22 September 2020

News Flash

भांडवल वापरावे जपून!

स्टार्टअप उद्योगासाठी भांडवल उभे करणे हे जितके कष्टाचे काम असते तितकेच महत्त्वाचे असते ते पशांचे नियोजन.

आíथक स्वयंशिस्त बाणवल्यास आणि काटेकोर नियोजन केल्यास मर्यादित भांडवलाच्या बळावर अडचणीच्या काळातही उद्योग सुरू ठेवता येतो..
चार तरुण मित्र. कॉर्पोरेट जगात नोकरी करणारे. स्वत:च्या दैनंदिन आयुष्यात व्यस्त असणारे. त्यांपकी एक त्याच्या नोकरीत समाधानी नसतो. त्याच्या डोक्यात स्टार्टअप बिझनेस सुरू करण्याचा विचार येतो. मात्र तो उद्योग कोणता असावा, उद्योग सुरू करण्यासाठी भांडवल कसे उभे करावे, टीम कशी बांधावी याचे विचारचक्र सुरू असते. अर्थात त्याला आपल्या मित्रांची आठवण येते आणि त्यांना उद्योग सुरू करण्याविषयी राजी करतो. बऱ्याच विचाराअंती चौघंही एकत्र येतात आणि एक नवीन प्रवास सुरू होतो. उद्योगाच्या भांडवलाचा जेव्हा विचार येतो तेव्हा त्यांना खऱ्या परिस्थितीची जाणीव होते, कारण आतापर्यंत सुखासीन जीवनशैलीची सवय असलेल्या त्यांना मोठय़ा प्रमाणावर स्वतच्या खर्चावर आळा घालावा लागतो. अगदी लहानसहान गोष्टींसाठी किती खर्च येतो, ते एका फळ्यावर लिहून त्यातील अत्यावश्यक बाबी वगळता आपण किती पसे वाचवू शकतो, याचा ते अंदाज घेतात. हॉटेिलग, इंटरनेट बिल, प्रवास इत्यादी गोष्टींमध्ये कसे पसे वाचतील, किती शिल्लक राहतील याचा ते ताळेबंद मांडतात. आपल्या टीममध्ये कोणी तज्ज्ञ घेतला तर त्याचा पगार आपल्याला देणं परवडेल का? त्यापेक्षा एखादा नवखा, होतकरू तरुण विद्यार्थी ‘इंटर्न’ म्हणून घ्यायचा का? यांसारख्या अनेक प्रश्नांचा ते विचार करतात. ‘टीव्हीएफ पिचर’ या गाजलेल्या यूटय़ूब मालिकेमधील हे प्रसंग आहेत. स्टार्टअप उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांची गोष्ट सांगणारी ही मनोरंजनात्मक वेबमालिका होती. स्टार्टअप सुरू करण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते आणि विशेषत: पशांबाबतीत किती काटेकोर असावे लागते, हे वरील वर्णनावरून लक्षात आलेच असेल.
स्टार्टअप उद्योगासाठी भांडवल उभे करणे हे जितके कष्टाचे काम असते तितकेच महत्त्वाचे असते ते पशांचे नियोजन. म्हणूनच उद्योग सुरू केल्यानंतरही पशांच्या आघाडीवर सतर्क असणे आवश्यक असते. आपल्याला अपेक्षित असलेलं भांडवल सुरुवातीला खात्रीशीररीत्या मिळेलच असे नाही. बऱ्याचदा स्वकष्टार्जति पुंजी, घर गहाण ठेवणे यांसारख्या अनेक मार्गानी उद्योजकांनी भांडवल उभे केल्याची उदाहरणे सापडतील. देबयानी घोष (नाव बदलले आहे) या अशांपकीच एक. तंत्रज्ञानाशी संबंधित उद्योगासाठी भांडवल मिळवताना तत्कालीन जागतिक मंदीमुळे अडचणी आल्या तेव्हा त्यांना स्वतचे घर गहाण ठेवावे लागले. यावरून एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा की, ज्या वेळी भांडवल अपुरे असते किंवा साधने मर्यादित असतात, त्या वेळी लहानसहान उपाय करून उद्योगचक्र फिरते ठेवता येते. ते कठीण असते, पण अशक्य मुळीच नसते.
नियंत्रित खर्च
उद्योग सुरू करताना आणि तो केल्यावर काही बाबी कटाक्षाने पाळायला हव्यात, त्यातील एक म्हणजे खर्चावर नियंत्रण. अनेकदा अनावश्यक किंवा किरकोळ बाबींवर खूप खर्च होतो. उदाहरणार्थ ऑफिस स्टेशनरी, कागद यांचा अनेकदा दुरुपयोग होताना दिसतो. हे सगळे साहित्य खूप महाग किंवा ब्रँडेड असण्याची काही गरज नसते. अगदी कमी खर्चात स्वस्त तरीही उपयुक्त साहित्य वापरून काम करता येते. त्यामुळे ब्रँडेड गोष्टीचा सोस न करता कमीतकमी साहित्यातही गरज भागते. काही स्टार्टअप कंपनीज् ‘िब्रग युअर ओन डिव्हाइस’ (स्वतचे साहित्य / उपकरण स्वतच आणा.) हे तंत्र वापरतात. कारण अगदी सुरुवातीला आपल्या टीमला आवश्यक ती सगळीच उपकरणे, साधनसामुग्री देता येईलच असे नाही. अशा वेळी स्वतचा लॅपटॉप, स्टेशनरी, इ. वापरणे क्रमप्राप्त असते.
वेतन, मानधनाचा मेळ
कुशल मनुष्यबळ हासुद्धा उद्योगाच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा घटक आहे. मात्र त्यासाठी पसे मोजावेच लागतात. आपल्या टीममध्ये कोण असावे, त्यांच्या पगाराचा किंवा मानधनाचा मेळ कसा साधावा, याची खबरदारी घ्यावी लागते. उद्योगाच्या गरजेनुसार कामासाठी प्रत्यक्ष किती माणसे योजावीत, त्यांना कंत्राटी तत्त्वावर ठेवावे का, त्यांचे मानधन हे उद्योगातून होणाऱ्या फायद्याच्या आधारे असावे की सुरुवातीपासून त्यांना पगार द्यावा, यांसारख्या अनेक प्रश्नांचा विचार स्टार्टअप उद्योजकाला करावा लागतो. उद्योगाच्या पायाभरणीपासूनच एखाद्या तज्ज्ञाची, उद्योग सल्लागाराची आवश्यकता भासू शकते. कायदेशीर आणि आíथक बाबींमध्ये तर तज्ज्ञाची मदतच होते. उद्योगाची वाढ आणि विकासासाठी तज्ज्ञाची मदत घेणेही तितकेच आवश्यक असते. तेव्हा त्यांच्या मानधनाचा योग्य तो विचार करावा लागतो.
वृद्धी आणि नफा यांचा समतोल
उद्योगाचे अस्तित्व आणि गुंतवणूकदारांचे स्वारस्य टिकवण्यासाठी उद्योगाची वृद्धी होणे आणि त्यातून अपेक्षित नफा मिळणेही तितकेच आवश्यक असते. नफा मिळवणे हे कुठल्याही उद्योगाचे मुख्य उद्दिष्ट असते. उत्पादन, विपणन यांच्यावर झालेला खर्च वगळून अपेक्षित विक्रीनंतर झालेला नफा पुन्हा त्या उद्योगाच्या वाढीसाठीही गुंतवता येतो आणि म्हणूनच स्टार्टअप उद्योजकांनी व्यवसायवृद्धीसोबतच फायद्याकडेही लक्ष द्यावे. उदाहरणार्थ उत्पादनाची मोठय़ा संख्येने विक्री झाली हे जरी चांगले असले तरी त्या विक्रीतून फायदा किती मिळाला हे पाहणेही आवश्यक आहे. उत्पादनाची विक्री मोठय़ा संख्येने होऊनही जर अपेक्षित फायदा मिळत नसेल तर त्यामागची नेमकी कारणे शोधली गेली पाहिजेत. जे उद्योग अद्याप बाल्यावस्थेत म्हणजे स्टार्टअप फेजमध्ये आहेत त्यांनी सुरुवातीपासून नफ्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, कारण चांगला नफा मिळाल्यास उद्योगाचा विस्तार करण्यास आíथक बळ मिळते.
अन्य स्टार्टअप्सची मदत
बाजारपेठेत अनेक स्टार्टअप उद्योग सुरू होतात आणि प्रत्येकाला त्याचा लक्ष्य ग्राहक त्यांच्याकडे वळवायचा असतो. अशा वेळी एका स्टार्टअपची गरज ही दुसऱ्या स्टार्टअपसाठी संधी असू शकते, हे लक्षात घेत काम केल्यास दोघांनाही फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ ‘अ’ या स्टार्टअपला त्याचे उत्पादन बाजारपेठेत पोहोचवायचे आहे, मात्र त्यासाठी त्याच्याकडे खाजगी वाहतूक सुविधा नाही. दळणवळण सेवा पुरविणाऱ्या अनेक मोठय़ा कंपन्यांचा पर्याय ‘अ’साठी सध्या आíथकदृष्टय़ा परवडणारा नाही. त्याच वेळी ‘ब’ने किफायतशीर दरात दळणवळण सेवा पुरवण्याचा स्टार्टअप सुरू केला आहे. या परिस्थितीत ‘अ’ची गरज ‘ब’ सहज भागवू शकतो आणि त्याचा दोघांनाही आíथकदृष्टय़ा फायदा होऊ शकतो. म्हणजेच एक स्टार्टअप दुसऱ्या स्टार्टअपचा सेवा पुरवठादार होऊ शकतो. यामुळे खर्चातसुद्धा बचत होते.
थोडक्यात काय तर भांडवल हे उद्योगाचे इंधन असल्याने ते नियोजनपूर्वकच वापरले गेले पाहिजे. अनावश्यक खर्चाला सुरुवातीपासून आळा बसला तर अडचणीच्या परिस्थितीतही उद्योग तग धरू शकतो आणि पुढे भरभराटीच्या काळातही उधळण न करण्याचा धडा यातून मिळतो.
response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2016 12:58 am

Web Title: how to use of limited capital
Next Stories
1 ‘आद्या’चा नाजूक ठसा
2 स्टार्ट अपचे इंधन
3 कल्पना प्रत्यक्षात आणण्यापूर्वी…
Just Now!
X