News Flash

बॅटरी वापरा जपून..

स्मार्टफोनमधील बॅटरीच्या या समस्येला उत्तर म्हणून अनेक जण आता पोर्टेबल चार्जर खिशात घेऊन फिरतात.

एखाद्या स्मार्टफोनची बॅटरी पूर्णपणे चार्ज केल्यानंतर तो फोन किती काळ व्यवस्थित काम करू शकतो, याचे उत्तर प्रत्येक वापरकर्ता आणि प्रत्येक स्मार्टफोननुसार वेगवेगळे असू शकेल. मात्र, स्मार्टफोनचा सरासरी वापर लक्षात घेता, दिवसातून दोनदा तरी बॅटरी चार्ज करण्याची वेळ आपल्यावर ओढवते. जुन्या मोबाइलचं पाहायला गेलं तर नोकियाच्या साध्या मोबाइलची बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केली तरी दिवसेंदिवस चालायची. परंतु, विविध अ‍ॅप्स आणि सोशल मीडिया यांमुळे स्मार्टफोनचा वापर वाढल्यामुळे बॅटरी लवकर संपण्याचा अनुभव प्रत्येकालाच येतो. सर्वसाधारणपणे स्मार्टफोन दिवसातून दोनदा चार्ज करावा लागतोच. परंतु, त्यापेक्षा जास्त वेळा तुमचा स्मार्टफोन चार्ज करावा लागत असल्यास त्याची बॅटरी कमकुवत आहे, हे समजून चला.

स्मार्टफोनमधील बॅटरीच्या या समस्येला उत्तर म्हणून अनेक जण आता पोर्टेबल चार्जर खिशात घेऊन फिरतात. ऐन वेळी फोनची बॅटरी उतरून तो बंद होऊ नये, यासाठी हा पर्याय योग्यच आहे. परंतु, त्याचबरोबर तुम्ही स्मार्टफोनची बॅटरी चार्जविना जास्तीत जास्त वेळ टिकवून ठेवू शकता. यासाठी काय करता येईल, हे सांगणाऱ्या काही टिप्स :

जीपीएस बंद ठेवा – अँड्रॉइड फोन किंवा आयफोनवर सर्वाधिक बॅटरीचा वापर ‘जीपीएस’ यंत्रणेकडून केला जातो. ‘जीपीएस’ यंत्रणा तुमचे ‘लोकेशन’ निश्चित करते. या सुविधेचा वापर एखाद्या ठिकाणचा पत्ता, तेथे जाण्याचा मार्ग शोधण्यात याशिवाय अन्य काही अ‍ॅप्सच्या वापराकरिता होत असतो. त्यामुळे अनेक मोबाइलमध्ये ‘जीपीएस’ नेहमीच ‘ऑन’ असते. परंतु, तुम्हाला या सुविधा वापरायच्या नसतील तेव्हा, ‘जीपीएस’ बंद करा. ‘जीपीएस’चा ‘आयकॉन’ अनेकदा स्मार्टफोनच्या वरच्या भागात असतो. तुम्ही तेथे क्लिक करून किंवा फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन ‘जीपीएस’ बंद करू शकता. यामुळे तुमच्या मोबाइलची बॅटरी किमान दोन ते तीन तास जास्त कार्यरत राहू शकते. तुम्हाला जेव्हा ‘जीपीएस’ची गरज लागेल तेव्हा ते तुम्ही पुन्हा सुरू करू शकता.

मोबाइल डेटापेक्षा ‘वायफाय’ बरे – स्मार्टफोनच्या बॅटरीचा जास्त वापर इंटरनेटमुळेही होत असतो. त्यातही मोबाइल कंपनीच्या डेटावापरामुळे बॅटरी लवकर संपते. याचे प्रमुख कारण म्हणजे आजही आपल्या देशात अनेक भागांमध्ये नेटवर्क चांगल्या दर्जाचे नसते. त्यामुळे व्यवस्थित नेटवर्क सिग्नल पकडण्यासाठी स्मार्टफोनला जादा शक्ती खर्च करावी लागते. साहजिकच त्यासाठी बॅटरीचा अधिक वापर होतो व ती लवकर संपते. यावर उपाय म्हणजे ‘वायफाय’. तुम्हाला शक्य असेल त्या ठिकाणी ‘वायफाय’चा वापर करा. विशेषत: घरी किंवा कार्यालयात असताना तुम्ही तुमचा मोबाइल ‘वायफाय’वर सक्रिय करू शकता.

थोडासा अंधूक ‘डिस्प्ले’ चालेल – मोबाइलवरील ‘ब्राइटनेस’ जितका जास्त तितक्या जास्त वेगाने बॅटरी संपते. त्यामुळे हे टाळण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे स्मार्टफोनचा ‘ब्राइटनेस’ नेहमी ‘ऑटो मोड’वरच ठेवा. ‘ऑटो मोड’मध्ये ‘ब्राइटनेस’ ठेवल्यास वातावरणातील प्रकाशानुसार स्मार्टफोनचा डिस्प्ले कमी-अधिक प्रकाश सोडतो. त्यामुळे तुमच्या डोळय़ांना त्रासही होत नाही आणि बॅटरीही योग्यरीत्या वापरली जाते.

फेसबुकचा नियंत्रित वापर – आजकाल प्रत्येक स्मार्टफोनमध्ये फेसबुकचे अ‍ॅप असते आणि त्याचा वेळोवेळी वापरही होत असतो. फेसबुक केवळ सुरू असतानाच नव्हे तर, बाकीच्या वेळीही कार्यरत असते. त्यातूनच तुम्हाला ‘फेसबुक’वरील अपडेटच्या ‘नोटिफिकेशन’ येत असतात. यासाठी फेसबुक पाश्र्वभूमीवर सदैव सुरूच असते. त्यामुळे हे अ‍ॅप बॅटरीचा भरपूर वापर करते. अर्थात केवळ यासाठी कोणी फेसबुक वापरणे बंद करू शकत नाही. परंतु, त्याच वापर मर्यादित जरूर करू शकतो. यासाठी फेसबुकवरील ‘नोटिफिकेशन’चा पर्याय बंद ठेवा. तुम्ही ‘फेसबुक लाइट’हे अ‍ॅपदेखील वापरू शकता. हे अ‍ॅप फेसबुकसारखेच असते. परंतु, ते डेटा आणि बॅटरी यांचा कमी वापर करते.

‘वीजखाऊ’ अ‍ॅपपासून सावधान –

स्मार्टफोन म्हटलं की अ‍ॅप्स आलेच. अनेकदा आपण केवळ हौस म्हणून किंवा क्षणिक गरज म्हणून एखादे अ‍ॅप डाउनलोड व इन्स्टॉल करतो आणि मग ते विसरूनही जातो. परंतु, अनेक अ‍ॅप चालू नसतानाही पाश्र्वभूमीवर (बॅकग्राऊंड) काम करत असतात. असे अ‍ॅप आपल्या नकळत फोनची बॅटरी वापरत असतात. त्यामुळे आपल्याला कळतही नाही की आपल्या फोनची बॅटरी इतक्या लगेच कशी संपते. तुम्हाला अशा प्रकारची समस्या जाणवत असेल तर सर्वप्रथम तुमच्या मोबाइलमधील अनावश्यक आणि जास्त बॅटरी वापरणारे अ‍ॅप हटवून द्या. कोणते अ‍ॅप जास्त बॅटरी वापरत आहेत, हे तुम्हाला सहज कळू शकते. त्यासाठी मोबाइलच्या ‘सेटिंग’मध्ये जाऊन ‘बॅटरी’वर क्लिक करा. तेथे तुम्हाला प्रत्येक अ‍ॅपनुसार बॅटरीचा वापर किती ते समजू शकेल. या माहितीचा फायदा घेऊन तुम्ही ‘वीजखाऊ’ अ‍ॅप मोबाइलमधून हद्दपार करू शकता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2017 4:15 am

Web Title: how to take care of smartphone battery
Next Stories
1 संरक्षण समाजमाध्यमांचे
2 ‘थर्मल’ कॅमेऱ्याचा पहिला स्मार्टफोन भारतात
3 नाइट व्हिजन
Just Now!
X