|| जतीन देसाई

सत्ताधारी पक्षाचे राजकारण सर्वसमावेशक, म्हणून सत्तातुर विरोधी पक्ष बहुसंख्याकांमधील कट्टरतावाद्यांना हाताशी धरतो; ‘फेक न्यूज’चा आधार घेऊन हिंसाचार सुरू होतो, हे बांगलादेशात हिंदूंना असुरक्षित करणारे आहे…

गेल्या आठवड्यात दुर्गापूजा सुरू झाल्यापासून बांगलादेशातील अनेक शहरांत हिंदू मंदिरांवर व अल्पसंख्याक हिंदूंवर पूर्वनियोजित हल्ले करण्यात आले. अनेकांची घरे जाळण्यात आली. बांगलादेशात गेली काही वर्षं हिंदूंवर हल्ले होत आहेत. बांगलादेशाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास १० टक्के हिंदू आहेत. त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी हल्लेखोरांवर तत्काळ कारवाई करण्याचा आदेश देऊन म्हटले आहे की हल्लेखोर कुठल्याही धर्माचे असोत त्यांना सोडण्यात येणार नाही. संवेदनशील २२ जिल्ह्यांत बॉर्डर गार्डच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

पूर्वनियोजित कट? 

बांगलादेशात ऑगस्ट महिन्यात खुलना जिल्ह्यात चार मंदिरांवर हल्ले करण्यात आले होते. त्यापूर्वी मार्च महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशाच्या स्वातंत्र्याच्या ५० व्या वर्षाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी ढाकाला गेले असताना हिफाजत-ए-इस्लाम व अन्य काही कट्टर इस्लामी संघटनांनी पूर्व बांगलादेशात एका मंदिरावर हल्ला केला होता व निदर्शने केली होती. अवामी लीगच्या नेतृत्वाखालील सरकारने या हल्ल्यांबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. माहिती व प्रसारणमंत्री हसन महमूद यांनी म्हटले आहे, ‘या हल्ल्यामागे बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टी (बीएनपी) आणि जमात-ए-इस्लामी आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी राजकीय तडजोड करण्यात अपयश आल्याने या संघटनेने कट-कारस्थानाचा मार्ग स्वीकारला आहे. अशा प्रकारचे हल्ले करण्यामागे त्यांचा राजकीय हेतू आहे.’ कोमिला येथे दुर्गापूजासाठी बनवण्यात आलेल्या मंडपात हिंदू देवताच्या मूर्तीच्या पायाशी पवित्र कुराण ठेवण्यात आले असल्याचा आरोप काही धर्मांधांनी केला. असे म्हटले जाते की बीएनपी आणि जमातच्या काही लोकांनी पवित्र कुराण आणून मंडपात मूर्तीच्या पायाजवळ ठेवले, त्याचे लगेच फोटो घेतले आणि पळून गेले. पुढच्या काही मिनिटांतच फोटो व्हायरल करण्यात आले. यातूनदेखील हा पूर्वनियोजित कट असल्याचे स्पष्ट होते. हिंदू समाजावर ईश्वरनिंदेचा आरोप करण्यात आला आणि लगेच मंदिरांवर आणि लोकांवर हल्ले सुरू झाले.

१३ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या हल्ल्यांत नोआखलीचे इस्कॉन मंदिर, रंगपूर जिल्ह्यातील पीरगंज, चितागोंगचे बंसखली मंदिर, कॉक्सबाजारच्या पेकुआ, चांदपूरच्या हाजीगंज, फेनी व इतर काही ठिकाणच्या मंदिरांचा विध्वंस करण्यात आला. बांगलादेशातील हिंदू व इतर अल्पसंख्याक समाजांतील लोकांनी, तसेच अनेक लोकशाहीवादी लोकांनी या विध्वंसाच्या विरोधात निदर्शने केली.

नोआखाली तर भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी येथे मुस्लीम लीगच्या आदेशावरून मुस्लीम समाजाने हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केले होते. ते थांबवून धार्मिक सलोखा कायम राहावा याकरिता महात्मा गांधी तिथे १९४६-४७ मध्ये चार महिने राहिले होते. नंतर फाळणीत नोआखाली पाकिस्तानात (तत्कालीन पूर्व पाकिस्तान) गेले. येथे अजूनही गांधी आश्रम आहे आणि वेगवेगळ्या प्रश्नांवर जवळपासच्या जिल्ह्यांत आश्रमातील कार्यकर्ते काम करतात. यंदाच गांधी जयंतीच्या दिवशी (२ ऑक्टोबर) भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी तिथे गेले होते. नूतनीकरण करण्यात आलेल्या गांधी संग्रहालयाचे उद्घाटन बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री डॉ. ए. के. अब्दुल मोमेन, कायदामंत्री अनीसुल हक आणि दोराईस्वामी यांनी केले. यानंतर दहाच दिवसांनी, नोआखालीच्या इस्कॉन मंदिरावर मूलतत्त्ववाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन भाविकांचा मृत्यू झाला.

भारतातही पडसाद

बांगलादेशातील हिंसेचे पडसाद भारतात उमटणे साहजिकच आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते र्अंरदम बागची यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना नमूद केले आहे, ‘बांगलादेश सरकारने लगेच पावले उचलली. सुरक्षा जवानांना संबंधित भागात पाठवले व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक कारवाई केली.’ भारताचे ढाका येथील उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावास बांगलादेश सरकारच्या सतत संपर्कात आहे. भारताचे बांगलादेशाशी पूर्वापार संबंध आहेत. बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात भारताची खूप मोठी भूमिका होती. वंगबंधू शेख मुजीबुर रहेमान भारताचेही हिरो होते. बांगलादेशचे स्वातंत्र्ययुद्ध सर्वसमावेशक होते. मुस्लीम, हिंदू, बौद्ध व इतर सगळ्या समाजांतील लोक त्यात सहभागी होते. धर्मनिरपेक्ष लोकशाहीचे स्वप्न त्या सर्वांनी पाहिले होते.

आपल्या शेजारील राष्ट्रांपैकी बांगलादेशाशी आपले अधिक घनिष्ठ संबंध आहेत. भारताच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे बांगलादेशात नाराजी असूनदेखील त्याचा संबंधावर परिणाम झालेला नाही. यातूनदेखील भारत व बांगलादेशात किती मजबूत संबंध आहेत हे स्पष्ट होते.

संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) बांगलादेशातील हिंसाचाराला विरोध केला आहे. अल्पसंख्याक हिंदू समाजावरील हल्ले बांगलादेशाच्या राज्यघटनेच्या मूल्यांच्या विरोधात असून शेख हसीना सरकारने त्याची योग्य चौकशी केली पाहिजे, असे यूएनने म्हटले आहे.

सत्ताधारी अवामी लीगचे धोरण सर्वसमावेशक असल्यामुळे माजी पंतप्रधान खालेदा झिया यांच्या नेतृत्वाखालील ‘बीएनपी’ (बांगलादेश नॅशनल पार्टी) आणि जमात-ए-इस्लामी सतत शेख हसीना यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत असतात. बीएनपी आणि जमातमध्ये युती आहे. धर्माचे राजकारण करणे, हा या दोन्ही पक्षांचा अजेंडा आहे. जमातने बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धाला विरोध केला होता आणि पाकिस्तानच्या लष्कराला बंगाली लोकांवर अत्याचार करण्यात मोठ्या प्रमाणात मदत केली होती. देशाच्या विरोधात पाकिस्तानी लष्कराला १९७१ मध्ये मदत केल्याबद्दल जमातच्या काही नेत्यांना हसीना यांच्या सरकारने फाशी दिली आहे. अवामी लीग आणि जमातमध्ये जुने वैमनस्य आहे. कट्टरवादी संघटनांची मदत घेण्याचे बीएनपीचे धोरण आहे. शेख हसीनादेखील काही वेळा कट्टरवाद्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात.

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशात धर्माशी संबंधित काही घडले तर लगेच त्याची प्रतिक्रिया शेजारी देशात उमटते. बांगलादेशात हिंदू मंदिरे आणि लोकांवर होणाऱ्या हल्ल्याची प्रतिक्रिया भारतात आणि त्यातही पश्चिम बंगालमध्ये अधिक व्यक्त होत आहे. ‘बांगलादेशात होत असलेल्या हिंसाचारासंदर्भात मूक प्रेक्षक बनण्याऐवजी केंद्र सरकारने प्रभावी भूमिका पार पाडावी,’ असा आग्रह तृणमूल काँग्रेसने मांडला आहे. तर भाजपने पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी मोर्चे काढून बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत असल्याचे म्हटले आहे. भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेता सुवेन्दू अधिकारी यांनी कोलकाता येथे बांगलादेशच्या उपउच्चायुक्तांची भेट घेऊन, हिंसाचाराबद्दल नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानात एखाद्या हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात येतो तेव्हा स्वाभाविकपणे भारतात त्याची प्रतिक्रिया व्यक्त होते. तसेच भारतात एखाद्या मशिदीवर हल्ला झाल्यास त्याची पाकिस्तानात प्रतिक्रिया उमटते. या सगळ्याचा गंभीरपणे विचार व्हायला पाहिजे.

बांगलादेशी जनतेचा विरोध

बांगलादेशची संस्कृती ही सर्वसमावेशक बंगाली संस्कृती आहे. लोकांना धर्मापेक्षा बंगाली भाषा, बंगाली संस्कृती अधिक महत्त्वाची वाटत असल्यामुळेच पूर्व पाकिस्तानचा बांगलादेश झाला. बांगलादेशाचे राष्ट्रगीतही रवींद्रनाथ टागोरांचं ‘आमार सोनार बांगला…’ आहे. बांगलादेशात सर्वत्र रवींद्र संगीत ऐकायला मिळतं. पुरोगामी चळवळीच्या इतिहासामुळे सामान्य हिंदू आणि मुस्लिमांमध्ये चांगले संबंध आहेत. हिंदू मंदिरांवरील हल्ल्याच्या विरोधात मोठ्या संख्येने मुस्लीम समाजातील लोक बोलत आहेत आणि रस्त्यावर उतरून अतिरेकी संघटनांचा विरोध करत आहेत. काही दहशतवादी संघटनाही बांगलादेशात सक्रिय आहेत. पण त्यांना लोकांचा पाठिंबा मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अल्पसंख्याकांवर अन्याय होणार नाही आणि त्यांना विकासाची समान संधी मिळेल

हे पाहण्याची जबाबदारी जशी सरकारची आहे तशीच बहुसंख्याक समाजातील लोकांचीदेखील आहे.

लेखक ज्येष्ठ पत्रकार असून भारतीय उपखंडातील

शांततेसाठी लोकसंघटनात सक्रिय आहेत.

jatindesai123@gmail.com