गेल्या महिन्याभरात १५८ हेक्टर वनसंपदा भस्मसात

आशीष धनगर, लोकसत्ता

ठाणे : टाळेबंदीत प्रदूषणाची पातळी निम्म्यावर येत असल्याची चांगली वार्ता असली तरी गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत १३० मोठे वणवे लागले आहेत. यात १५८.२९ हेक्टर इतक्या मोठय़ा क्षेत्रातील हिरवाई भस्मसात झाली आहे. दरम्यान, वनक्षेत्रात लागलेले वणवे तात्काळ आटोक्यात आणले जात असल्याने मोठे नुकसान टळत असल्याचे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी भागातील वनसंपदा वणव्यांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. टाळेबंदीच्या काळात  १३० वेळा वणवे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यात १५८.२९ हेक्टर क्षेत्र भस्मसात झाले असल्याची माहिती वन विभागातर्फे देण्यात आली आहे. यामध्ये मुरबाड पश्चिम येथील वनक्षेत्रात ३७ वेळा वणवे लागले आहेत. तर बदलापूर येथील वनक्षेत्रात १३ वणवे लागले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक ४४ हेक्टर वनक्षेत्र भस्मसात झाल्याची माहिती उप वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी दिली.

धुम्रपान कारण?

अनेक वनक्षेत्रे हे गावांच्या वेशीवर असलेल्या शेतांना लागून आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्यात अनेक शेतकरी शेतात पूर्व मशागतीची कामे करतात. या वेळी बांधांवरील गवत पेटवण्यासाठी आग लावली जाते. अनेकदा वाऱ्याचा वेग जोरात असला की ही आग पसरते आणि त्यामुळे वणवे लागतात. त्यामुळे वनक्षेत्राच्या परिसरात गृहसंकुले उभी राहिली आहेत. यातील काही नागरिक हे अनेकदा वनक्षेक्षात जावून बिडी वा सिगारेट ओढून धुम्रपान करतात. त्यावेळी पेटती बिडी किंवा सिगारेट सुक्या गवतावर पडल्यास वणवा लागतो, अशी माहिती वन विभागातर्फे देण्यात आली आहे.

जमीन करपली..

ठिकाण                    वणवे         भस्मसात झालेले क्षेत्र (हेक्टर मध्ये.)

ठाणे                            १            १०००

कल्याण                      २१           ३७.५००

मुरबाड पूर्व                  २३           १३.३८०

मुरबाड  पश्चिम          ३७           १९.०००

टोकावडे दक्षिण             ३            ७.०००

टोकावडे उत्तर              ३            ६.५००

बदलापूर                     १३           ४४.०००

पडघा                           ८            ७.९००

भिवंडी                        २०           १९.०१०

मांडवी                        १            ३.०००