उस गलीसे मुझे अब गुजरना नही..
जगभरातल्या स्मार्टफोन्सधारकांची सध्या ही अशी अवस्था झाली आहे. जळीस्थळीकाष्ठीपाषाणी फक्त आणि फक्त पॉकेमॉन दिसू लागलेत. अँग्री बर्डस, कॅण्डी क्रश, टेम्पल रनसारख्या गेम्सना मागे टाकत पॉकेमॉन गो या गेमने सगळीकडे धुरळा उडवला आहे. केवळ तीन देशांमध्येच अधिकृतरीत्या रिलीज होऊनही जगाला वेड लावणाऱ्या या गेममध्ये नक्की असं आहे तरी काय, हा प्रश्न एरवी तंत्रज्ञानाशी फारसं देणंघेणं नसणारे आजीआजोबाही विचारू लागलेत.
सामान्यत: गेम्स लोकप्रिय होतात ते त्याच्या प्रकारामुळे, तो खेळण्याच्या पद्धतीमुळे, जिंकल्यानंतर मिळणाऱ्या बक्षिसांमुळे, खेळताना मेंदूच्या खर्च होण्याच्या प्रमाणामुळे. पॉकेमॉन गेम लोकप्रिय होतोय ते त्यात वापरलेल्या तंत्रज्ञानामुळे. असं तंत्रज्ञान ज्यामुळे आभासी विश्व (व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी) आणि वास्तव जग (रिअ‍ॅलिटी) यांच्यातली दरी कमी झाली आहे. खरं तर या दोन्हींचा मेळ घालूनच हा गेम बनवण्यात आला आहे. ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी असं या तंत्रज्ञानाचं नाव आहे. याला अजून तरी मराठी प्रतिशब्द मिळालेला नाही. पण व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटीच्या एक पाऊल पुढे असल्याने याला वाढीव आभासी जग असा शब्द होऊ शकतो. असो. मुद्दा हा आहे की हे तंत्रज्ञान नेमकं काम कसं करतं.

सोप्या शब्दात ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी म्हणजे काय सांगायचं झालं तर वास्तव जगावर (रिअ‍ॅलिटी) आभासी विश्वचं (व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी) केलेलं अध्यारोपण म्हणजेच सुपरइम्पोज. शब्द जरा कठीण आहेत पण न समजण्याइतकी ही संकल्पना कठीण नाही. ग्राफिक्स, साऊंडचा वापर करून एक व्हच्र्युअल जग तयार करायचं. आणि हे आभासी जग नंतर वास्तवातील जगासोबत किंवा आपल्या भोवतालच्या परिसराशी जोडून टाकायचं. उदाहरणार्थ आपण राहतो त्या रस्त्यावर काही वाण्याची दुकानं आहे. आभासी जगामध्ये व्हच्र्युअली सोन्याच्या खाणी तयार केलेल्या आहेत. आता या खाणींची वाण्याच्या दुकानांसोबत अदलाबदल केली. त्यातून जी तयार झाली ती आहे ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी. पॉकेमॉन गोमध्ये नेमकं हेच केलेलं आहे. त्यामुळे आपण जिथे जिथे हिंडतो त्या त्या भागातच आपण हा गेम खेळतो. वास्तवाशी अधिक जवळ नेणारा असा हा गेम असल्यामुळे जगभरातल्या तमाम जनतेने याला डोक्यावर घेतलाय.
ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीच्याच क्षेत्रात भरीव काम करणारा एक भारतीय माणूस आहे हे अभिमानास्पदच. त्याचं नाव आहे प्रणव मिस्त्री. एमआयटी युनिव्हर्सिटीच्या लॅबमध्ये विकसित केलेला सिक्स्थ सेन्स हा प्रकल्प म्हणजे ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी बनवणारी सिस्टीमच. नेहमीच्या वापरात असणारी उपकरणं वापरून त्यांनी ही सिस्टीम तयार केली होती.
कॅमेरा, एक छोटा प्रोजेक्टर, स्मार्टफोन आणि आरसा ही साधनं एकमेकांना दोरीने बांधलेली असतात. आणि हे असं कम्बाइण्ड डिव्हाइस बनवून गळ्यात घातलं जातं. याशिवाय चार वेगवेगळ्या रंगाच्या कॅप्सही बोटांना लावलेल्या असतात. कॅमेरा आणि आरशाचा वापर करून भवतालच्या परिसराची एक इमेज कॅप्चर केली जाते. ही इमेज सोबतच्या स्मार्टफोनमध्ये
पाठवून दिली जाते. स्मार्टफोन त्या इमेजचं प्रोसेसिंग करतो- त्या फोटोवरून जीपीएस कोऑर्डिनेट्स
आणि इतर डेटा मिळवला जातो. ही प्रोसेस झालेली इमेज नंतर प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्रोजेक्ट केली जाते. गंमत अशी आहे की प्रोजेक्ट केलेल्या इमेजसोबत त्याची माहितीही दिली जाते. उदाहरणार्थ वाण्याकडून एखादी लोणच्याची बरणी घेतली तर सिक्स्थसेन्स सिस्टीम ती लोणची बनवणाऱ्या कंपनीची माहिती, लोणच्याची रेसिपी वगैरे माहितीही प्रोजेक्ट करतात.
सिक्स्थसेन्स ही सोप्या पद्धतीने ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी बनवणारी सिस्टीम आहे. पण हेच तंत्रज्ञान वापरून अनेक अ‍ॅप्सही बनवण्यात आलेली आहेत. नेदरलॅण्डमध्ये वापरलं जाणारं लोकप्रिय लायेर किंवा लेयर हे अ‍ॅप याच तंत्रज्ञानावर आधारलेलं आहे. एखाद्या बिल्डिंगच्या दिशेने स्मार्टफोन धरून कॅमेरा सुरू केला की त्या बिल्डिंगमध्ये असणारी ऑफिसेसची नाव स्क्रीनवर येतात. एवढंच नाही तर तिथे नोकरीसाठी जागा आहे का हेसुद्धा स्क्रीनवर दाखवलं जातं. अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयओएसवर अशी अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत.
हेच तंत्रज्ञान वापरून पॉकेमॉन गो हा गेम बनवण्यात आला आहे. स्मार्टफोनमधील जीपीएस आणि घडय़ाळ या अ‍ॅप्सकडून डेटा मिळवला जातो. आणि या डेटाच्या आधारावर गेमचं ठिकाण आणि वेळ ठरते. पॉकेमॉन हे तुम्ही आत्ता ज्या ठिकाणी आहात तिथेच आजूबाजूला असल्याचा भास निर्माण केला जातो. आणि त्या पॉकेमॉनच्या दिशेने गेम खेळणारा चालायला लागतो. जसजसं खेळणारा हिंडायला लागतो तसतसे वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या प्रकारचे पॉकेमॉन दिसायला लागतात. दिसला पॉकेमॉन की पकड हे या गेमचं सूत्र. या हटके फॉम्र्युलानेच या गेमला लोकप्रिय केलंय.
पुष्कर सामंत pushkar.samant@gmail.com