मुख्यमंत्र्यांची कबुली; राज्यस्तरीय कृती दल स्थापन करण्याची घोषणा

पालघर जिल्ह्य़ातील जव्हार आणि मोखाडा या दोन तालुक्यांमधील कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण चिंताजनक असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्य़ातील कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूची सरासरी गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी असली तरी या दोन तालुक्यात ती वाढल्याचे स्पष्ट होत असल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात दिली. कोकण विभागाच्या नियोजन बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जव्हारमध्ये गेल्या वर्षी ४२ मृत्यूची नोंद होती तर यंदा ती ४७ झाली आहे. तसेच मोखाडय़ात गेल्या वर्षी ५७ तर यंदा ७५ मृत्यूंची नोंद झाली आहे, हे प्रमाण चिंताजनक असून बालमृत्यू रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दल स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली.

कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांच्या नियोजनाचा आढावा गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या वेळी या विभागात राबवण्यात आलेल्या योजनांची अंमलबजावणी विषयांची माहिती पत्रकारांना दिली. या वेळी पालघर जिल्ह्य़ातील कुपोषणाची तीव्रताही स्पष्ट केली. पालघर जिल्ह्य़ातील गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू नियंत्रणात आहेत. २०१४-१५ मध्ये ६२६ बालमृत्यू होते तर २०१५-१६ मध्ये त्यांची संख्या ५६५ झाली. यंदाच्या वर्षी १९५ अर्भक मृत्यू आणि २५४ बालमृत्यू झाले आहेत. बालमृत्यू ही अत्यंत चिंताजनक बाब असून ती पूर्णपणे थांबविण्यासाठी उपाय योजण्यात आले आहेत.

पोषणासाठी प्रयत्न

पोषण व बालमृत्यू रोखण्यासाठी सॅम व मॅममधील बालकांची दरमहा वैद्यकीय तपासणी केली जात आहे. पालघर जिल्ह्य़ात ऑगस्टअखेर सॅममध्ये १ हजार ३१९ बालके असून मॅममध्ये मोडणाऱ्या बालकांची संख्या ४ हजार ७१५ आहे. या एकूण ६ हजार ३४ बालकांना तात्काळ वैद्यकीय मदत तसेच पोषण आहारपुरवठा चालू करण्यात आला आहे. या सर्वाना साधारण श्रेणीत आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. मध्यवर्ती स्वयंपाकगृहाच्या माध्यमातून सकस आहार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येईल. तसेच या स्वयंपाकगृहांची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने र्सवकष योजना तयार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

कुपोषणाविरोधात कृती दल

कुपोषणाच्या प्रश्नावर शासन संवेदनशील असून आरोग्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृती दल समिती स्थापन करण्यात येणार आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणांशी समन्वय साधला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय टास्क फोर्स समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री, महिला व बालविकास मंत्री, आदिवासी विकासमंत्री तसेच या विभागांचे सचिव समितीचे सदस्य असतील.

श्रमजीवी संघटनेचे आंदोलन..

पालघर जिल्ह्य़ातील कुपोषणाच्या प्रश्नावरून श्रमजीवी संघटनेच्या युवकांनी मुख्यमंत्र्यांसमोर जोरदार निदर्शने केली. पालघरच्या कुपोषणाविषयी सरकार संवेदनशीलता दाखवत नसल्याची भूमिका या आंदोलनकर्त्यांनी या वेळी व्यक्त केली. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले होते.