व्यापक स्तरावर दखल घेतली जाणे आवश्यक असल्याचे ठसविणे हा आहे. महाराष्ट्रात शिवचरित्र तळागाळापर्यंत झिरपले ते समाजमाध्यम नामक प्रकार अस्तित्वात येण्यापूर्वीच. आणि यात अनेक लेखक, कवी, इतिहासकार वगैरेंबरोबरच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या क्रमिक पुस्तकांचाही मोठा वाटा होता आणि अजूनही आहे. सर्वसामान्य मराठी माणसाला शालेय अभ्यासक्रमात शिवचरित्राची पहिली ओळख होते ती इयत्ता चौथीत. ‘शिवछत्रपती’ असे नाव असलेल्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ म्हणजे राजा रविवर्मा यांनी काढलेले एक दिमाखदार चित्र आहे. तेही मोठे बोलके आहे. रुबाबदार छत्रपती शिवाजी महाराज त्यात लढवय्या पोषाख करून, एका उमद्या घोड्यावर बसून तलवार घेऊन निघाले आहेत आणि त्यांचे तीन विश्वासू साथीदार मागून दौड करताहेत. मागे एक डोंगरी किल्ला आहे, असे हे चित्र पाहताक्षणीच विद्यार्थ्यांच्या मनावर प्रभाव पाडते. आणि पुस्तकाची लेखनशैलीही साधीसोपी आणि रंजक असल्यामुळे त्यात साहजिकच रस उत्पन्न होतो. विद्यार्थ्यांना शिवचरित्राची प्रथम ओळख होते ती अशी.

गेली किमान चार-पाच दशके तरी महाराष्ट्रात हेच पाठ्यपुस्तक किरकोळ बदलांनिशी कायम असल्यामुळे या पुस्तकाने अनेक पिढ्या घडवल्या, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. आजही विविध वयोगटांमधील कैकजणांना विचारल्यास अनेकांना हेच पुस्तक त्यातल्या त्यात लक्षात असते, असा अनुभव अनेकदा येतो. त्यामुळे इयत्ता चौथीच्या पुस्तकाला वगळून पुढे जाताच येणार नाही. आज एकविसाव्या शतकात अनेक संदर्भ बदलले- इंटरनेट, समाजमाध्यमे, इ. मुळे समाजाची आमूलाग्र घुसळण झाली. घरबसल्या अखिल जगाच्या बातम्या समजू लागल्या. जगण्याची पूर्ण संदर्भचौकटच बदलून गेली. जग एकाच वेळी ग्लोबल आणि तितकेच लोकलही झाले. अशा परिस्थितीत पुढील पिढीसमोर शिवचरित्राचे कोणते पैलू आणले पाहिजेत? यावर विचार होणे गरजेचे आहे. मध्ययुगातील एक पराक्रमी राजा इतकीच त्यांची ओळख मर्यादित न राहता, त्यांच्या आयुष्यातील व धोरणांमधील काही कालातीत व उल्लेखनीय गोष्टींना जर पाठ्यपुस्तकांत स्थान मिळाले, तर इतिहासाला नवीन मूल्यांची जोड मिळून येणारी पिढी अधिक आत्मीयतेने शिवचरित्राकडे पाहील, याबद्दल मला शंका नाही. इथे हेही नमूद करणे आवश्यक आहे, की नवीन गोष्टी समाविष्ट करताना इतर कोणताही भाग गाळणे अभिप्रेत नसून उर्वरित सर्व काही आहे तसेच ठेवणे अभिप्रेत आहे.

हेही वाचा >>> करता येण्यासारखे बरेच काही..

खरेतर याकरिता अनेक ठळक आणि बारीकसारीक गोष्टी सुचविता येतील, परंतु तूर्तास महत्त्वाच्या तीन गोष्टींकडे पाहू. शिवछत्रपतींनी इ.स. १६६४ आणि १६७० दरम्यान दोनदा सुरत लुटली. औरंगजेबासारख्या अफाट शक्तिशाली बादशहाच्या सामर्थ्यावर उघडपणे घातलेला हा घाव काही सामान्य नव्हे. ही घटना तत्कालीन लोकांनाही इतकी महत्त्वाची वाटली की याची बातमी तेव्हाच्या इंग्लंडमधील ‘लंडन गॅझेट’ (फेब्रुवारी १६७२), नेदरलँड्समधील ‘हार्लेम्स कोरांट’ (डिसेंबर १६७०, ऑगस्ट १६७१), इ. वृत्तपत्रांतही छापून आली! व्यापारासाठी आलेल्या युरोपीय कंपन्यांसाठी ही बातमी इतकी महत्त्वाची होती की त्यांनी ती अनेक देशांत अनेक वेळा छापली. हजारो किलोमीटर दूरवरील युरोपातील वृत्तपत्रांत अशा बातम्या येणे, हे शिवछत्रपतींच्या सामरिक क्षमतेवर अतिशय महत्त्वाचे भाष्य करते. जर पाठ्यपुस्तकात याचा ओझरता उल्लेख आला तर विद्यार्थ्यांना लहान वयातच शिवचरित्राच्या ग्लोबल प्रसिद्धीची कल्पना येईल.

दुसरी गोष्ट आहे ती व्यापारविषयक. कोणतेही राज्य चालवायचे, तर आर्थिक बाजू भक्कम असणे अतिशय आवश्यक असते. त्यामुळे राज्याचा आर्थिक पाया बळकट करणे हे कोणत्याही देशातील व काळातील राजाचे परमकर्तव्य असते. शिवाजी महाराजांनी हे पुरेपूर ओळखले होते. मुघल किंवा आदिलशाही साम्राज्यांच्या तुलनेत स्वराज्याची व्याप्ती एकतर लहान होती, शिवाय तेथून मिळणारा शेतकी महसूलही विशेष नव्हता. हे जाणून त्यांनी व्यापारावर भर दिला. पैकी इयत्ता चौथीच्या पुस्तकात राज्यांतर्गत सागरी व्यापाराचा उल्लेख येतो, मात्र परदेशी व्यापाराचा उल्लेख येत नाही. शिवछत्रपतींची व त्यांच्या अधिकाऱ्यांची व्यापारी जहाजे पश्चिमेला येमेनपर्यंत जात, तर दक्षिण दिग्विजयानंतर पूर्वेला इंडोनेशियापर्यंतही जात. पैकी येमेनचा उल्लेख बटेव्हिया डागरजिस्टर या समकालीन डच ऐतिहासिक साधनाच्या इ.स. १६६४ मधील खंडात पृष्ठ क्र. ३२२ इथे १३ ऑगस्ट १६६४ रोजीच्या, तर इंडोनेशियाचा उल्लेख डागरजिस्टरच्या इ.स. १६८० मधील खंडात पृष्ठ क्र. ७५३-५४ वर १५ नोव्हेंबर १६८० रोजीच्या नोंदीत येतो. जसे इंग्रज, पोर्तुगीज, डच वगैरे युरोपीय भारतात येत होते तसे मराठेही शिवकाळापासूनच व्यापाराच्या निमित्ताने भारताबाहेर हजारो किलोमीटर दूर जात होते, हे लहान वयातच मनावर ठसले तर त्यामुळे फायदाच आहे. ओमानच्या अरबांशीही त्यांचे सलोख्याचे संबंध होते. अरबांशी संधान बांधून शिवछत्रपतींनी पोर्तुगीजांनाही शह दिला. हा राजकीय पैलूही महत्त्वाचा आहे.

गुलामगिरीला विरोध!

आणि तिसरी गोष्ट आहे ती प्रजाहितदक्षतेची. शिवाजी महाराजांकडे सामरिक आणि आर्थिक दूरदृष्टी होती हे निर्विवाद. परंतु तत्कालीन इतिहासाची एक काळी बाजू म्हणजे गुलामगिरी होय. राज्यकर्ते कोणीही असोत- गुलामगिरी हा शिवकालीन जीवनाचा एक अविभाज्य भाग होता. कैक तत्कालीन भारतीय राज्यकर्ते पैसे घेऊन लोकांना जनावरांसारखे विकून टाकत. विक्रीनंतर हे गुलाम कधी भारतात किंवा इराण, अरेबिया, मध्य आशिया किंवा इंडोनेशिया, इत्यादी ठिकाणी त्यांच्या नवीन मालकांच्या मर्जीनुसार जात. तिथे त्यांच्यावर अनेक प्रकारचे जुलूम होत. याला त्या वेळी फक्त एकाच राज्यकर्त्याने विरोध केला – तो राज्यकर्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! दक्षिणदिग्विजय मोहिमेत कुतुबशहासोबतच्या भेटीनंतर त्यांना इंग्रज, फ्रेंच व डच कंपन्यांचे प्रतिनिधी भेटण्यास आले. पैकी डच प्रतिनिधींना भेटल्यावर महाराजांनी त्यांचे यापूर्वीचे सर्व विशेषाधिकार मान्य केले, मात्र गुलामखरेदी आणि विक्रीचा हक्क मात्र काढून घेतला. या वेळी डच कंपनीला दिलेल्या कौलात महाराज म्हणतात- ‘यापूर्वीच्या मुस्लीम राजवटीत तुम्हाला गुलामांच्या खरेदीचा अधिकार होता, मात्र या देशावर माझे स्वामित्व असेतोवर तुम्हाला इथून गुलाम खरेदी करता येणार नाहीत, तसेच त्यांना परदेशीही पाठवता येणार नाही. तुम्ही असे केल्यास माझे लोक त्याला सर्वतोपरी विरोध करतील.’

हा कौल डच ईस्ट इंडिया कंपनीच्या पुराभिलेखागारातील खंड क्र. १३३९ मध्ये पृष्ठ क्र. १०१० पासून सुरू होतो.

स्वातंत्र्य, समता, बंधुता या आधुनिक मूल्यांच्या त्रिसूत्रीपैकी स्वातंत्र्याचा असा उद्घोष तोही मध्ययुगात आढळणे अतिशय विरळा. आजही काही देशांत गुलामगिरीचे अस्तित्व आहे ते पाहता महाराजांच्या या कालातीत धोरणाचे महत्त्व अजूनच अधिक पटते. पाठ्यपुस्तकात याचा समावेश करणे का महत्त्वाचे आहे यावर याहून अधिक भाष्य करण्याची गरज पडू नये.

हेही वाचा >>> हजारो ख्वाहिशे ऐसी..

या तीन गोष्टींखेरीज अन्यही काही बारीकसारीक गोष्टी आहेत. परंतु जर या तीनही गोष्टींचा समावेश पाठ्यपुस्तकात झाला तर ती एक उत्तम नांदी ठरेल. शिवचरित्र आणि पर्यायाने मराठेशाहीचा इतिहास म्हणजे फक्त महाराष्ट्रातील एक मध्ययुगीन राजकीय स्थित्यंतर नसून, भारतच नव्हे तर जगाच्या इतिहासातही त्याचे एक वेगळे स्थान आहे हे या निमित्ताने लक्षात येण्यास मदत होईल. वरील विवेचन जरी इयत्ता चौथीच्या पुस्तकासंदर्भात असले तरी अन्य इयत्तांमध्येही जिथे जिथे मराठेशाहीचा इतिहास येतो तिथे तिथे कैक सुधारणा करण्यास वाव आहे.

यावर कदाचित काहीजण असाही मुद्दा मांडू शकतील, की इतिहासातील सर्वच बारकावे मांडत बसलो तर ते पाठ्यपुस्तक न राहता शेकडो पानी ग्रंथ होईल. परंतु यात आजिबात तथ्य नाही. विद्यार्थ्यांवर अतिरिक्त अभ्यासाचा बोजा आजिबात न लादताही हे सर्व बदल करता येणे सहज शक्य आहे. उदाहरणार्थ, वरील बदल इयत्ता चौथीच्या पुस्तकात समाविष्ट करायचे तर फारतर दोन ते तीन पाने वाढतील, कदाचित त्याहूनही कमी. ऐंशी पानांच्या पुस्तकात निव्वळ दोनेक पाने वाढली तर त्याने अभ्यासाचा बोजा वाढेल तो किती? राहता राहिला मुद्दा खर्चाचा. महाराष्ट्रासारख्या श्रीमंत राज्याला ते करणे सहज शक्य आहे. मुळात यामुळे वाढणारा दोनेक पानांचा छपाईखर्च राज्य शासनाकरिता इतका किरकोळ आहे की त्याची आकडेवारी मांडणेही हास्यास्पद ठरेल.

हेही वाचा >>> खनिज इंधनाधारित विकासप्रणालीचे महाधोके वेळीच ओळखायला हवेत…

सरतेशेवटी – शिवचरित्राच्या मांडणीत फेरफार करायचे तर तो विषय राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे उगीच नसती जोखीम का पत्करा, असे वाटणे अगदी साहजिक आहे. परंतु याबद्दल माझी भूमिका अतिशय साधीसोपी आहे. मुळात वरील मुद्दे पुस्तकात नव्याने समाविष्ट करताना कोणत्याही जुन्या मुद्द्याला पुस्तकातून हटवणे अभिप्रेतच नाही. आणि महाराष्ट्रातील विचारवंतांना, किंवा आजमितीस अस्तित्वात असलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना अथवा त्यांच्या समर्थकांना वरीलपैकी कोणत्याही मुद्द्यावर आक्षेप नसावा असे मला वाटते. कारण महाराष्ट्रीय जनतेच्या मूलभूत शिवप्रेमाबद्दल आणि अंगभूत शहाणपणाबद्दल माझी पूर्ण खात्री आहे.

आजपासून फक्त सात वर्षांत, म्हणजेच इ.स. २०३० साली ४०० वी शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी होईल. सगळीकडे मोठा उत्सव होईल. पण त्या वेळी शिवचरित्राचे आपले आकलन कसे असेल? तेव्हाही आपण फक्त जुनेच कवटाळून बसू की अस्सल समकालीन संदर्भ असलेले, जागतिक पार्श्वभूमी असलेले नवीन पैलूही त्याच उत्साहाने लोकांपर्यंत नेऊ? शिवछत्रपती त्यांच्या हयातीतच ग्लोबल झाले होते. आज आपण त्यांना संकुचित करणार की व्यापक करणार, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याची सुरुवात पाठ्यपुस्तकातील बदलाने झाली तर ती शिवछत्रपतींना आणि शिवचरित्रावर संशोधन करणाऱ्या अनेक इतिहास अभ्यासकांना दिलेली खरी मानवंदना ठरेल.

nikhil.bellarykar@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-02-2023 at 10:24 IST

संबंधित बातम्या