24 September 2020

News Flash

रंगीबेरंगी सिमला मिरची

हिरवा, पिवळा आणि लाल.. रस्त्यावरच्या सिग्नलचे रंग!

हिरवा, पिवळा आणि लाल.. रस्त्यावरच्या सिग्नलचे रंग! पण आपण या रंगांना आज आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. ‘क’ जीवनसत्त्व फारच विपुल प्रमाणात असलेली सिमला मिरची किंवा भोपळी मिरची; हल्ली हिरव्या, पिवळ्या किंवा लाल रंगांमध्ये भाजीबाजारात अवतरलेली आपण पाहतो. लालबुंद किंवा पिवळीधमक सिमला मिरची, हिरव्या गर्द मिरचीपेक्षा खूपच आकर्षक दिसते. पण या रंगीबेरंगी मिरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या असतात की एकाच प्रकारच्या मिरचीचे रंगीत भाऊबंद असतात? त्यांच्यातली पोषणद्रव्ये सारखीच असतात की वेगवेगळी?

बाजारात ज्या रंगीत सिमला मिरची उपलब्ध असतात, त्या एका ठरावीक जातीच्या सिमला मिरचीचीच रूपं असतात. जसजशी सिमला मिरची पिकत जाते तसतशी ती पिवळ्या रंगाची होत हळूहळू लाल रंगाची होते. पिकत गेलेल्या मिरचीच्या चवीत अर्थातच फरक पडत जातो. हिरवी मिरची थोडीशी कडवट असते तर पिवळी तिच्यापेक्षा जरा गोड! लाल सिमला मिरची तर तिच्या पिवळ्या किंवा हिरव्या रूपापेक्षा जास्तच गोड असते. पण त्यामुळे लाल मिरचीला कीड लागण्याची जास्त भीती असते; त्यामुळे भाजी पिकवणाऱ्याला हिरवी मिरची लाल होईपर्यंत पिकाची खूप काळजी घ्यावी लागते. त्यातच हिरव्या मिरच्या झाडावरून काढून बाजारात पटकन विक्रीला आणता येतात तर हिरव्या मिरचीला झाडावरच पिवळी किंवा लाल होऊ द्यायला बराच वेळ द्यावा लागतो. या कारणामुळेच तर लाल सिमला मिरच्या, तिच्या हिरव्या सख्यांपेक्षा जास्त महाग असतात.

पोषणद्रव्यांच्या दृष्टीने म्हणाल तर या मिरच्यांमध्ये फारसा फरक नाही. पण नाही म्हणायला लाल सिमला मिरचीमध्ये, हिरव्या सिमला मिरचीपेक्षा जवळजवळ दुप्पट प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असतं. अर्थात असंही कुठल्याही सिमला मिरचीमध्ये मुबलक ‘क’ जीवनसत्त्व असतं, तेव्हा हिरवी सिमला मिरची खाऊनही आपल्याला आवश्यक तेवढं ‘क’ जीवनसत्त्व मिळत असतंच. लाल सिमला मिरचीविषयी आणखीही एक महत्त्वाची बाब म्हणजे तिच्यात अगदी भरपूर प्रमाणात असलेलं बीटा-कॅरोटीन! कर्करोगासारख्या विकाराला प्रतिबंध करायला मदत करणारं बीटा-कॅरोटिन, सर्व प्रकारच्या आणि रंगांच्या सिमला मिरच्यांमध्ये असतंच. पण हिरव्या मिरचीच्या तुलनेत, ते लाल मिरचीमध्ये साधारणपणे नऊपट जास्त असतं.

याचा अर्थ नेहमी लाल सिमला मिरचीच खावी असं काही नाही. कोणतीही सिमला मिरची आपल्याला आवश्यक असलेली पोषणद्रव्ये सहजी उपलब्ध करून देते. पण हिरव्याची लाल होताना तिच्यात आपल्याला हितकारी असे काही रासायनिक बदल घडतात हे नक्की!

– डॉ. मानसी राजाध्यक्ष

manasi.milind@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 3:31 am

Web Title: articles in marathi on kitchen science experiments part 3
Next Stories
1 कोबी-द्वय!
2 पौष्टिक गव्हाचं पीठ
3 ‘बत्तीस वेळा चर्वण’!
Just Now!
X