२९ तलावांच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव
ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील तलावांपाठोपाठ आता कळवा, मुंब्रा, दिवा तसेच अन्य भागांतील तलावांच्या सुशोभीकरणाकडे विशेष लक्ष देण्यास महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील ३७ पैकी २९ तलावांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार कुंपण भिंत, जॉगिंग ट्रॅक, बैठक व्यवस्था, विद्युत व्यवस्था, संगीतमय कारंजे आणि इतर सुशोभीकरणाची कामे केली जाणार आहेत. या कामांमुळे अतिक्रमणांच्या रेटय़ातही आपले अस्तित्व टिकवून असलेल्या तलावांना नवी झळाळी मिळण्याची चिन्हे आहेत.
तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील अनेक तलाव अतिक्रमणांमुळे नामशेष झाले आहेत. सध्या शहराच्या विविध भागांत ३७ तलाव शिल्लक आहेत. हे उर्वरित तलावही नामशेष होऊ नयेत, म्हणून गेल्या काही वर्षांपासून महापालिकेकडून ठोस पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील तलावांचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याची मोहीम पालिका प्रशासन राबवत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील तलावा पाठोपाठ आता अन्य भागांतील तलावांवरही पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. या तलावांच्या संवर्धन व सुशोभीकरणाचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. या प्रस्तावानुसार वागळे, घोडबंदर, बाळकूम, कळवा, मुंब्रा तसेच दिवा भागातील २९ तलावांचा समावेश आहे. तो येत्या बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. या प्रस्तावानुसार सुशोभीकरणासाठी ३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
हे तलाव लखलखणार
आंबे घोसाळे, उपवन, खारेगाव, खर्डी, खिडकाळी, डावला, देवसर, रेवाळे, कोलशेत, शीळ, तुर्फेपाडा, देसाई, फडकेपाडा, कासारवडवली, कळवा-शिवाजीनगर, कौसा, ब्रह्माळा, कावेसर, मुंब्रेश्वर, दातिवली, नार, डायघर, दिवा, जोगिला, बाळकूम, गोकुळनगर, रायलादेवी, ओवळा, आगासन या २९ तलावांचे संवर्धन व सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
आराखडा तयार
या प्रस्तावानुसार घोडबंदर मार्ग, बाळकूम, कळवा, मुंब्रा तसेच दिवा भागांतील २९ तलावांच्या परिसरात कुंपण भिंत, रेलिंग, जॉगिंग ट्रॅक, गाळ काढणे, बैठक व्यवस्था, विसर्जन घाट, थिम पेंटिंग, विद्युत दिवे, तलावाच्या मध्यभागी संगीतमय कारंजे, वृक्षारोपण आणि इतर बांधकामे केली जाणार आहेत. या कामांचा आराखडा पालिकेने तयार केला असून, त्याआधारे ही सुशोभीकरणाची कामे केली जाणार आहेत.