डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरातील १०६ वर्षांच्या आजी करोनामुक्त होऊन रविवारी सुखरूप घरी परतल्या. शंभरी पार केलेले वृद्धही करोनावर मात करू शकतात, हा संदेश या आजींनी दिला आहे.

पालिकेच्या सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील करोना रुग्णालय चालविणारे ठाण्यातील वनरूपी क्लिनिकचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राहुल घुले यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. वय पाहता त्यांच्यावर उपचार करणे मोठे आव्हान होते. त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे पहिल्या दिवसापासून त्या उपचाराला चांगल्या प्रतिसाद देत होत्या. यामुळेच त्या करोनामुक्त झाल्या, डॉ. घुले यांनी सांगितले. तापसदृश कोणतीही लक्षणे आढळून आली तर आरोग्य केंद्र, चाचणी केंद्रांमध्ये तपासणी करून घ्या. तात्काळ उपचार सुरू करा. वेळीच उपचार सुरू केले तर कोणत्याही वयोगटातील करोना रुग्ण बरा होऊ शकतो हे आजीबाईंनी दाखवून दिले आहे’, असे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. तर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरद्वारे रुग्णालय व्यवस्थापन आणि आजींचे कौतुक केले आहे.