दादाजी खोब्रागडे

 दादाजींना स्वत:ची तीन एकर शेती मुलाच्या आजारपणात विकावी लागली.

दादाजी खोब्रागडे

शिक्षण जेमतेम तिसरीपर्यंत, शेतीही अवघी दीड एकर, घरात गरिबीच, तरीही त्यासमोर हात न टेकता तांदळाची तब्बल नऊ वाणे विकसित करणारे दादाजी खोब्रागडे खऱ्या अर्थाने ग्रामीण संशोधक होते. चंद्रपूर जिल्ह्य़ातील नागभीडजवळ थोडे आडवळणावर असलेले नांदेड हे त्यांचे गाव. आज तांदळाच्या वाणांच्या व्यवहारात या गावाचा प्रचंड दबदबा आहे. संशोधनासाठी लागणारे अनुकूल वातावरण हाताशी नसताना दादाजींनी १९८३ पासून नवे वाण विकसित करायला सुरुवात केली. तांदळाची एकेक ओंबी गोळा करत त्यांनी बीजगुणन सुरू केले व या नव्या वाणाचा प्रयोग झाला तो तब्बल सहा वर्षांनी. या वाणाला नाव काय द्यायचे हे दादाजींना कळेना. अखेर हाताला बांधलेल्या एचएमटी घडय़ाळाचे नाव या वाणाला दिले! तिथून या वाणाचा प्रवास जो सुरू झाला तो नऊ वाणांच्या निर्मितीनंतरच थांबला.

दादाजींना स्वत:ची तीन एकर शेती मुलाच्या आजारपणात विकावी लागली. आता संशोधन कसे करायचे, असा प्रश्न उभा ठाकला तेव्हा सुनेच्या वडिलांनी दीड एकराचा तुकडा त्यांना दिला. तोच त्यांच्या संशोधनाला शेवटपर्यंत साथ देत राहिला. नंतरच्या दशकात दादाजींचे नाव तांदूळ पीक उत्पादकांच्या वर्तुळात लोकप्रिय झाले. तेव्हा कृषी विद्यापीठाचे लक्ष त्यांच्याकडे गेले. तेथील सुटाबुटातल्या शास्त्रज्ञांनी दादाजींचे वाण अक्षरश: चोरले व सोना एचएमटी नावाने बाजारात आणले. तक्रार करणे, पाठपुरावा करणे हे दादाजींच्या स्वभावात नसल्याने ते गप्प राहिले. पुढे या चोरीचा गवगवा होऊनही शासनाने लक्ष दिले नाही. २०१० मध्ये फोर्ब्सच्या यादीत त्यांचे नाव झळकले तेव्हा कुठे दादाजी संशोधक असल्याचा साक्षात्कार झाला. राज्य सरकारने त्यांचा गावात जाऊन गौरव केला. संशोधनासाठी दोन एकर शेती दिली. देशातल्या अनेक व्यासपीठांवर त्यांना निमंत्रित केले जाऊ लागले.

केवळ स्तुतीने पोट भरत नाही व संशोधनही होत नाही. त्यासाठी आर्थिक रसद पुरवावी लागते. ती मात्र कुणी पुरवली नाही व दादाजी शेवटपर्यंत आर्थिक अडचणींत राहिले. अशाच अवस्थेत त्यांनी शासनाने कृषिभूषण सन्मान देताना दिलेले सुवर्णपदक विकायला काढले तेव्हा ते नकली असल्याचे लक्षात आले. पुन्हा गदारोळ झाला. शासनाने दुसरे पदक त्यांच्या घरी पोहोचविले. केवळ सरकारी यंत्रणाच नाही तर तांदळाची वाणे विकणाऱ्या कंपन्यांनीसुद्धा दादाजींच्या वाणांना कधी वेगवेगळी नावे देऊन त्यांच्या विक्रीचा सपाटा सुरूच ठेवला. दादाजींना पक्षाघात झाल्यानंतर उपचारांसाठी शेतकऱ्यांनी सहा लाख रुपये गोळा केले. नंतर सरकारला जाग आली व दोन लाख दिले. शेवटी डॉ. अभय बंगांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्याच शोधग्राममध्ये दादाजींनी रविवारी अखेरचा श्वास घेतला.

बाजारात असो वा शेतात, तांदळाचे वाण बघून ते पिकेल की नाही यावर भाष्य करणारा हजारो शेतकऱ्यांचा भविष्यवेत्ताच आता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dadaji khobragade

ताज्या बातम्या