रेल्वे खात्याने आपल्या ताटात कायम उपेक्षा वाढून ठेवली आहे, या अनुभवसिद्ध वैफल्याच्या भावनेने मुंबईच्या उपनगरी प्रवाशांना सततचे ग्रासलेले असते. दिवसातून किमान दोन वेळा तरी एखाद्या उपनगरी रेल्वे स्थानकावर त्याला ताटकळावेच लागते. गाडीचे आगमन पलीकडच्या फलाटावर होणार, असे आयत्या वेळी जाहीर होताच शरीराचे सारे अवयव लवचीकपणे वळवत गर्दीतून वाट काढत गाडीत घुसण्याचे कसब तर त्याला जणू जन्मजात लाभले असावे. यातच एखादी गाडी अचानक रद्द झाल्याची उद्घोषणाही होते आणि ‘यात्रियों को होनेवाली असुविधा के लिए खेद है’.. असा ‘त्रयस्थ’ आणि कोरडा आवाजही कानाशी कर्कशपणे आदळतो. ती ‘असुविधा’ झाली नाही, तर प्रवाशांनाच कधीकधी चुकल्यासारखे वाटून मनात खेद दाटू लागतो. उपनगरी प्रवास असो किंवा लांब पल्ल्याच्या गाडीचा प्रवास असो, उपेक्षेचा अनुभव आला नाही, असा मुंबईकर शोधावाच लागेल. यापैकी अनेक मुंबईकरांचे कोकणाशी जवळचे नाते असते. म्हणूनच कोकण रेल्वे हे त्यांचेही स्वप्न होते. कोकण रेल्वे सुरू झाल्यानंतर, आपल्या गावावरून जाणाऱ्या या मार्गावरील गाडीशी चाकरमानी मुंबईकराचे जिव्हाळ्याचे नाते जडले, पण कोकण रेल्वे रुळली आणि आपल्या गावाला टाटा करीत दक्षिणेकडे जाणाऱ्या गाडय़ांमध्ये प्रवासाचे तिकीट मिळविणे किंवा गर्दीत शिरणे हे उपनगरी रेल्वेत घुसण्याएवढेच दिव्य आहे, या अनुभवाने त्याच्या या भावना आटत चालल्या. गौरी-गणपती, शिमगा, दिवाळीला रेल्वेचा नाद सोडून कशेडीच्या घाटातील कोंडीचा सामना करण्याची किंवा पुणे-कोल्हापूरमार्गे कोकणात उतरण्याची जुनी परंपरा अलीकडे पुन्हा सुरू झाली आहे, त्याचे कारणही हेच असावे. कोकण रेल्वे कोकणातून जाते आणि परवडेल अशा भाडय़ात गावाकडचे घर गाठता येते, एवढाच त्याचा या रेल्वेकडे पाहण्याचा दृष्टिकोन उरला. आता तर कोकणातील मुंबईकराचे कोकण रेल्वेशी असलेले हे अंतर अधिकच वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गर्दीच्या आणि सणासुदीच्या हंगामात या मार्गावरील गाडय़ांना होणारी गर्दी म्हणजे दलालांच्या सुगीचे दिवस ठरू लागले आहेत. अशा हंगामात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार वाढतो, दलालांची मुजोरी वाढते, रेल्वे कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा आणि दलालांची हातमिळवणी होऊन कोटय़वधींची कमाई करणारी ‘रॅकेटे’ तयार होतात. या साऱ्याची रेल्वे प्रशासनाला जाणीव असते आणि हे रोखण्यासाठी त्याच त्याच उपाययोजनाही केल्या जात असतात, पण रेल्वेच्या आणि प्रवाशांच्या मानगुटीवर बसलेले हे रॅकेटांचे भूत उतरविणे रेल्वेला शक्य झालेले नाही. गेल्या काही वर्षांत आरक्षण केंद्रांच्या परिसरात अचानक छापे टाकणे, ई-तिकिटांच्या आरक्षणाची वेळ बदलणे, तिकीट खरेदीच्या संख्येवर नियंत्रणे आणणे असे उपाय रेल्वे प्रशासनाने आखले, पण तरीही तिकिटांच्या काळ्या बाजाराला आणि दलालांच्या मक्तेदारीला वेसण घालणे रेल्वे प्रशासनास जमलेलेच नाही. गौरी-गणपतीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे नियमानुसार साठ दिवस अगोदरच्या आरक्षणासाठी ताटकळलेल्या प्रवाशांच्या हाती पहिल्या दोनपाच मिनिटांतच ‘वेटिंग लिस्ट’ची तिकिटे पडू लागल्याने, कोकण रेल्वेच्या प्रवासाचा कब्जा दलालांनी घेतल्याचा आणि रेल्वे प्रशासन पुरते हतबल असल्याचा संशय बळावला आहे. गावाकडे जाण्यासाठी आसुसलेल्या प्रवाशांच्या या पहिल्याच अनुभवामुळे रेल्वेचे ‘अच्छे दिन’ दूरच आहेत, अशी प्रवाशांची भावना होत आहे. राज्यातील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून याबाबत नाराजी नोंदविली असली तरी ‘असुविधा के लिए खेद है’, ही उद्घोषणा मुंबईकर चाकरमान्याला यापुढेही ऐकावीच लागणार आहे.