कल्याणमध्ये एकाच इमारतीमधील ३७ जणांना कावीळ; प्रदूषित पाण्याच्या पुरवठय़ामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
कल्याण पूर्वेतील दुर्गामाता मंदिर परिसरात सरिता सोसायटी या एकाच इमारतीमधील ३७ जणांना कावीळची लागण झाल्याची बाब उघडकीस आली आहे. गेल्या महिनाभरापासून या भागामध्ये प्रदूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने हा प्रकार घडत असल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिका प्रशासनाने यावर नियंत्रण मिळवले. यापूर्वी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात असा प्रकार घडला होता तर कल्याण पश्चिमेतील अन्नपूर्णानगर परिसरात प्रदूषित तसेच किडेयुक्त पाणीपुरवठा होत असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे पाणीटंचाईमुळे मिळेल त्या मार्गाने पाणी मिळवण्याचे नागरिकांचे प्रयत्न असताना अशुद्ध वा प्रदूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांनी डोके वर काढल्याने चिंतेचे वातावरण आहे.
कल्याण-डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरण आणि नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याने शहरात पाणीकपातीचे संकट उद्भवले आहे. आठवडय़ातून तीन दिवस शहरामध्ये पाणीकपात केली जात असून कल्याण पूर्वेतील नागरिकांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागते. पाण्याच्या विवंचनेत असलेल्या कल्याण पूर्वेतील दुर्गामाता मंदिर परिसरातील सरिता सोसायटीतील रहिवाशांना अचानक कावीळच्या साथीची लागण झाली. २७ सदनिका असणाऱ्या या इमारतीमध्ये सुमारे अडीचशे रहिवासी राहतात. त्यातील ३७ जणांना एकामागोमाग एक काविळीचा त्रास जाणवू लागला. या धक्क्य़ाने इमारतीमधील नागरिकांनी पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याची सुरुवात केली. महिन्यातून तीन वेळा पाण्याच्या टाक्या साफ करूनही आजाराचा प्रादुर्भाव आटोक्यात न आल्याने रहिवाशांनी महापालिका प्रशासनाकडे धाव घेतली. महापालिका प्रशासनाने या इमारतीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची तपासणी केली असता या इमारतीलगतच्या दुसऱ्या इमारतीची मलनिस्सारण वाहिनी फुटून त्यातील सांडपाणी सरिता सोसायटीच्या जलवाहिनींच्या छिद्रातून आत झिरपत असल्याचे उघड झाले, अशी माहिती एकनाथ सोनवणे या रहिवाशाने दिली. पालिकेने केलेल्या तातडीच्या उपाययोजनांमुळे हा प्रकार नियंत्रणात येत असला तरी आतापर्यंत या पाण्याचे सेवन अवघ्या सोसायटीने केले असल्याने काविळीचे रुग्ण वाढण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली.

अन्नपूर्णानगरमध्ये पाण्यात जिवंत अळ्या, किडे
कल्याण पश्चिमेतील अन्नपूर्णानगर परिसरात अपूर्वा सोसायटीतील नागरिकांच्या घरामध्ये सोमवारी नळाचे पाणी दूषित स्वरूपात आले. या पाण्यात जिवंत किडे, अळ्या सापडल्याने हे पाणी पिण्यासाठी आयोग्य असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांच्यामध्ये संताप निर्माण झाला. अंघोळ अथवा इतर कामासाठी हे पाणी वापरले तरी त्यामुळे त्वचेचे विकार उद्भवतील अशी भीती रहिवाशांमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी पालिका प्रशासनाकडे याविषयी तक्रार केली आहे. या दूषित पाण्याचे नमुने पालिका प्रशासनाला दाखवण्यात आले. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत. केवळ एका सोसायटीला हे दूषित पाणी आले असून सोसायटीची वाहिनी कुठे फुटली आहे का? त्यात सांडपाणी मिसळल्याने हे किडे त्यात आढळून आले का याचा शोध घेतला जाईल असे पालिका प्रशासनाने सांगितले.