३. पंचारती

ॐ नमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा।। कुणी म्हणेल, ही सद्गुरूंची वंदना कशी आणि का? याचं उत्तर फार दीर्घ आहे,

ॐ नमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा।। कुणी म्हणेल, ही सद्गुरूंची वंदना कशी आणि का? याचं उत्तर फार दीर्घ आहे, पण ते जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे. मुळात ही ज्ञानेश्वरी मला निमित्त करून श्रीसद्गुरूंनीच वदवून घेतली आहे, असं माऊलींनीच सांगितलं आहे. ग्रंथसमाप्तीच्या वेळी माऊली सांगतात, ‘‘वांचूनि पढे ना वाची। ना सेवाही जाणें स्वामीची। ऐसिया मज ग्रंथाची। योग्यता कें असे।। परी साचचि गुरुनाथें। निमित्त करूनि मातें। प्रबंधव्याजें जगातें। रक्षिलें जाणा।। शब्द कैसा घडिजे। प्रमेयीं कैसें पां चढिजे। अळंकारू म्हणिजे। काय तें नेणें।। सायिखडेयाचें बाहुलें। चालवित्या सूत्राचेनि चाले। तैसा मातें दावीत बोले। स्वामी तो माझा।।’’ (अध्याय १८, ओव्या १७६४, १७६५, १७६७ आणि १७६८ / अर्थ- मला लिहिता – वाचता येत नाही. सद्गुरूंची सेवा कशी करायची हेदेखील माहीत नाही, अशा मला ग्रंथ रचण्याची योग्यता कुठून असणार? तरी सद्गुरूंनी मला निमित्त करून या ग्रंथाद्वारे जगाचे रक्षणच केले आहे, असे समजा. शब्दाची घडण कशी होते, प्रमेयांनी प्रतिपाद्य विषय कसा खुलतो, साहित्यातील अलंकार म्हणजे काय, यातलं मला काही माहीत नाही. कळसूत्री बाहुलीला स्वत:हून नाचता येत नाही. तिचा दोर ज्याच्या हाती असतो तोच तिला नाचवत असतो तसं मला पुढे करून माझ्या सद्गुरूंनीच हा ग्रंथ वदवून घेतला आहे!) आता केवळ या ओव्यांतच हा भाव नाही, तर ज्ञानेश्वरीत जिथे जिथे सद्गुरूंचा उल्लेख येतो तिथे तिथे श्रीज्ञानेश्वर महाराजांचा भाव अनावर होतो आणि निवृत्तिनाथांना मग माऊलींना प्रेमानं मुख्य विषयाकडे वळवावं लागतं. तेव्हा, भगवद्गीतेचा अर्थ सामान्यांना कळेल अशा भाषेत सांग, अशी सद्गुरू निवृत्तिनाथांनी आज्ञा केली म्हणून जो वाग्यज्ञ सुरू झाला त्याच्या आरंभी त्यांचंच नमन अत्यंत स्वाभाविक आहे, अटळ आहे. किंबहुना, निवृत्तिनाथांना नमन केल्याशिवाय सुरू होणारा ग्रंथ हा ज्ञानेश्वरी असूच शकत नाही, हे लक्षात ठेवा आपण! त्यामुळे श्रीज्ञानेश्वर महाराजांनी ॐ, आद्या, वेदप्रतिपाद्या, स्वसंवेद्या, आत्मरूपा अशा पाच शब्दांत श्रीसद्गुरूंना जणू पंचारतीच ओवाळली आहे. खरं तर पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं जेव्हा श्रीसद्गुरूचरणी रत होतात आणि अंतरंगात केवळ श्रीसद्गुरूंसाठीचीच आर्तता उरते तेव्हाच खरी पंचारती होते! ती माऊलींनी क्षणोक्षणी केली आहे. तर, ‘ॐ’ हे श्रीसद्गुरूंचंच स्वरूप आहे, हा सद्गुरूंचाच शब्दसंकेत आहे. श्रीगोंदवलेकर महाराज एकदा शिष्यांना म्हणाले, ‘‘अरे ॐकार ॐकार म्हणतात तो मीच आहे!’’ नाथांचं श्रीसद्गुरूनमनही विख्यात आहे, ॐकार स्वरूपा। सद्गुरूसमर्था। अनाथांच्या नाथा। तुज नमो।। यातही ‘स्वप्रकाशरूपा नेणे वेद’ असं सांगून वेदांनाही तुझं स्वरूप आकळत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तर हे ओमकारस्वरूप सद्गुरो तुम्हाला नमन असो, असं प्रथमच सांगून माऊली हा वाग्यज्ञ सुरू करीत आहेत. आणखी एक विशेष असा की हे जसं सद्गुरू निवृत्तिनाथांचं नमन आहे तसंच नाथपरंपरेचे आद्य जे आदिनाथ त्यांचंही स्मरण आहे!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Swroop chintan how to worship