scorecardresearch

Premium

अग्रलेख : फाशीच पण..

भाजपच्या विजयाचा वेगळेपणा असा की तो नेहमीच आहे त्यापेक्षा कितीतरी पट अधिक वाटतो. तसे सर्वसामान्यांस वाटायला लावणे हे त्या पक्षाचे यश.

अग्रलेख : फाशीच पण..

भाजपच्या विजयाचा वेगळेपणा असा की तो नेहमीच आहे त्यापेक्षा कितीतरी पट अधिक वाटतो. तसे सर्वसामान्यांस वाटायला लावणे हे त्या पक्षाचे यश.

‘‘कोणताही विजय अंतिम नसतो आणि पराजय जीवघेणा’’, असे विन्स्टन चर्चिल म्हणत. यातील पहिल्याचे स्मरण सत्ताधाऱ्यांनी करायला हवे आणि दुसरे विरोधकांनी लक्षात ठेवायला हवे. कारण भाजपच्या परंपरेनुसार विजयदिनी कार्यकर्त्यांसमोर या आणि भाजपच्या सर्वच विजयांचे शिल्पकार नरेंद्र मोदी यांचे भाषण. या भाषणात मोदी यांनी २०२२ चा विजय हा २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांतील यशाची पायाभरणी ठरेल, असे विधान केले. असे विधान करता येण्याइतके राजकीय पुण्य त्यांनी कमावलेले आहे हे निश्चित. तेव्हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न नाही. प्रश्न विरोधकांचा आणि त्यांच्या अस्तित्वामुळेच टिकू शकेल अशा लोकशाहीचा आहे. भाजपच्या विजयरथाची घोडदौड रोखायची कशी हे विरोधकांपुढील कालचे, आजचे आणि उद्याचेही आव्हान असेल. भाजपच्या विजयास अनेक पैलू आहेत तसेच विरोधकांच्या पराभवामागे दोन कारणे आहेत.

rashtrasant tukdoji maharaj
चिंतनधारा : सत्कार्याला प्रोत्साहन देणे गरजेचे!
Pankaja Munde Narendra Modi
“हा तुमचा पक्षाला इशारा आहे का?”, पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, “मी त्यांना…”
supreme court on JMM Bribery Scandal
अन्वयार्थ: खासदार-आमदार कायद्यापेक्षा मोठे?
chandrayan 3 pradyan lander
एमपीएससी मंत्र : गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा : संयुक्त पेपर – चालू घडामोडी

भाजपच्या विजयाचा वेगळेपणा असा की तो नेहमीच आहे त्यापेक्षा कितीतरी पट अधिक वाटतो. तसे सर्वसामान्यांस वाटायला लावणे हे भाजपचे यश. कित्येक दशकांच्या कष्टानंतर त्यास ते साध्य झाले आहे. भाजपचे प्रयत्न हे नेहमी दुहेरी असतात. पहिला भाग निवडणुकांत यश मिळावे यासाठी केल्या जाणाऱ्या काबाडकष्टाचा आणि दुसरा भाग हे यश मिळाल्यानंतर ते बहिर्वक्र भिंगातून सर्वासमोर मांडण्याचा. हे दुसरे यश भाजपस साध्य झाले याचे कारण राजकीय कथानक (पॉलिटिकल नॅरेटिव्ह) आपल्या हाती राखण्याची त्या पक्ष नेत्यांची क्लृप्ती. एकदा का कथानक निश्चित करता आले की अन्यांस त्या कथानकाबरहुकूम तरी वागावे लागते अथवा ते पराभूत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. यातील काहीही केले तरी मध्यवर्ती भूमिकेत असते ते कथानक. त्यावरील नजर काही कोणास हटवता येत नाही. उत्तर प्रदेश आणि अन्य चार राज्यांच्या निवडणुकांतही याचीच प्रचीती आली. आपला एकच पक्ष हिंदू धर्मीयांचा रक्षणकर्ता आहे, आपला एकच पक्ष प्रामाणिकांचा आधार आणि अप्रामाणिकांचा कर्दनकाळ आहे, आपला एकच पक्ष तेव्हढा देशप्रेमी आहे आणि म्हणून माझे विरोधक हे या सगळय़ांचे विरोधक आहेत असा मोदी यांचा आणि म्हणून भाजपचा सूर असतो. हा सूर लावून त्यांनी सातत्याने यश मिळवलेले असल्याने त्यांच्या या कथनामागे निश्चित असा अनुभवसंचय आहे. या तुलनेत विरोधक स्वत:चे असे कथानक तयार करू शकले नाहीत. त्यांचे सर्व प्रयत्न राहिले ते भाजपचे हे कथानक असत्य ठरवण्याचे. वास्तविक हे कथानक अजिबात सत्य नाही, हे भाजपदेखील जाणतो. पण दुसरे सत्य भासेल असे कथानक विरोधकांस सादर करता येत नसल्याने भाजपचे कथन सत्य मानले जाते. या मुद्दय़ाच्या आधारे ताज्या निवडणूक निकालांकडे पाहू.

या निवडणुकांस सामोरे गेलेल्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा यापैकी चार राज्यांत निवडणुकांपूर्वी भाजपची सत्ता होती. याचाच अर्थ असा की या निवडणुकांत नव्याने एखादे राज्य भाजपच्या हाती अधिक आले असे काही झालेले नाही. तसे एकमेव राज्य होते ते पंजाब. तेथेही आम्ही सत्ता स्थापन करू असा भाजपचा विश्वास होता. तो अनाठायी ठरला. त्या राज्यात भाजपने अमिरदर सिंग या काँग्रेसच्या थकल्याभागल्या आणि त्या पक्षालाही नकोशा नेत्याशी हातमिळवणी केली. या नव्या सोयरिकीने भाजपस काही समाधान मिळाले नाही; पण तरी काँग्रेसचा एक समर्थ नेता गारद करण्याचा आनंद मात्र लुटता आला.  उत्तर प्रदेशात भाजपकडे ३९ टक्के मते होती. ती ४२ टक्के झाली. म्हणजे तीन टक्क्यांची वाढ. तर विरोधी समाजवादी पक्षाची मते २१ टक्क्यांवरून ३२ टक्क्यांवर गेली. म्हणजे ११ टक्क्यांनी त्या पक्षाची मते वाढली. पण ही वाढ भाजपस पराभूत करण्याइतकी निर्णायक ठरली नाही. तेव्हा घडले ते इतकेच की या निवडणुकांत भाजपने आपल्या हाती होती ती सर्व राज्ये राखली. पण ‘राखण्या’तही विजय असतो आणि असे सत्ताधाऱ्यास हाती आहे ते राखू देण्यात विरोधकांचा पराभव असतो. या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा प्रश्न यापुढे काय होणार? पंतप्रधान मोदी जे सूचित करतात त्यात आत्मविश्वास किती आणि जमिनीवरील वास्तव किती?

या प्रश्नांची उत्तरे यापुढे विरोधक आपले कथानक कसे रचतात यावर अवलंबून असतील. म्हणजे असे की उत्तर प्रदेशात या विरोधकांस आपल्यातील मतविभागणी टाळता आली नाही. एकेकाळचे सप-बसप हे आघाडी घटक स्वतंत्र लढले आणि काँग्रेसनेही आपली वेगळी चूल मांडली. प. बंगालच्या निवडणुकीत डावे आणि काँग्रेस यांनी हे टाळले आणि तृणमूल आणि भाजप यांची समोरासमोर झुंज होईल अशी व्यवस्था केली. त्यात ममता यशस्वी ठरल्या. उत्तर प्रदेशात बरोबर उलट झाले. मतविभागणी टाळता न आल्याने विरोधकांस त्याचा फटका बसला. या निवडणुकीत वास्तविक प. बंगालातील ममतांइतके उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ लोकप्रिय आहेत किंवा काय याचा फैसला टळला. कारण विरोधकांतील फुटीने त्यांस विजयी केले. ममतांइतके ते लोकप्रिय असते तर ममतांप्रमाणे त्यांच्या विजयाचा आकार वाढता. पण तसे झालेले नाही. तो उलट घटला. भाजपच्या माध्यमी, समाजमाध्यमी कौशल्यामुळे हा विजय आहे त्यापेक्षा मोठा वाटत असला तरी तो  प्रत्यक्षात तसा नाही. उदाहरणार्थ भाजपच्या सुमारे १६५ जागा या केवळ २०० ते २००० इतक्या अल्प मताधिक्याने आल्या आहेत. हे सत्य समजून घेतल्यास विरोधकांस आपली रणनीती आखणे सुकर होईल. त्यासाठी त्यास दोन मुद्दय़ांचा आधार लागेल. एक म्हणजे स्वत:चे कथानक तयार करणे आणि दुसरे म्हणजे मतविभागणी टाळणे. या दोन्हींची कसोटी सर्वप्रथम लागेल ती महाराष्ट्रात. मुंबई महापालिका निवडणुकांत.

नवाब मलिक आणि त्यांचे कथित दाऊद इब्राहीम संबंध हा मुद्दा उपस्थित करून भाजपने स्वत:च्या कथानक निर्मितीची सुरुवात तर केलेलीच आहे. त्याचा समर्थ प्रतिवाद अजूनही सत्ताधारी करताना दिसत नाहीत. वास्तविक २०१४ ते २०१९ ही पाच वर्षे राज्यात हिंदूत्ववादी आघाडीची सत्ता होती. त्या काळात यवनी मलिक आणि त्यांचे दाऊद संबंध खणून काढण्याचे प्रयत्न करणे दूरच; पण त्याचा बभ्राही झाल्याचे ऐकिवात नाही. त्या काळात खरे तर केंद्रातही भाजपच होता. म्हणजे या ‘डबल-इंजिना’च्या ताकदीने हे मलिक-दाऊद संबंध बाबरी मशिदीप्रमाणे ध्वस्त करता आले असते. तसे झाले नाही. कदाचित त्या काळात निवडणुका नसल्याने आणि आपल्या हिंदूत्ववादी साथीशीच पुढे दोन हात करण्याची वेळ येईल याचा अंदाज न आल्याने हा मुद्दा पुढे आला नसावा. आता परिस्थिती बदललेली आहे आणि मुंबई महापालिका निवडणुका समोर आहेत. म्हणून मग ही दाऊदी याद आणि नवकथानक निर्मिती ! त्यास प्रतिकथेने वा आपल्या स्वतंत्र कथानकाचे उत्तर द्यावयाचे असेल तर सत्ताधाऱ्यांस दुसऱ्या मुद्दय़ाचा विचार करावा लागेल. तो म्हणजे मतविभाजन टाळणे. उत्तर प्रदेशात मायावतींचा बसप हा मत विभागणीतील कर्ता ठरला. मुंबई महापालिका निवडणुकांत ते कर्म राज ठाकरे यांचा ‘मनसे’ करू शकेल. स्वतंत्रपणे दखलपात्र यश मिळवण्याइतकी ताकद त्या पक्षाकडे नाही. पण मायावतींच्या ‘बसप’प्रमाणे तो सत्ताधारी त्रिकुटास पायात पाय घालून पाडू मात्र निश्चित शकतो. अशा वेळी मुंबई महापालिका असोत वा नंतर दोन वर्षांतील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका असोत, विरोधकांस वरील मुद्दय़ांवर आतापासूनच तयारी करावी लागेल. अन्यथा बेंजामिन फ्रँकलिन म्हणून गेले त्यानुसार सामुदायिक फाशी की एकेकटय़ाने फास लावून घेणे एवढाच पर्याय विरोधकांहाती असेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pm narendra modi victory speech after wins in assembly elections zws

First published on: 14-03-2022 at 01:35 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×