सॉफ्टवेअर युगाची नऋंदी

आयबीएमने अजाणतेपणे स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला होता..

Microsoft , IBM
प्रतिनिधिक छायाचित्र

आयबीएमने १९८० मध्ये ऑपरेटिंग प्रणाली विकत घेतली नाही तर तिचे कॉपीराइट हक्क मायक्रोसॉफ्टला राखू दिले व त्यांच्याकडून आयबीएम पीसीसाठी एमएस डॉस वापरण्याचं लायसन्स घेतलं. ही सॉफ्टवेअर युगाची नांदी होती. मात्र हे करत असताना आयबीएमने अजाणतेपणे स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला होता..

१९८० सालातल्या जुलै महिन्यातली एक प्रसन्न दुपार. बाहेरील वातावरण कितीही आल्हाददायी असलं तरीही आयबीएमच्या मुख्यालयातलं वातावरण काहीसं गंभीर होतं. आधी लघुसंगणक व त्यानंतर आलेले मायक्रोप्रोसेसर चकतीवर आधारलेले संगणक यांनी संगणकविश्वाचा चेहरामोहरा बदलला होता. संगणकांचा आकार व किमती कमी होत होत्या व त्याच वेळेला त्यांची गणनशक्ती कैक प्रमाणात वाढत होती. संगणक ग्राहकांची संख्या भूमितीश्रेणीने वाढत होती. अशा उद्योगपूरक वातावरणात मात्र आयबीएमचा बाजार हिस्सा घटत चालला होता. केवळ मेनफ्रेमवर विसंबून राहणं शहाणपणाचं ठरणार नव्हतं.  काही तरी उपाययोजना करणं गरजेचं होतं.

अशा पाश्र्वभूमीवर जुलै १९८० मध्ये बिल लोवे या आयबीएमच्या संगणक विभागाच्या प्रमुखाने कंपनीच्या संचालक मंडळासमोर एक सादरीकरण केलं. यात त्याने आयबीएमने वैयक्तिक वापरासाठीच्या संगणकनिर्मितीत पडावे याचा हिरिरीने पुरस्कार केला होता आणि अशा संगणकनिर्मितीच्या अंमलबजावणीसाठी एक नावीन्यपूर्ण योजना त्याने सादर केली.  ती म्हणजे संगणक निर्मितीसाठी प्रमाण घटकांचा वापर करणे; ज्यायोगे कमीतकमी वेळात जास्तीतजास्त संगणक संचांची निर्मिती करता येईल. साहजिकच हे प्रमाण घटक आयबीएम स्वत: बनवणार नव्हते; तर विविध कंपन्यांकडून ते घेऊन, त्याची तपासणी व जुळवणी करून आपल्या लोगोसकट ग्राहकाला देणार होते. हे एक प्रकारे संगणकनिर्मितीचे आऊटसोर्सिग होते जे आयबीएमच्या आतापर्यंतच्या विचारधारेशी पूर्णत: विसंगत होते. आयबीएम आणि डीईसीसारख्या इतर कंपन्या त्यांच्या संगणकाचा आराखडा व बांधणी स्वत:च करत होत्या. म्हणूनच आयबीएममधल्या अनेकांचा या कल्पनेला विरोध होता. त्यांचा तार्किक मुद्दा असा होता की प्रमाण घटकाधारित संगणक निर्मितीच्या प्रक्रियेत आऊटसोर्सिग करणं क्रमप्राप्त होतं; ज्यामुळे संगणक रचनेचा आराखडा सर्व जगाला खुला झाला असता व आयबीएमची मक्तेदारी संपली असती.  पण बिल लोवेने आपल्या द्रष्टय़ा सादरीकरणानं आपलं म्हणणं संचालक मंडळाच्या गळी उतरवलं व आयबीएमने वैयक्तिक वापराच्या संगणकनिर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पाला ‘प्रोजेक्ट चेस’ असं नाव देण्यात आलं व या संगणकाला आयबीएम पीसी (पर्सनल कॉम्पुटर).

प्रोजेक्ट चेस प्रकल्प प्रमाणाबाहेर यशस्वी झाला. १९८१ मध्ये आयबीएम पीसी बाजारात आल्याबरोबरच त्याच्यावर लोकांच्या अक्षरश: उडय़ा पडल्या व आयबीएमला आपलं उत्पादन चौपटीने वाढवायला लागलं. या संगणकासाठीची ऑपरेटिंग प्रणाली आयबीएमने एका नुकत्याच सुरू झालेल्या अज्ञात कंपनीकडून घेतली होती, जिचं नाव होतं मायक्रोसॉफ्ट!

मायक्रोसॉफ्टची स्थापना बिल गेट्स व पॉल अ‍ॅलन या दोघा मित्रांनी १९७५ मध्ये केली. दोघांनी हार्वर्ड विद्यपीठातलं आपलं शिक्षण अर्धवट सोडलं होतं. पुढील काळ हा वैयक्तिक वापराच्या संगणकांचा असणार हे या दोघांच्या चाणाक्ष बुद्धीने ताडलं. जर सर्वसामान्य माणूस संगणक हाताळणार असेल तर त्याचं संगणकाबरोबर संवाद करण्याचं माध्यम हे सोपं, सहज आकलन होणारं व कार्यक्षम असलं पाहिजे याबद्दल त्यांचं एकमत झालं.

आयबीएम तेव्हा आपल्या पीसीच्या ऑपरेटिंग प्रणालीसाठी एका योग्य भागीदाराच्या शोधात होती. त्यांची सुरुवातीची डिजिटल रिसर्च या कंपनीबरोबर चाललेली बोलणी फिस्कटली व त्यांनी तुलनेने अप्रसिद्ध अशा मायक्रोसॉफ्टला ऑपरेटिंग प्रणाली बनविण्याकरिता पाचारण केलं.  खरं तर मायक्रोसॉफ्टकडे ऑपरेटिंग प्रणाली नव्हतीच; होती ती केवळ संगणक वापरकर्त्यांने दिलेल्या आज्ञा संगणकाला यंत्रभाषेत रूपांतर करून देणारी इंटरप्रिटर प्रणाली! पण बिल गेट्सला ही सुवर्णसंधी दवडायची नव्हती. त्याने आयबीएमबरोबर बोलणी चालू ठेवली व त्याच वेळी सिएटल कॉम्प्युटर प्रॉडक्ट्स या कंपनीकडून त्यांची QDOS ऑ परेटिंग प्रणाली विकत घेतली. त्यात जुजबी बदल करून त्याचं एमएस डॉस (मायक्रोसॉफ्ट डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम) असं नामकरण केलं व अखेरीस नोव्हेंबर १९८० मध्ये आयबीएम पीसीच्या ऑपरेटिंग प्रणालीचं कंत्राट आपल्या पदरात पाडून घेतलं.

या कंत्राटाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्टय़ (ज्याचा संगणक क्षेत्रावर दूरगामी परिणाम झाला) म्हणजे आयबीएमने ही ऑपरेटिंग प्रणाली सरसकट विकत घेतली नाही तर तिचे कॉपीराइट हक्क मायक्रोसॉफ्टला राखू दिले व त्यांच्याकडून आयबीएम पीसीसाठी एमएस डॉस वापरण्याचं लायसन्स घेतलं. यामध्ये मायक्रोसॉफ्टला प्रत्येक आयबीएम पीसीच्या विक्रीवर ४० अमेरिकन डॉलर मिळणार होते. तसंच या ऑपरेटिंग प्रणालीचं लायसन्स दुसऱ्या कोणत्याही कंपनीने बनविलेल्या संगणकासाठी विकण्यास मायक्रोसॉफ्टला मुभा होती.  सॉफ्टवेअर युगाची ही नांदी होती. आयबीएमने अजाणतेपणे स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला होता. आयबीएम पीसीचं आरेखन प्रमाण घटकांमुळे सर्व जगाला खुलं झालं होतं व त्यामुळे आयबीएम पीसीसदृश संगणक बनवणं हे सहजप्राय बनलं होतं. पण त्यावरच्या ऑपरेटिंग प्रणालीचे सर्वाधिकार मायक्रोसॉफ्टकडे असल्याने इतर संगणक बनविणाऱ्या कंपन्यांना  मायक्रोसॉफ्ट त्याच्या ऑपरेटिंग प्रणालीचं लायसन्स विकण्यास मोकळा होता.

दुसऱ्या बाजूला जसा संगणक सामान्य माणसाच्या हाती गेला तसं हार्डवेअरचं महत्त्व कमी व्हायला लागलं. सामान्य वापरकर्त्यांला संगणकाच्या आतील संरचनेशी फार काही देणंघेणं नव्हतं. सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग प्रणाली त्याच्यासाठी जास्त महत्त्वाची होती कारण संगणकाशी संभाषण करायचं तेच एक माध्यम होतं.

बघताबघता मायक्रोसॉफ्ट संगणकविश्वातील एक बलाढय़ कंपनी बनली. आयबीएमला आपली चूक उमगेपर्यंत उशीर झाला होता. संगणक वापरकर्ते हळूहळू एमएस डॉसला सरावत चालले होते. आयबीएमने पुढे एमएस डॉसची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी खूप प्रगत अशी ओएस/२ ही ऑपरेटिंग प्रणाली आणली खरी पण मायक्रोसॉफ्टने आपल्या विंडोज या ग्राफिकल ऑपरेटिंग प्रणालीने आयबीएम व अन्य कंपन्यांच्या ऑपरेटिंग प्रणालींचं दफन केलं. विंडोज ऑपरेटिंग प्रणालीबरोबर मायक्रोसॉफ्टने इतर उपयुक्त सॉफ्टवेअर (जसं की वर्ड, एक्सेल वगैरे) एकत्र देण्यास सुरुवात केली व विंडोज ही संगणकाची प्रमाण ऑपरेटिंग प्रणाली बनली.

नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्ट ही संगणक सॉफ्टवेअरक्षेत्राची अनभिषिक्त सम्राट होती. विंडोज ऑपरेटिंग प्रणालीला कोणताही समर्थ पर्याय समोर दिसत नव्हता. सर्व मालकी हक्क स्वत:कडे राखून सॉफ्टवेअर बनविण्याची प्रोप्रायटरी पद्धत हीच प्रमाण मानली जाऊ  लागली होती.आता या प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर प्रणालींचे स्वामित्व हक्क व कॉपीराइट हे पूर्णत: ते बनविणाऱ्या कंपन्यांकडे राखीव असल्यामुळे या कंपन्या त्यांच्या सॉफ्टवेअर वापरकर्त्यांला पैशांच्या मोबदल्यात ते सॉफ्टवेअर केवळ वापरण्याचा अधिकार देतात. त्यात कुठल्याही प्रकारे बदल वा सुधारणा करण्याचा अधिकार वापरकर्त्यांला मिळत नाही किंबहुना हे तांत्रिकदृष्टय़ा निव्वळ अशक्य असतं कारण वापरकर्त्यांकडे या सॉफ्टवेअरची जी प्रत असते (ज्याला executable असं म्हणतात) त्यात फक्त यंत्रभाषेत सारा मजकूर लिहिलेला असतो; जो संगणक सोडून कोणाच्याही समजण्यापलीकडचा असतो.

आता एखादी कंपनी आपला पैसा व आपल्या कर्मचाऱ्यांचा वेळ आणि शक्ती खर्च करून सॉफ्टवेअरचं उत्पादन करत असेल तर कॉपीराइटच्या माध्यमातून त्या खर्च झालेल्या पैशांचा परतावा मिळवणं खरं तर साहजिकच आहे. पण असं असताना त्याच वेळेला याच संगणक क्षेत्रात सॉफ्टवेअर निर्मितीची अशी एक उत्पादन व्यवस्था उभी राहिली की जिने कुठल्याही वस्तूच्या उत्पादन पद्धतीचा पायाच आमूलाग्र बदलून टाकला. एकेकाळी व्यावसायिक जगाच्या परिघाबाहेर असलेल्या या व्यवस्थेने मुख्य प्रवाहात कधी प्रवेश केला हे मायक्रोसॉफ्टसारख्या प्रस्थापितांना कळलंदेखील नाही. सॉफ्टवेअर निर्मितीच्या या पर्यायी व्यवस्थेलाच ओपन सोर्स म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारचं आर्थिक पाठबळ नसताना प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरच्या विरोधात दंड थोपटून बंड करणाऱ्या, त्यात बऱ्याच अंशी यशस्वी ठरलेल्या व सॉफ्टवेअर निर्मितीचे आजपर्यंतचे सगळे निकष बदलून टाकणाऱ्या ओपन सोर्स व्यवस्थेने केवळ तंत्रज्ञानच नव्हे तर मानसशास्त्रज्ञ, व्यवस्थापनतज्ज्ञ व अर्थतज्ज्ञांनाही आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. संगणकीय रंगमंचावरच्या सॉफ्टवेअर नामक नाटय़ाला नवं वळण देणाऱ्या याच ओपन सोर्स निर्मितीव्यवस्थेचा ऊहापोह आपण पुढील लेखांपासून करणार आहोत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाजालाचे मुक्तायन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 30 years ago microsoft signs contract with ibm to create ms dos

ताज्या बातम्या