मोबाइल ‘फ्रीडम’

मागच्या आवडय़ातील बुधवारी रिंगिंग बेल या कंपनीने भारतीय स्मार्टफोन बाजारात एकच खळबळ उडवून दिली.

रिंगिंग बेल या कंपनीने अवघ्या २५१ रुपयांमध्ये स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत आणून मोबाइल बाजारात एकच गोंधळ उडवून दिला.

मागच्या आठवडय़ात रिंगिंग बेल या कंपनीने अवघ्या २५१ रुपयांमध्ये स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत आणून मोबाइल बाजारात एकच गोंधळ उडवून दिला. कंपनीचा हा दावा किती खरा.. किती खोटा.. नोंदणी केलेल्या ग्राहकांना मोबाइल मिळणार की नाही मिळणार.. कंपनी पैसे हडप करणार की नाही करणार.. हे सर्व प्रश्न असतानाच या कंपनीच्या या घोषणेमुळे ‘आकाश’ टॅबनंतर पुन्हा एकदा मोबाइल बाजारात स्वस्त मोबाइलवर चांगलीच चर्चा रंगली.

अवघ्या २५१ रुपयांमध्ये मोबाइल उपलब्ध करून देणार असा दावा करीत मागच्या आवडय़ातील बुधवारी रिंगिंग बेल या कंपनीने भारतीय स्मार्टफोन बाजारात एकच खळबळ उडवून दिली. सध्याच्या व्यवस्थेला तडा देऊन कुणी काही केले की त्याच्या अंगावर सगळेच धावत जातात तसेच रिंगिंग बेलच्या बाबतीत घडले आणि मोबाइल कंपन्यांच्या शिखर संस्थेसह राजकीय नेत्यांनीही कंपनीवर टीका सुरू केल्या. यातील
काही टीका खऱ्याही असतील. कंपनी जोपर्यंत स्मार्टफोन प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत हा गोंधळ असाच कायम सुरू राहणार. याला कारणेही तशीच आहे. यातील काही प्रमुख कारणे आपण पाहू या.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’च्या आराखडय़ामध्ये नवउद्योगांना पहिली तीन वष्रे कर सवलत देण्याचे जाहीर केले आणि कर सवलत लागू झाली असे गृहीत धरून रिंगिंग बेल या कंपनीने त्यांच्या मोबाइलच्या किमतीवर एकही कर न लावता तो विक्रीसाठी बाजारात दाखल केला. यामुळेही मोबाइलची किंमत निव्वळ २५१ रुपये होते असे नाही.
– सध्या कंपनीचे कोणतेही उत्पादन केंद्र नाही. तसेच एखादे उत्पादन बाजारात येण्यापूर्वी जी काही पूर्वतयारी असते तीही कंपनीने केलेली दिसत नाही.
– कंपनीने आमच्या मोबाइची रचना चोरली असल्याचा दावा अ‍ॅडकॉम कंपनीने केला आहे.
– याचबरोबर कंपनीने मोबाइलमधील बलाढय़ कंपनीशी पंगा घेतला असून अ‍ॅपल कंपनीचे काही आयकॉन्स स्वत:च्या मोबाइलमध्ये देऊ केले आहेत. ज्यामुळे बौद्धिक संपदा कायद्याचे उल्लंघन होते.
–  भारतीय मानक विभागाकडेही कंपनीची नोंद नसल्याचे समोर आले आहे.
या सर्व कारणांना कंपनीने त्यांच्या परीने वेळोवेळी उत्तरे दिलीही. पण ते इथेच थांबणार असे नाही. कंपनीला दूरसंचार विभागानेही धारेवर धरण्याची तयारी सुरू केली आहे.
या सर्व पाश्र्वभूमीवर ही कंपनी स्वस्त मोबाइल तयार करेल असे आपण गृहीत धरू. कमीत कमी किमतीत मोबाइल तयार करायचा झाला तर एक मोबाइल तयार करण्यास येणारा खर्च काय असू शकतो हे जाणून
घेऊ या.
–  फ्रीडम २५१ मध्ये आपल्याला चार इंचांचा डिस्प्ले देण्याता येणार आहे. डब्लूव्हीजीए आयपीएसचा मध्यम दर्जाचा डिस्प्ले जर आपण बाजारात पाहिला तर त्याची किंमत साधारणत: ५५० रुपयांपर्यंत आहे. मध्यम किमतीत मोबाइल उपलब्ध करून देणाऱ्या बहुतांश कंपन्या या दर्जाचा डिस्प्ले वापरतात.
– याशिवाय मोबाइलमध्ये मुख्य कॅमेरा ३.२ मेगापिक्सेल आणि फ्रंट कॅमेरा ०.३ मेगापिक्सेल देण्यात येणार आहे. याची किंमत अंदाजे २५० रुपयांमध्ये आहे.
– यात १.३ गीगाहर्टझचा क्वाडकोर प्रोसेसर वापरण्यात येणार आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या प्रोसेसरपैकी सर्वात स्वस्त प्रोसेसर १००० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
– मोबाइलमध्ये अंतर्गत साठवणूक क्षमता आठ जीबी देण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक चिपची किंमत १५० रुपयांपर्यंत आहे.
– फोनमध्ये १४५० एमएएचची बॅटरी देण्यात येणार असून सर्वात कमी किमतीची बॅटरी २५० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
– मोबाइलच्या बॉडीसाठी किमान ७० रुपये खर्च करावे लागणार आहेत.
– याचबरोबर स्पीकरसह इतर छोटय़ा गोष्टींसाठी २५० रुपये खर्च होऊ शकतील आणि ८० रुपये चार्जरसाठी मिळू शकतील.
याचा अर्थ चीनमधून आयात केलेल्या वस्तूंच्या माध्यमातून विकसित केल्या जाणाऱ्या मोबाइलची किमान किंमत ही २६०० रुपयांपर्यंत असू शकते. यावर जर कोणताही कर लागू केला नाही तरी मोबाइल २५१ रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकत नाही.

कंपनीच्या विरोधातील दावे
कितीही कमी खर्चात मोबाइल विकसित केला तरी तो कमीत कमी २७०० रुपयांमध्ये बनू शकतो. यामुळे २५१ रुपयांमध्ये फोन बनणे शक्यच नाही. या प्रकरणी दूरसंचार मंत्रालयाने दखल घ्यावी अशी सूचना मोबाइल कंपन्यांची शिखर संस्था ‘आयसी’ने स्पष्ट केले. तर एवढय़ा कमी किमतीत मोबाइल उपलब्ध होणे शक्यच नाही. याचबरोबर देशात असे एकही उत्पादन केंद्र नाही की जेथे मोबाइलच्या सर्व भागांची निर्मिती एकाच ठिकाणी होते. जर तसे होत असेल तर ती मोबाइल क्षेत्रातील क्रांती ठरेल असे मत दूरसंचारतज्ज्ञ संजय कुमार यांनी नोंदविले आहे.

कंपनीचे दावे
– एखाद्या वस्तूचे इतके उत्पादन करायचे की त्याची मूळ किंमत खूप कमी होईल असे कंपनीचे अध्यक्ष अशोक चड्डा यांनी स्पष्ट केले.
– चिनी अर्थव्यवस्थेच्या सूत्रानुसार कंपनीने दरमहा एक कोटी मोबाइलच्या निर्मितीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.
– कंपनी कुणाची आहे याचा तपशील सर्वाना माहिती आहे. याचबरोबर जर नोंदणी केल्यानंतर कुणाला पैसे परत हवे असतील तर जून महिन्यापर्यंत ते परत करण्याचा दावाही कंपनीने केला आहे.
– या फोनची चीप तैवान येथून आयात होणार आहे. यानंतर त्याची पुढची निर्मिती भारतातच केली जाणार आहे. याचबरोबर मोबाइलच्या ७५ टक्के भागांची निर्मिती या वर्षअखेपर्यंत देशातच केली जाणार असल्याचे कंपनीचे संचालक मोहित गोएल यांनी स्पष्ट केले.
नीरज पंडित – niraj.pandit@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Freedom 251 mobile