पाकिस्तान्यांना धूळ चारून जिंकलेल्या बांगलादेश युद्धाची चर्चा व काहीशी झिंगसुद्धा त्यानंतरच्या सुमारे वर्षभरात कायम राहिलेली असतानाच, १९७२ सालच्या डॉ. आंबेडकर जयंतीला चंबळच्या खोऱ्यातील ४५० डाकूंनी महात्मा गांधी यांच्या तसबिरीपुढे शस्त्रत्याग केला! कबूल की, १९५५ सालच्या दिलीपकुमारच्या ‘आझाद’पासून ते ‘मदर इंडिया’ (१९५७), ‘जिस देश मे गंगा बहती है’ (१९६०), ‘मुझे जीने दो’ (१९६३) अशा कित्येक हिंदी सिनेमांनी ‘डाकू चांगलेही असू शकतात- त्यांचे हृदयपरिवर्तन घडू शकते’ हेच दाखवले होते; पण खऱ्याखुऱ्या डाकूंचे हे मनपरिवर्तन- आणि पर्यायाने व्यवसायात बदलसुद्धा- घडवण्यामागे १९५४ सालापासून एस. एन. सुब्बाराव यांनी केलेले प्रयत्न होते. १९७० सालापासून तर राजस्थान, उत्तर प्रदेश ते मध्य प्रदेश या राज्यांतले अख्खे चंबळ खोरे कधी उंटावरून तर कधी पायी फिरून सुब्बाराव यांनी पिंजून काढले होते. पुढे एकंदर ६५७ डाकू तीन राज्यांतून शरण आले.

या एस. एन. (सेलम नंजुन्दैया) सुब्बाराव यांचे निधन २७ ऑक्टोबर रोजी, वयाच्या ९२ व्या वर्षी जयपूरमधील रुग्णालयात झाले. मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्यात जौरा येथे म. गांधी सेवा आश्रमाची स्थापना १९७० मध्ये सुब्बाराव यांनी केली, त्याआधी वयाच्या १३ व्या वर्षीच १९४२ च्या आंदोलनात त्यांनी उडी घेतली होती. धारवाडचे गांधीवादी व ‘काँग्रेस सेवा दला’चे संस्थापक डॉ. एन. एस. हर्डीकर यांचे मार्गदर्शन मूळचे बंगलोरच्या सुब्बारावना मिळाल्याने तरुणपणीच ते विधायक कार्याकडे वळले. १९४८ पासून आधी काँग्रेस सेवा दलातर्फे, तर पुढे ‘गांधी पीस फाउंडेशन’, ‘नॅशनल यूथ प्रोजेक्ट’ आदी संस्थांतून ते कार्यरत राहिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९६५ मध्ये, गांधी जन्मशताब्दीच्या चार वर्षे आधी, देशभर फिरणाऱ्या ‘गांधीदर्शन रेल’ची कल्पना त्यांनी मांडली. मग जन्मशताब्दी वर्षांत (१९६९) दोन रेल्वे गाडय़ा- एक ब्रॉडगेज तर दुसरी मीटरगेज मार्गावर- तत्कालीन दृक् -श्राव्य माध्यमांनिशी सज्ज होऊन देशभर फिरल्या! या प्रकल्पाचे संचालकपद सुब्बाराव यांना मिळाले. दिल्ली सोडून दूरच्या मुरैना जिल्ह्यात ते पहिल्यांदा आले होते १९५४ मध्येच, पण तरुणांसाठी श्रमदान आणि रोजगाराभिमुख शिक्षणाची शिबिरे घ्यावीत, डाकूंकडे स्थानिक तरुणांनी आकर्षित होऊ नये असे पाहावे, या प्रकारचे ते काम होते. तेव्हाही डाकूंच्या पुनर्वसनाची कल्पना होतीच, पण वेग आला १९७० नंतर. पुढे श्रमदानावर लक्ष केंद्रित करून सुब्बाराव यांनी या भागात रस्तेही केले! साने गुरुजी पुरस्कार (२००१), जमनालाल बजाज पुरस्कार (२००६) यांनी उत्तरायुष्यात त्यांचा गौरव झाला.