‘पाक प्रधानाचे पलायन’ हा अग्रलेख (५ एप्रिल)वाचला. तेथे जे घडले त्यातील गुंतागुंत लेखात आहेच. अविश्वास ठराव नियमानुसार संमत झाला तरीही येणारी अनिश्चितता आपण पूर्वी अनुभवलेली आहे. याचे कारण त्या ठरावामुळे ‘कोण नको’ हे स्पष्ट होते, परंतु ‘कोण हवे’ याचे उत्तर तेव्हाच मिळत नाही. मग काळजीवाहू सरकार आणि विरोधक यांच्यात आकडय़ांचा खेळ सुरू होतो. त्याला हल्ली‘राजकीय पर्यटना’ची (रिसॉर्ट पॉलिटिक्स) जोडही हमखास मिळते. त्यात करदात्यांच्या पैशाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष चुराडा होतो, लोकप्रतिनिधींची बोली लागते अशी चर्चा झडते, कायदेमंडळाचा वेळ फुकट जातो, आणि राजकीय अस्थैर्य येते. यावर उपाय म्हणून घटनादुरुस्ती करून अविश्वास ठरावातच ‘कोणावर विश्वास आहे’ यावरही मतदान अनिवार्य करावे. ‘सभागृहाचा विश्वास ‘अ’वर राहिला नसून तो ‘ब’वर आहे’ असा तो ठराव असावा. मतदारांनी लोकप्रतिनिधींची निवड पाच वर्षांकरिता केलेली असते. त्यांच्या मताचा आणि त्याच्या कालावधीचा मानही राखला जाईल. पाकिस्तानातील प्रसंगांतून धडा घेऊन आपण अविश्वास ठरावाचे ‘नेति नेति’ असे स्वरूप बदलून लोकशाही आणखी बळकट करावी.
– प्रसाद दीक्षित, ठाणे
पुन्हा सैन्याच्या हातात पाकिस्तानचे भवितव्य
‘पाक प्रधानाचे पलायन!’ हे संपादकीय वाचले. पाकिस्तानचे मूळ दुखणे आहे, ते आवश्यकतेपेक्षा जास्त सैन्यदलांच्या आकारात! राज्यकर्त्यांसाठी भारत-द्वेष हा हुकमी एक्का असल्यामुळे, एवढय़ा मोठय़ा सैन्यदलाचे समर्थन करणेही सोपे जाते. परंतु त्यामुळे सामान्य जनांचे जिणे मात्र हराम झाले आहे. शिवाय अमेरिके साठी पाकिस्तानची गरज संपली असल्यामुळे, अमेरिका पाकिस्तानला मोजत नाही. त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारणे, हे राज्यकर्त्यांच्या हातात राहिले नसून, सैन्यदलांच्या मर्जीवर अवलंबून आहे!
– मधुकर पानट, तळेगाव दाभाडे
राजकारणासाठी सांस्कृतिक सपाटीकरण?
‘इथे फक्त भारतीय संस्कृती’ हा रवींद्र साठे यांचा लेख (१ एप्रिल) आणि त्यातील भूमिका अतिशय एकांगी आणि म्हणून विवादास्पद आहे. ते धर्म, संस्कृती आणि देश यांची अकारण सांगड घालण्याचा प्रयत्न करतात. भारतात कितीही धर्म असले तरी त्यांची राष्ट्रीय संस्कृती भारतीय आहे असे ते म्हणतात. त्यांची ही विचारमांडणी सोयीस्कर आणि देशाच्या सांस्कृतिक विविधतेला बाधा आणणारी वाटते.
भारतात भाषावार प्रांतरचना झाली, राज्यनिर्मितीतले मुख्य कारण भाषा असेल तर प्रत्येक राज्याची संस्कृतीदेखील भिन्न ठरते. कोणतीही संस्कृती ही भाषा, अन्न, पेहराव, रीतिरिवाज आणि प्रांतीय इतिहास यानुसार कालानुरूप निर्माण होत असते. त्यामुळे आपल्या देशाला धार्मिक आधारावर एकच संस्कृती आहे हे त्यांचे मत पटत नाही. भारत हा विविधतेने नटलेला बहुसंस्कृत देश आहे. या देशात विविध संस्कृती गुण्यागोिवदाने एकत्र नांदत आल्या आहेत. उदाहरण घ्यायचे झाले तर तमिळनाडू हे केवळ एक भिन्न राज्य नसून त्या राज्यास स्वत:ची भाषा आणि संस्कृती आहे. ती मराठी किंवा काश्मिरी संस्कृतीपेक्षा संपूर्णत: वेगळी ठरते. भौगोलिकदृष्टय़ा बघायला गेले तर भारत हा एक युरोप खंडच आहे. यूरोपमध्ये छोटी छोटी राष्ट्रे आहेत तर आपल्या महाकाय देशात त्याहून मोठय़ा आकाराची राज्ये आहेत. ज्यांची भाषा, संकृती ही त्या त्या प्रांतानुसार वेगवेगळी आहे. युरोप देशात प्रत्येक देशाच्या विभिन्न संस्कृतींचा पुरस्कार करायचा आणि भारतात मात्र सर्व विभिन्न संस्कृतींना राष्ट्रीय मुलामा द्यायचा त्यांचा प्रयत्न विवाद्य ठरतो. एकंदरीत भारतासारख्या बहुभाषिक देशाला केवळ धर्माच्या आधारे सांस्कृतिक कक्षात आणण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो.
त्यांच्या सोयीस्कर पथदर्शी भूमिकेसाठी ते इंडोनेशिया या देशाचे उदाहरण देतात. त्या देशातील पुरोगामित्वाचा दाखला देताना आपल्या देशातील पुरोगामित्वावर डोळेझाक करतात. अजय-अतुल यांच्या गणपती आरतीला उंचीवर न्यायचे काम हनीफ-अस्लम हे ढोलकीबहाद्दर करतात तर फा. फ्रान्सिस दिब्रिटो हे तुकाराम, ज्ञानेश्वर या संतांच्या विचारांवर चर्चमध्ये मराठीत प्रबोधन करतात. हाच खरा भारत आणि हीच खरी भिन्न धार्मिक एकजिनसी संस्कृती. आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेत आपण म्हणतो की, या देशाच्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. आता या परंपरांना विविध ठेवण्यातच देशाचे आणि देशाच्या जनतेचे भले आहे. जिथे अनेक संस्कृती एकाच देशात सुखेनैव नांदतात असा भारत हा एक वैशिष्टय़पूर्ण देश आहे आणि हेच भारताचे सौंदर्य आहे. आपल्या राजकीय अजेंडय़ासाठी राजकारण्यांनी देशाचे सांस्कृतिक सपाटीकरण करू नये, ही विनंती!
– नोएल दिब्रिटो, वसई
धर्म संस्कृती महत्त्वाची की जीवन संस्कृती?
हिंदू संस्कृतीच महत्त्वाची हे अधोरेखित करण्याचे रवींद्र साठे यांचे प्रयत्न अयोग्य आहेत, असे वाटते. भारतीय संस्कृती ही फक्त हिंदू संस्कृती कधीच नव्हती व होऊ शकत नाही. यासाठी आपल्याला ख्रिस्त पूर्व साधारण २७० च्या काळापासून (सम्राट चंद्रगुप्त.. अलेक्झांडर आक्रमण, ग्रीक संस्कृतीचे आगमन) ते अलीकडील इंग्रज राजवट (ख्रिस्त संस्कृती) पर्यंत पहावे लागेल. या कालखंडात भारतात अनेक संस्कृती आल्या, रुजल्या, देवाणघेवाण कर्त्यां झाल्या. हीच खरी भारतीय संस्कृतीची ओळख आणि या संस्कृतीचा प्रवाह इतर संस्कृतींमुळेच वाहता राहिला, सुदृढ व सक्षम झाला आणि पुढेही तो राहील. म्हणून भारतीय संस्कृती म्हणजेच हिंदू संस्कृती हे अजिबात खरे नाही. फक्त हिंदू संस्कृतीचे पालन व्हायला हवे असे म्हणणे हा अतिरेक व एक अशक्य बाब असेल.
याचे उदाहरण द्यायचे झालं तर मेहंदी, सलवार- कमीजसारखा पेहराव, टेबलावर बसून जेवण्याची पद्धत इत्यादी अनेक गोष्टी ज्या परकीय संस्कृतीतून आपल्यात उतरल्या आहेत त्या हद्दपार करणे केवळ अशक्य आहे. कोणतीही संस्कृती कधीही वाईट असू शकत नाही. फक्त तिचे घेतले गेलेले अर्थ आणि तिच्या आचरणाचे मार्ग चुकले तर संस्कृतीची नव्हे तर ती त्या व्यक्तीची चूक असेल. अनेक भिन्न संस्कृतींची बीजे आपल्या संस्कृतीत सामावल्यामुळेच आज विश्वामध्ये आपली सर्वात प्राचीन व एक अनोखी संस्कृती म्हणून ओळखली जाते. फक्त हिंदू संस्कृतीच महान म्हणून इतर अनेक संस्कृतींना अव्हेरणे हे कोतेपणाचे लक्षण होय.
तसेच धर्म आणि संस्कृती या कधीच वेगळय़ा केल्या जाऊ शकत नाहीत. तेव्हा हिंदू धर्म व हिंदू संस्कृतीचा उदो उदो बंद करून आज व्यक्ती जीवन संस्कृती कशी अधिक सुकर करता येऊ शकेल हे पाहिले तर त्यातच या देशाचे, धर्माचे व संस्कृतीचे जास्त भले होईल असे वाटते.
– विद्या पवार, मुंबई
हनुमान चालीसा का? ‘भीमरुपी’ का नको?
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यांसमोर हिंदूंनी ‘हनुमान चालीसा’ म्हणावी असा सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांची आपल्या सैनिकांना विधायक कार्यक्रम देण्याबद्दल ख्याती आहे. सैनिकही तो अमलात आणतील याची खात्री आहे. पण हनुमान चालीसा का? ऊठसूट मराठी भाषेच्या प्रेमाचा गहिवर काढणाऱ्या आणि दणका पिटणाऱ्या राज यांना एकही मराठी स्तोत्र का आठवू नये? ‘भीमरूपी महारुद्रा’ हे रामदास स्वामी यांनी रचलेले ‘मारुती स्तोत्र’ त्यांच्या जिभेवर सहजी आले नाही. ते उत्तरेच्या प्रभावाखाली आल्यामुळे तर हे घडले नाही ना?
– मुकुंद टाकसाळे, पुणे
गोंधळलेला नेता आणि भरकटलेला पक्ष
कोणतीच वैचारिक बैठक पक्की नसलेला नेता म्हणजे राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी ठसठशीत ओळख महाराष्ट्रातील जनतेला होत चालली आहे. पाडव्याच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे तपासल्यावर याची पक्की खात्री होतेय.
उत्तर प्रदेशात विकास होतो मग महाराष्ट्रात का नाही, असे ठाकरे विचारतात. महाराष्ट्राचे किती लोक रोजी-रोटीसाठी उत्तर प्रदेशात गेले? बरोबर दोन वर्षांपूर्वी करोना पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून विशेषत: मुंबई-पुण्यातून आपापल्या राज्यांत परतण्यासाठी कशा रांगा लागल्या होत्या, ते अख्ख्या जगाने पाहिले. तेव्हा राज ठाकरे काय म्हणाले होते त्यांनी तपासावे. उत्तर प्रदेश, बिहारमधील मुंबई किंवा महाराष्ट्रात काम करणाऱ्या कामगार, मजुरांबाबत राज ठाकरे यांचे विचार कायम दुजाभाव करणारेच होते आणि आहेत. रेल्वे भरतीसाठी आलेल्या तरुणांना कल्याण स्थानकात अचानक केलेली मारहाण या बाबी ताज्या आहेत. हिंदू धर्मीयांचे आपणच तारणहार आहोत असे राज ठाकरे यांना वाटत असले तरी जनता हिंदू धर्मीयांचे कैवारी म्हणून शिवसेना किंवा मोदी आणि भाजपकडेच पाहते. हिंदूत्वाचा मुद्दा लक्षात घेऊन त्यांना थेट मते द्यायची सोडून मनसेला कुणी मते देतील यावर मनसैनिकांशिवाय कुणीच विश्वास ठेवणार नाही.
राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केल्यामुळे भाजपला आनंदाच्या उकळय़ा आल्या तरी भाजप ‘लाव रे तो व्हिडीओ’ची राज ठाकरेंची मालिका इतक्या सहजपणे विसरणार नाही. तसेच भाजपची देशातील आणि राज्यातील ताकद पाहता भाजप राज ठाकरे यांच्याशी अजिबात घरोबा करणार नाही. फक्त घेता येईल तेवढा फायदा घेत राहील.
पहिल्या फटक्यात तेरा आमदार निवडून आलेल्या, नाशिकसारखी महानगरपालिका जिंकलेल्या पक्षाची आजची स्थिती केविलवाणी झाली आहे. लोक विकास करणाऱ्यांना मते देत नाहीत अशी नाशिकबाबत मल्लिनाथी करतात, आणि उत्तर प्रदेशात विकासाला लोकांनी मते दिली असे तर्कट मांडतात. राष्ट्रवादीच्या जन्मापासून जातीपातीचे राजकारण वाढले म्हणतात. आणि मशिदीच्या भोंग्यांवरून हिंदू-मुस्लिीम तेढ निर्माण करतात.
एकंदरीत राज ठाकरे यांची गोंधळलेली मन:स्थिती स्पष्ट दिसते.
– डॉ. हिरालाल खैरनार, खारघर, नवी मुंबई