आपला मुलगा वा मुलगी जर देवाला सोडून कुणा सद्गुरूला भजू लागली, तर आईवडिलांना चिंता वाटते. बरं, सद्गुरू हा देहातीत असतो, देह सोडल्यावरही असतोच, हे खरं. तरी या ज्ञानाच्या जाणिवेतून नव्हे तर पुत्रमोहातून, पूर्वी होऊन गेलेल्या एखाद्या सद्गुरूच्या भक्तीत मुलगा अडकला तरी आईबापाला तेवढी भीती वाटत नाही. देहात असलेल्या सद्गुरूकडे मात्र कुणी जाऊ लागला की वादळ उठलंच समजा. मग घरचे आणि दारचेही पदोपदी ‘ज्ञान’ सांगू लागतात. एक वेळ दारच्यांना थोपवता येतं, पण घरच्यांना समजावणं सोपं नसतं. तेव्हा स्वामींचे वडील आणि मामा दोघेही एकाच सद्गुरूचे असणं आणि मामांनीच स्वामींना सद्गुरू गणेशनाथांकडे नेणं, हा योग मोलाचा आहे. तेव्हा आध्यात्मिक अंगानं पाहू जाता, स्वामींच्या चरित्राची ही पृष्ठभूमी होती. आणखी एका मोठय़ा संस्काराची जोड या चरित्राला आहे, तो संस्कार आहे देशसेवेचा. स्वामींचा जन्म १५ फेब्रुवारी १९०३चा. स्वामींचं लौकिक शिक्षण १९१४ ते १९१९ या कालावधीत रत्नागिरीत, तर त्यानंतर १९२२पर्यंत मुंबईतील आंग्रेवाडीतील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत झालं. नंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची वाङ्मय विशारद पदवी त्यांनी प्राप्त केली. शिक्षणाच्या या संपूर्ण कालावधीचा विचार केला, तर त्यांचं सर्जनशील आणि संवेदनशील मन देशप्रेमाच्या भावनेनं कसं सहजप्रेरित झालं असेल, याचा विचार करता येईल. तेव्हा देश पारतंत्र्यात होता आणि बंगाल, पंजाबप्रमाणेच महाराष्ट्रात क्रांतिकारकांच्या चळवळींनी जोर धरला होता. लोकमान्य टिळकांची जहाल मतवादी लेखणी जनमानस चेतवत होती आणि त्यांनी सुरू केलेल्या अनेक लोकसंग्राहक उपक्रमांतून लोकसंघटनाचा पाया विस्तारत होता. लोकमान्यांचा ‘केसरी’ अनेक घरांत वाचला जात असे. १ ऑगस्ट १९२०ला लोकमान्यांचं देहावसान झालं तेव्हा भर पावसात भिजत त्यांच्या अन्त्ययात्रेत स्वामी दिवसभर तहानभूक विसरून सहभागी झाले होते. यानंतर लोकमान्यांचा वारसा महात्मा गांधी यांच्याकडे आला तेव्हा अनेक जहाल मतवादी टिळकसमर्थक गांधीजींपासून दुरावले तरी स्वामी मात्र गांधीजींच्या तत्त्वानुसार देशकार्याला लागले. शिक्षण सोडून पावसला परतून त्यांनी ‘स्वावलंबनाश्रम’ काढला. अनेक मुलांना गोळा करून, त्यांच्या शैक्षणिक साहित्याचा भार स्वत:च उचलून त्यांना राष्ट्रीय शिक्षण द्यायला त्यांनी सुरुवात केली. स्वत: सूतकताई करून खादी वापरू लागले तसंच आपल्या घरात चरखे आणून लोकांनाही सूतकताईकडे वळविले. असहकार, खादीचं व्रत आणि राष्ट्रीय शिक्षणाचं बीज कोकणात रुजविण्यासाठी त्यांनी बरीच पायपीटही केली. ब्रिटिशांना विरोध केला म्हणून तुरुंगवासही भोगला. येरवडय़ाच्या तुरुंगातच एसेम जोशी, शंकरराव देव, रावसाहेब पटवर्धन यांच्याशी त्यांची जवळीक निर्माण झाली. त्या काळात स्वामी अनेकदा सहजध्यानात निमग्न असत, त्यामुळे ‘स्वामी’ ही बिरुदावली एसेम, पटवर्धन आदी राजकीय सहकाऱ्यांनीच त्यांना प्रथम बहाल केली होती!
संग्रहित लेख, दिनांक 16th Jan 2014 रोजी प्रकाशित
१२. देशऋण
आपला मुलगा वा मुलगी जर देवाला सोडून कुणा सद्गुरूला भजू लागली, तर आईवडिलांना चिंता वाटते. बरं, सद्गुरू हा देहातीत असतो, देह सोडल्यावरही असतोच, हे खरं.
First published on: 16-01-2014 at 04:36 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaroop chintan country debt