सुखोई की दु:खोई?

१४ ऑक्टोबर रोजी भारतीय वायुदलाचे आणखी एक सुखोई-३० विमान पुण्याजवळ कोसळले. ्रगतवर्षी फेब्रुवारीमध्येही याच लढाऊ विमानांपैकी एक कोसळले.

१४ ऑक्टोबर  रोजी भारतीय वायुदलाचे आणखी एक सुखोई-३० विमान पुण्याजवळ कोसळले. ्रगतवर्षी फेब्रुवारीमध्येही याच लढाऊ विमानांपैकी एक कोसळले. त्यापूर्वी म्हणजे सुमारे अडीच वर्षांपूर्वीही असेच एक सुखोई-३० राजस्थानच्या वाळवंटात कोसळले. त्याआधीही अशीच दोन सुखोई-३० विमाने कोसळली. माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत निदान पाच सुखोई-३० ही लढाऊ विमाने कोसळली. चार हजार कोटी रुपयांचा चुराडा झाला. या वित्तहानीपेक्षा अधिक महत्त्वाची जी मनुष्यहानी झाली असेल ती हानी मोजमापाच्या पलीकडील आहे.
एवढे होऊनही भारतीय संरक्षण मंत्रालयाला अद्याप जाग कशी आलेली नाही? मिग २५ सोडा; परंतु मिग २१ आणि मिग २९ या लढाऊ विमानांचेसुद्धा अनेक अपघात झाले. अनेक उत्तम आणि तरुण पायलट मृत्युमुखी पडले. युद्धभूमीवर अपघात होतात तेव्हा आपण हळहळ व्यक्त करतो; परंतु वरीलप्रमाणे अपघात झाल्यावर बातमी वाचून २४ तासांत आपण ती विसरूनही जातो. हे सगळं भयंकर आहे, दुर्दैवी आहे, असं आपल्याला का वाटत नाही?
हे असले अपघात नॉन मेण्टेनन्समुळे होतात का याबद्दल जनतेने सरकारला विचारणं आवश्यक नाही का? पायलट तयार करताना त्यांच्या प्रशिक्षणावर लाखो रुपये खर्च केले.  तेव्हा आपले काम संपले, जबाबदारी संपली अशी संरक्षण मंत्रालयाची भावना आहे की काय, याबद्दल जनताजनार्दनाने सरकारला जाब विचारणे आवश्यक आहे की नाही?
माझ्या माहितीप्रमाणे १४ ऑक्टोबरच्या दुर्दैवी घटनेतील फायटर पायलट विंग कमांडर एस. व्ही. मुंजे हेच अडीच-तीन वर्षांपूर्वीच्या राजस्थानातील दुर्दैवी विमानाचे पायलट होते. त्या अपघातात त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा सहकारी मृत्युमुखी पडला. सुदैवाने या वेळेस ते स्वत: आणि त्यांचा सहकारी दोघेही वाचले. मुंजे हे एनडीएच्या देशभरातील परीक्षेत पाचव्या क्रमांकावर उत्तीर्ण झालेले आहेत. कारगिल युद्धात एकवीस वेळा टायगर हिल्सवर बाँबिंग करून पाकिस्तानला जरब बसविलेले असे ते योद्धा आहेत. ते आपल्या वायुदलाच्या टेस्ट पायलट्सपैकी एक आहेत. काही काळ वायुदलाचे सर्वात तरुण विंग कमांडर म्हणून त्यांचा लौकिक होता अथवा अद्यापही असावा. अत्यंत तरुण पायलट्सना भारतीय आकाशात युद्धकाळातील प्रशिक्षण देणारे असे ते अधिकारी आहेत. त्यांच्यासारख्या अनेक अधिकाऱ्यांना अकारण आणि चूक त्यांची नसताना अशा दुर्दैवी अपघातांना सामोरे जावे लागते आणि त्यातून हे लोक वाचलेच तर भारतीय संरक्षण मंत्रालय व रशियन तंत्रज्ञांच्या हजारो चौकशांना त्यांना तोंड द्यावे लागते. त्यांचे मानसिक खच्चीकरण होते यावर आपण सर्वजण काय करणार आहोत?

 ‘जब्बार पटेल’ नावाची पोटदुखी असणाऱ्यांसाठी..
प्रथमत डॉ. जब्बार पटेल या बुद्धिमान रंगकर्मीला ‘विष्णुदास भावे पुरस्कार’ मिळाल्याबद्दल मनस्वी आनंद व्यक्त करतो आणि त्यांचे मनापासून अभिनंदनही करतो. आणि आता..
गेल्या आठवडय़ाभरात ‘लोकसत्ता’तील ‘लोकमानस’मध्ये ‘जब्बार यांची कामगिरी काय?’ आणि ‘जब्बार यांना पुरस्कार देणाऱ्यांची निवड अयोग्य’ अशा शीर्षकांची पत्रे आली. रंगभूमी-इतिहासकाराच्या थाटात जब्बार यांच्या नाटय़कारकीर्दीबद्दलच शंका उत्पन्न करून ‘विष्णुदास भावे पुरस्कार’ अयोग्य माणसाला दिल्याबद्दल बोभाटा सुरू करणारी ती पत्रे होती. ही दोन पत्रे लिहिणाऱ्या पत्रलेखिका  नाटय़क्षेत्रात किंवा रंगभूमी विषयक अभ्यासक्षेत्रात कोण आहेत हे मला ज्ञात नाही. दोन्ही पत्रे ‘‘घाशीराम’नंतर नाटक नाही’ चे तुणतुणेच वाजवत आहेत. शिवाय, चित्रपट-क्षेत्रातील जब्बारच्या कामाची ‘भावे पुरस्कारा’साठी दखल घ्यायची गरजच नाही, हे सांगायला कुणाचीही गरज नाही, इतपत त्या पुरस्काराचे निकष स्पष्ट आहेत.
जब्बार पटेल यांनी नाटय़ कारकीर्द १९६५ पासून १९८५ पर्यंत म्हणजे जवळपास २० वर्षे चालू राहिली आणि वर्षांनुक्रमे बहरतच गेली. १९७२ मध्ये मी ‘घाशीराम’च्या निमित्ताने पटेलांच्या बरोबर आलो तो १९८५च्या ‘पडघम’पर्यंत. मी त्यांचे स्वत: पाहिलेले नाटक ‘अशी पाखरे येती’ हे. ज्या नाटकाने राज्य नाटय़स्पर्धेत ६ सुवर्णपदके लुटली होती. त्या आधी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन या त्या काळच्या ख्यातनाम संस्थेत जादूगार, देवांचे मनोराज्य, तू वेडा कुंभार, खून पाहावा करून ही नाटके करून तो प्रायोगिक रंगभूमीवरचा नायक झाला होता. तेंडुलकरांचेच ‘लोभ नसावा ही विनंती’ हे नाटक त्याने बी. जे. मेडिकलकडून राज्य स्पर्धेत सादर केले होते. डॉ. लागू, भालबा केळकर यांसारख्या मोठय़ा कलाकारांबरोबर तो तयार होत होता. ७१-७२च्या सुमारास त्यानं पी.डी.ए.मध्ये ‘स्टडी सर्कल’ सुरू केले. त्यामध्ये मोहन आगाशे, सतीश आळेकर, मी स्वत:, मोहन गोखले यांसारखी उमेदवार मंडळी होतो.
‘घाशीराम कोतवाल’ हे प्रायोगिक रंगमंचावरचे मैलाचा दगड ठरलेले नाटक १९७२ मध्ये त्याने केले. त्या काळात ११ देशांत ६० प्रयोग ‘घाशीराम’ या नाटकाचे झाले. ‘गार्डियन’सारख्या वृत्तपत्रानं, ‘ब्रिटिश रंगभूमीने या नाटकापासून काही स्फूर्ती घ्यावी’ या शब्दात या नाटकाला वाखाणलं. त्यानंतर पु.लं.चं ‘तीन पैशाचा तमाशा’, नंतर ‘खेळिया’ आणि १९८५ ला अरुण साधूंचं ‘पडघम.’ त्यानंतर त्यानं रंगमंचाचा निरोपच घेतला.
व्यावसायिक रंगभूमीचा त्याला कधीच मोह पडला नाही. आकर्षणही वाटले नाही. रंगभूमीची खरी सेवा विनामोबदला आणि सर्व झोकून देऊन काम करणारी आमच्यासारखी सर्व प्रायोगिक मंडळीच करीत आहेत, करीत राहातील. १९७२ ते १९८५ पर्यंत त्याच्याच नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या थिएटर अ‍ॅकॅडमी या संस्थेचा तो महत्त्वाचा मार्गदर्शक होता.
असो. थांबतो. सुज्ञ असतील तर आणि तरच त्यांसी अधिक सांगणे न लगे. काय माहीत उद्या, दोनच कवितासंग्रह म्हणून कवी आरती प्रभू, एकच कादंबरी म्हणून लेखक विश्राम बेडेकर, एकच कवितासंग्रह म्हणून बा. सी. मर्ढेकर यांनाही ही लोकं मोडीत काढतील. सगळी मौज आहे.
-चंद्रकांत काळे, (गायक-अभिनेता), पुणे
 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sukhoi becomes sorrow

ताज्या बातम्या