नवनीतभाई शहा

पालघर व परिसरातील वंचितांना न्याय मिळवून देणे हा एकच ध्यास त्यांनी ५० ते ६० वर्षे जपला.

पालघर व परिसरातील वंचितांना न्याय मिळवून देणे हा एकच ध्यास त्यांनी ५० ते ६० वर्षे जपला. राजकारणी म्हणून त्यांचे कौशल्य सिद्ध झालेले असून, स्वत:ला या परिसरात जणू गाडून घेतले. समाजवादी विचारसरणीवर निष्ठा असलेल्या या मार्गदर्शकाने विधायक राजकारणाद्वारे समाजातील सामान्य घटकापर्यंत आपली ओळख पोहोचवली. ‘नवनीतभाई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ज्येष्ठ नेत्याचे २६ ऑगस्ट रोजी निधन झाले.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ानंतर आमदारकीची प्रभावी राजकीय कारकीर्द आरक्षणामुळे संपुष्टात आली, मात्र या लोकनेत्याने नागरिकांचे कल्याण करण्यासाठी पक्षभेद बाजूला ठेवून समाजकारणाचा व पत्रकारितेचा ध्यास कायम ठेवला. सातपाटीला मासेमारी बंदर व्हावे, मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी, मच्छीमार साहित्यावर विक्रीकर माफी मिळवून देण्यास त्याचप्रमाणे दारूबंदी धोरणाअंतर्गत गरीब जनता श्रमपरिहारासाठी सेवन करणाऱ्या ताडीवर विक्रीकर निर्बंध काढून टाकण्याच्या कामी नवनीतभाईंचे योगदान होते. रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनांत सहभाग घेतला. सहकार, शेती व आदिवासींच्या समस्या सोडविण्यासह, समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले.

केंद्र शासनाने सुरू केलेल्या खासदार निधी योजनेला दिवंगत ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी, निवृत्त कुलगुरू प्रा. राम जोशी यांच्यासह नवनीतभाईंनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आंदोलनांतही ते वेळोवेळी सहभागी झाले. सूर्या पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करून पालघर-डहाणू भागातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा; प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होण्यापूर्वी वसई-विरार व इतरत्र सूर्याचे पाणी दिले जाऊ नये यासाठी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली होती. ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करून पालघरला नवीन जिल्ह्य़ाचे मुख्यालय व्हावे, यासाठीही ते आंदोलनात उतरले. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, तारापूर औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण व इतर नागरी समस्या यांना ‘पालघर मित्र’ साप्ताहिकातून त्यांनी वाचा फोडली. पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयासाठी २१ एकर शासकीय जागा मिळवून देण्यामागे त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. युवकांना घडवण्यासाठी व तंदुरुस्त राहण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले.

पंचाहत्तरीनंतर सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेऊनही, पंचायतराज व्यवस्था व व्यवस्थेच्या विविध पलूंवर अभ्यासपूर्ण लिखाण केले. पंचायतराज मासिकातून नियमित लिखाण करून ७३व्या घटनादुरुस्तीविषयक विस्तृत लेखन अनेक वृत्तपत्रांतून केले. डॉ. पी.व्ही. मंडलिक ट्रस्टतर्फे चालणाऱ्या पंचायतराज लोकशिक्षण कार्यात ते सक्रियपणे सहभागी असत. सामाजिक वनीकरण, जलसंवर्धन व परसबाग योजना राबवण्यासाठी १९८२ मध्ये त्यांनी ‘नीरिड’ संस्थेची स्थापना केली. समाजवादी महिला सभा या संस्थेच्या अनौपचारिक शिक्षण प्रकल्पाशी ते संबंधित होते.

श्रीमंत व्यापारी कुटुंबात जन्मलेल्या या लोकनेत्याची अखेपर्यंत राहणी साधी, तर स्मरणशक्ती तल्लख राहिली. वाचनाची ओढ व समाजप्रबोधनाचा ध्यास हे गांधीवादी स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचे गुण समाजकारणात सक्रिय राहताना त्यांनी जपले. सत्तेपासून दूर राहण्याचा पिंड जोपासणाऱ्या या लोकनेत्याला जनसामान्यांचे उदंड प्रेम लाभले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Socialist leader and former palghar mla navnitbhai shah profile zws

Next Story
राजेंद्र धवन
ताज्या बातम्या